Top Post Ad

इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे गणेश नाईक यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी


 नवी मुंबई :
मला सर्व इंटरनॅशनल डॉन म्हणून ओळखतात, तुर्भे येथील भाजपच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी गणेश नाईक  भरसभेत बोलले होते. नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. एसआयटीमार्फत इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.  जसजशी नवी मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत आहे तसतसे फोडाफोडीचे राजकारण नवी मुंबईत रंगले आहे. भाजपचे काही नगरसेवक निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने फोडले आहेत. गणेश नाईक यांनी या फोडाफोडीवर भाष्य करताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. येथीलच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नसल्याचे असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात म्हटले होते.

सुप्रिया सुळे यावरुन बोलताना म्हणाल्या की, एसआटीमार्फत इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध अससल्याचे जाहीर वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांची चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. यासाठी अमित शाह यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणार असून संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दरम्यान महाराष्ट्र सहकारी बॅंक घोटाळ्यातून अजित पवार यांना क्लिन चीट मिळाल्याने भाजप परत एकदा तोंडावर पडल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पोलीस योग्य तो तपास करतील, महाराष्ट्र पोलिसांवर आपला विश्वास असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नवी मुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. साताऱ्यात भर पावसात झालेल्या शरद पवार यांच्या सभेचा दाखला देत नवी मुंबईचा पुढचा महापौर महाविकास आघाडीचाच असेल, असेही सुप्रिया म्हणाल्या. 

शरद पवार यांना राजकारणात ५५ वर्षे झाली. त्यातली अर्धी वर्षे सत्तेत गेली तर अर्धी वर्षे विरोधात गेली. या ५५ वर्षांत महाराष्ट्रातील जनतेने शरद पवारांना कधी अंतर दिले नाही असे नमूद करतानाच सत्ता ही सेवा करण्यासाठी असते ती पदासाठी वा लालदिव्यासाठी नसते हे सदैव लक्षात ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी मुंबई येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले

भाजपच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रात आमचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि राष्ट्रवादीकडून केलेलं इनकमिंग नडल्याची कबुली दिल्याचा दावा करत सुप्रिया यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर यावेळी जोरदार शब्दांत त्यांनी निशाणा साधला. 'पवार साहेबांनी आता निवृत्त व्हावं, असं मार्गदर्शन फडणवीसांनी केलं होतं. मात्र, महाराष्ट्राला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच 'एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा! महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस दूसरी तरफ', असे चित्र महाराष्ट्रात दिसले अशी टोलेबाजी सुप्रिया यांनी केली. फडणवीस म्हणतात म्हणून पवारसाहेब निवृत्त होतो असे म्हणतीलही पण महाराष्ट्राच्या मनात तसं नाहीय, असेही त्यांनी नमूद केले. नवी मुंबईकरांच्या मनात 'त्या' घोड्याची फिल्म छान झालीय. म्हणूनच 'ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है' असे माझे म्हणणे आहे. आपल्याला तो पिक्चर बघायचा आहे, असे सूचक विधानही सुप्रिया यांनी केले.

दीड वर्षांपूर्वी पक्षात कोण टिकेल, कोण लढेल आणि कोण लढणार नाही, अशी परिस्थिती होती. रोज उठलं की आज कोण पक्षातून गेला हे तपासायचो. आज कुणीच पक्ष सोडून गेला नाही असे कळले की बरे वाटायचे, अशी आठवण सांगतानाच ५२ जण शरद पवारांना सोडून गेले होते, पण त्यातील एकही आमदार म्हणून निवडून आला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असे म्हणत सुप्रिया यांनी पक्षांतर करणाऱ्यांना फैलावर घेतले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं झालं ते २०१९ मध्ये भाजपचं झालं. त्यातून शिवसेना वाचली. त्यांच्या पटकन लक्षात आले. 'दाल मे काला है इधरसे निकलो'. मग उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे आणि त्यातूनच महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. सव्वा वर्ष भक्कमपणे आमचे सरकार काम करत आहे. केंद्र सरकारमधूनही कुणीच सव्वा वर्षात टीका करू शकले नाही. येथले त्यांचे नेते टीका करतात त्यांना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी उत्तर देत आहे. म्हणूनच प्रत्येक जण महाविकास आघाडीचे मॉडेल देशात यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करत आहे, असेही सुप्रिया म्हणाल्या. या मेळाव्याला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com