विधानसभेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी... 25 फेब्रुवारीला महाआघाडीची बैठक

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात घ्यावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका पत्राद्वारे सरकारला दिले आहेत. मात्र या पदासाठी पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली, तर दगाफटका होऊ शकतो, अशी भीती आघाडीच्या नेत्यांना वाटत असून त्यामुळेच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक घेण्याचा विचार तिन्ही पक्षात सुरू आहे. सत्ताविभागणीत अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्यालाच असल्याने नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा सुरू होती. राऊत यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती. त्यामुळे राऊत यांची वर्णी निश्चित मानली जात होती. मात्र सदनाचे कामकाज चालविण्यात अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याने तीनही पक्षांच्या सहमतीनंतरच हा निर्णय होणार आहे. 

याबाबत २५ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सध्या काँग्रेसमध्ये नितीन राऊत, के. सी. पाडवी, संग्राम थोपटे याची नावे चर्चेत असली तरी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील काही नावांचा विरोध असला तरी शिवसेनेने मात्र, त्यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. चव्हाण हे मुरब्बी राजकारणी असून भाजपचे प्रखर विरोधक आहेत. शिवाय संसदेसह विधीमंडळाच्या कामकाजाचा दीर्घ अनुभव असल्याने अध्यक्षपदी तेच असावेत असा आग्रह धरला आहे. राऊत यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद आहे. शिवाय ते काँग्रेसच्या अनुसुचित जाती-जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे ही दोन्ही पदे त्यांना सोडावी लागतील. के. सी. पाडवी आणि थोपटे यांना मर्यादा असल्याने चव्हाण यांच्या नावाचा शिवसेना आग्रह धरत आहे   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या