नामदेव ढसाळ : जागतिक साहित्यातील मैलाचा दगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भारतीय समाज व्यवस्थेने इथल्या लाखो-करोडों लोकांचे गाते गळे चिरले होते. त्यांच्या हातातील लेखण्या हिसकावून घेतल्या होत्या त्या समाजाच्या हाती आपल्या संघर्षमय चळवळीद्वारे पुन्हा एकदा लेखण्या दिल्यानंतर त्या लेखणीचा शस्त्रासारखा उपयोग करणारा कवी म्हणजे नामदेव लक्ष्मण ढसाळ. भारतीय साहित्य शास्त्राला आपल्या समर्थ शब्दाने नवा आयाम देणारा हा कवी  भाषा, देश, यांच्या सीमा पार करून जागतिक साहित्यात प्रस्थापित झाला. नामदेव डसाळ यांनी मराठी साहित्याच्या माध्यमाने जी निर्मिती केली त्यामुळे ढसाळ हे जागतिक साहित्यातील मैलाचे दगड ठरले. जागतिक दर्जाची साहित्य संमेलने आयोजणारा हा एकमेव भारतीय लेखक. त्याच्या निधनाने जागतिक साहित्याची अपरिणीत हानी झाली आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा विदर्भ साहित्य संघाच्या नागपूर कार्यालयाला भेट दिली, तेव्हा त्यांनी मराठी साहित्यिकांना उद्देशून एक संदेश लिहिला होता, की ``आपल्या अवतीभोवती दलितांचे, पददलितांचे आणि वंचितांचे एक मोठे जग अस्तित्वात आहे. त्यांचे दु:ख, दारिद्र्य आपल्या साहित्यात परावर्तित करा.'' बाबासाहेबांचा हा संदेश मराठी साहित्यिकांनी दुर्लक्षित केला, कारण या परंपरागत आक्रोशाचा एक ओरखडासुद्धा या साहित्यात उमटला नाही. वंचितांच्या दु:खाला वाचा फोडण्याचे ज्यांनी काम केले, त्यात अग्रणी होते नामदेव लक्ष्मण ढसाळ वा नामदेव साळुबाई ढसाळ. मराठी साहित्याचीच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्यशास्त्राची मोडतोड करून एक नवे साहित्यशास्त्र जन्माला घातले. आधी साहित्यशास्त्र निर्माण होते आणि मग त्या आधारावर साहित्य निर्माण होते, असे कधीच होत नाही आणि तसे झालेच तर साहित्य तत्त्वहीन व सत्त्वहीन ठरते, परंतु आधी साहित्य निर्माण होते आणि त्या साहित्यावर आधारित साहित्यशास्त्र निर्माण होते. ते साहित्य अस्सल असते. नामदेव ढसाळांच्या बाबतीत असेच झाले. त्यांनी कोणत्याही साहित्यशास्त्रावर आधारित साहित्यनिर्मिती केली नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यावर साहित्यशास्त्र निर्माण झाले. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे दलित साहित्य वा फुले-आंबेडकरी प्रणालीचे साहित्य. त्यामुळेच नामदेवच्या कवितेतले शब्द कोणत्याही डिक्शनरीत सापडत नाहीत. त्यांनीच एक नवीन डिक्शनरी जन्माला घातली. नामदेव ढसाळांचे हे कर्तृत्व अपूर्व व अजोड आहे.  

नामदेव हा नुसता लेखक नव्हता तर आपल्या उक्तीला कृतीची जोड देणारा कवी लेखक होता. त्याने जे कवितेत म्हटले ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रस्त्यावरचा लढा उभारला. दलित पँथर या ज्वालाग्राही संघटनेच्या माध्यमाने त्याने भारतीय समाज व्यवस्था आमि राजसत्ता यांना आपली कूस बदलायला भाग पाडले. नामदेव हा जसा कवींचा कवी त्याचप्रमाणे उसळत्या तरुणांच्या रक्ताचा हुंकार होता. त्याची भाषणे तरुणांच्या मुठी वळविणारी होती. तो भाषण करायला उभा राहिला तर तरुणांमध्ये जल्लोष निर्माण व्हायचा. साध्या बोलीभाषेतले आणि म्हणींचे पखरण करणारे त्याचे भा,ण लढ्याला उर्जा देणारे होते. वर्णवर्चस्ववादाविरुद्ध आवाज उंचावित होतो. साठच्या दशकात अनियतकालिकांचे भरघोस पीक आले होते. आजच्या प्रतिथयश लेखखांचे त्याकाळे एखादे तरी अनियतकालिक असायचे ही अनियतकालिके कधी कधी सायक्लोस्टाईल्स स्वरुपातली सुद्धा असायची. मराठी साहित्य शास्त्राची ऐसी की तैसी करणारी ही अनियतकालिके समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करीत नव्हती आणि म्हणून  मी आणि ढसाळ यांनी विद्रोह नावाचे अनियतकालिक काढायचे ठरविले. विद्रोहाचा पहिला अंक चर्चेत आला कारण त्याने व्यवस्थेविरुद्ध विद्रोह पुकारला होता. निग्रो साहित्याबद्दलही त्यात लिहिण्यात आले होते. दुसरा अंक हा फारच स्फोटक ठरला त्याला कारण होते राढा ढाले यांचा दलित साहित्यावरचा महालेख व नामदेव ढसाळ यांची `माणसाने' ही क]िवता. मराठी साहित्यात दलित साहित्य नावाचा नवा प्रकार अंकुरत असताना गर्भातच तो खुंटून टाकण्यासाठी मराठीतील अनेक समीक्षक सज्ज झाले होते. त्या सगळ्यांना निरुत्तर करणारा हा महालेख होता. मलपृष्ठावरील माणसाने ही कविता एक प्रकारचा बॉम्बगोळा होता. नामदेवने मराठी, हिन्दी या भाषेतल्याच नव्हे तर रशियन साहित्यातल्या अनेक नामवंत लेखकांवर आसूड ओढले होते. ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्या साहित्याला गटाराच्या `मेन होल' मध्ये कुजवावे असे म्हटले होते. ही व]िवता प्रसिद्ध करू नये असे बाबुराव बागुलसारख्यांचेही मत होते. परंतु राजा ढाला व  मी आग्रह केल्यामुळे ती कविता प्रसिद्ध झाली. या कवितेतला बंडखोर नामदेव पुढे चढत्या पायरीने मराठी साहित्य आणि साहित्य शास्त्र नाकारीत राहिला. माणसाने सारखी एकही कविता नंतरच्या काळात लिहिली गेली नाही. कारण नामदेव हा अनुकरणीय कवीच नाही. ग.दि.मांडगुळकरांनी रसाळ नामदेव सद्दी संपली असून ढसाळ नामदेवची सुरु झाली आहे. असे म्हटले असले तरी नामदेवने मळलेल्या मळवाटेने जाणे कोणालाही जमले नाही. 

नामदेव ढसाळ कायमचे स्मरणात राहतील ते त्यांच्या `दलित पँथर'मधील कर्तृत्वामुळे आणि आभाळभर झालेल्या कवितेमुळे. त्यांच्या पँथरमधील लढाऊ प्रवृत्तीचा आणि कवितेचा मी साक्षी आहे आणि हा काळ थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 40-45 वर्षाचा. नामदेवने मळवाटेने जायचे नाकारले व त्यांनी स्वत:ची अशी एक वाट मळली. ही वाटही एवढी कठीण की, त्या वाटेने जाताना भल्याभल्यांची दमछाक झाली. त्यामुळेच नामदेव अनुकरणीय होऊ शकले नाहीत. त्यांची स्वत:ची अशी एक आयडेंटिटी होती आणि तिच्याशी त्यांनी कधीच समझोता केला नाही. नामदेव जसे जगले तसेच त्यांनी आपले साहित्य निर्माण केले. त्यांच्या `रक्तात अगणित सूर्य' जन्मले होते. या दाहक सूर्यप्रकाशातच ते प्रकाशाचे पुंजके झाले आणि जातीयतेच्या जंगलाला बेचिराख करीत सुटले. गोलपिठ्यापासून झालेला प्रवास आयुष्याच्या अखेपर्यंत प्रवाही राहिला, कारण त्यांचे स्फूर्ती आणि शक्तिस्थळ होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब हाच खरा त्याचा आदर्श. इतरांचा त्यानी केलेला उच्चार द्वितीय श्रेणीतला होता. प्रथमश्रेणीतले बाबासाहेब त्यांना नवनव्या स्वरूपात दिसू लागले आणि त्यामुळे दरवर्षी बाबासाहेबांवर एक कविता लिहीत राहिले. ती कविता दीर्घ असणारच हे सांगता कळावे. बाबासाहेबांना कवितेत पकडण्यासाठी नामदेवने प्रयत्न केले, परंतु त्यांना त्यात म्हणावे तसे समाधान मिळाले नाही, याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे बाबासाहेब हेच कवींचे कवी होते.  

नामदेव मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला नसला तरी अनेक अध्यक्षांनी त्याच्या पायथ्याशी लोळण घ्यावी असे साहित्य त्याने निर्माण केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासारखी निवडणूक त्याला जिंकता आली नसती. त्यामुळेच राजकीय निवडणुकातंही तो सपशेल पराभूत व्हायचा. साहित्याच्या क्षेत्रातला हा ध्रुवतारा राजकीय मंचावर मात्र वाच्यार्थाने पराभूत ठरला. नामदेवने घेतलेल्या नवनवीन उड्यांमुळे तो पराभूत झाला. सर्व प्रकारच्या वर्चस्ववादाविरुद्ध लढणारा  नामदेव शिवसेनेच्या गृहेत गेला हे माझ्यासह अनेकांना रुचले नाही हे खरे असले तरी तो माझ्यापासून मुळीच अंतरला नाही. उलट महत्त्वाच्या क्षणी तो मला फोन वा प्रत्यक्ष भेटत होता. तो भेटल्यावर त्याच्या चेहऱयावर जो आनंद परावर्तीत होत होता. त्याचे मूल्य करता येत नाही. बॉम्बे हॉस्पीटल हे अलिकडच्या काळात त्याचे दुसरे घरच झाले होते. नामदेव जसा हजारोंमध्ये एखादाच तसा त्याचा रोगही हजारोंमध्ये एखाद्यालाच. त्या रोगामुळे त्याला अनेक बंधने निर्माण झाली होती. नामदेव `व्हील चेअर'मध्ये असला तरी त्याची लढण्याची  प्रवृत्ती नष्ट झाली नव्हती. शंकराचार्यांना जोडे मारताना जी शक्ती त्याच्यात होती ]ितच पुढे अबाधित राहिली नव्हे तर ती वृद्धींगत झाली. 

नामदेवने पुर्वायुष्यात दारिद्र्यात दिवस काढले असले तरी नंतरच्या काळात त्याने भोगलेल्या दारिद्र्यावर जणू काही सूडच उगविला. पैसा जमविण्याची त्याची कला औरच होती. जमविलेला पैसा स्वतसाठी वापरला नाही एवढंच नाही तर असंख्य कार्यकर्त्यांना त्याने अक्षरश पोसले. पुण्याचे एकाच वेळी 10-15 कार्यकर्ते आले की नामदेवकडे अनेक दिवस ठाण मांडून रहायचे. त्याने मिळविलेला पैसा वाचविला असता तर नामदेवला अखेरच्या काळात औषधोपचारासाठी उपयोगा आणता आला असता. त्याची आई साळुबाई एकदा मला म्हणाली होती. 'नामुने पैसा साठवला असता तर एक हिर भरली असती. पण याच्या हिरीला खालून भोक'. विहीर भरू शकेल असा पैसा मिळविणारा नामदेव अखेरीस दारिद्रीच राहिला. मुंबईतल्या एका वर्तमानपत्रामद्ये त्याच्या उपचारासाठी मी अर्थसहाय्य करण्याचे अपिल केले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अमिताभ बच्चन, सलमान खान ते काही सनदी अधिकारी यांनी मदत केली. नामदेव बरा झाला परंतु पुन्हा एकदा मृत्यूने त्याच्यावर घाला घातला. वैचारिक मतभेद असले तरी निर्वाज्य प्रेम करणारा मित्र हरपला त्याची व्हील चेअर थांबली त्याला माझा अखेरचा जयभीम. 

ö ज.वि.पवार 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA