नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. याबाबत काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकऱ्यांनी १५ जणांना पकडून दिल्ली पोलिसांकडे सोपवले आहे. त्यांची नावे समोर आली पाहिजे. त्या सर्वांकडे सरकारी ओळखपत्रे आढळली आहेत. आता तुम्ही समजून घ्या सरकार कुणाचे आहे? एका शांततामय आंदोलनास चुकीच्या मार्गाने दर्शवण्याचे हे सुनियोजित षडयंत्र होते, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
याचबरोबर, दिग्विजय सिंह म्हणाले, " शेतकरी संघटना व पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर ट्रॅक्टर रॅलीसाठी तीन मार्ग ठरविण्यात आले होते. सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डर या मार्गावरून ट्रॅक्टर रॅली निघाली होती. सिंघु बॉर्डर व टिकरी बॉर्डरवर ट्रॅक्टर रॅलीला काहीच अडचण आली नाही. गाजीपूर बॉर्डर यामुळे अडचण निर्माण झाली. कारण, दिल्ली पोलिसांनी जो मार्ग दिला होता, त्यांनी तो बदला व तिथं बॅरिकेड्स लावले गेले होते. शेतकऱ्यांनी जेव्हा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुरांचा मारा केला आणि लाठीमार केला. यामुळे परिस्थिती चिघळली आणि हेच कारण ठरले
त्यामुळे आता पोलीस आणि सरकारकडून हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर आतापर्यंत 22 FIR नोंदविण्यात आल्या असून, 200 पेक्षा जास्त समाज कंटकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी जी FIR दाखल केली आहे, त्यातील एका एफआयआरमध्ये 6 शेतकरी नेत्यांची नावे सामील आहेत. यात- राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल आणि जोगिंदर सिंह आहेत. यांच्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीतील नियम मोडल्याचा आरोप आहे.
तर दुसरीकडे आता शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडली आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी कृषी आंदोलनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय किसान युनियन (भान) ठाकूर भानू प्रताप सिंह यांनीही शेतकरी आंदोलनातून माघार घेतली. आंदोलनातून माघार घेणाऱ्या दोन्ही संघटना या उत्तर प्रदेशमधील आहेत.
0 टिप्पण्या