Top Post Ad

लाल बहाद्दूर शास्त्रींच्या मृत्यूचं गूढ

भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री  हे काँग्रेसचेच पंतप्रधान होते. 1965 च्या युद्धात त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांची वैशिष्ट्यं होती. आपल्या काळात त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली होती. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ असं त्यांचं कर्तृत्व होतं. पंडित नेहरूंनंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. शास्त्रीजींना कोणाचाही विरोध नव्हता. नेहरू घराण्याशी त्यांचे चांगले संबंध होते. तरीही आता शास्त्रीजींच्या संशयास्पद मृत्यूबद्दल काँग्रेसला वादाच्या भोवर्‍यात घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला त्यात गमावण्यासारखं काहीच नाही; परंतु ‘काँग्रेसमुक्त भारत’ हे भाजपचं स्वप्न असून त्यासाठी काँग्रेसचं खच्चीकरण करणं, हा भाजपचा डाव आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वारंवार बोलून दाखवलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमधील नेत्यांचा काँग्रेसने सोयीसाठी वापर केला आणि नेहरू-गांधी घराण्याला स्पर्धक ठरू शकणार्‍या नेत्यांचं मुद्दाम खच्चीकरण केलं. त्यात काही अंशी तथ्य असलं, तरी त्याचा भाजप आता फायदा करून घेत आहे. 

अनिल शास्त्रींचं पत्र
जनमानसात स्थान असलेल्या संबंधित राज्यांमधील नेत्यांना आपणच आयडॉल म्हणून पुढे आणत आहोत; काँग्रेसने मात्र त्यांचं खच्चीकरण केलं, असं दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. नेहरू यांच्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान होता आलं नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता असूनही काँग्रेसने त्यांचा पराभव केला. त्यांना पुरेशी संधी मिळू दिली नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस हे नेहरूंचे प्रतिस्पर्धी होते. ते भारतात आले असते तर भारत केव्हाच काँग्रेसमुक्त झाला असता, असं भाजपला वाटतं. नेताजींच्या मृत्यूचा बनाव करण्यात आला. त्यांचा अपघाती मृत्यू झाला नाही, असं आता-आतापर्यंत भाजपलाही वाटत होतं. आता सत्ता आल्यानंतर नेताजींच्या मृत्यूबाबतची कागदपत्रं उघड करता येत नाहीत, असं उत्तर सरकारनं माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नाला दिलं. या पार्श्‍वभूमीवर आता शास्त्रीजींचा मृत्यू नैसर्गिक नाही, तो विषप्रयोगानं केलेला खून आहे आणि त्याबाबतची माहिती काँग्रेसने दडवली, असा आरोप होत आहे. 

भारत आणि पाकिस्तानमधील 1965 च्या युद्धाला पन्नास वर्षं पूर्ण झाली आहेत. या युद्धाच्या स्मारकाला मोदी यांनी भेट दिली. त्याबाबतची कागदपत्रं पाहिली. या युद्धाची जेवढी आठवण करण्यात आली, तिचा जेवढा गवगवा आणि कौतुक करण्यात आलं, तेवढं कौतुक या युद्धाच्या काळात ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं, त्या माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचं मात्र झालं नाही. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याकडच्या नेताजींच्या फार्ईली सार्वजनिक केल्या नसत्या तर शास्त्रीजींच्या मृत्यूशी संबंधित फाईल्स खुल्या करण्याची आठवणही कोणी काढली नसती. आता काँग्रेसचे खासदार असलेल्या शास्त्रीजींचे पुत्र अनिल यांनी शास्त्रीजींच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करणारं पत्र मोदी यांना लिहिलं आहे. मोदी अमेरिकेत असताना या पत्रावरून चर्चा सुरू झाली आहे. शास्त्रीजींचे दुसरे चिरंजीव सुनील हे भाजपमध्ये आहेत. नेताजींच्या अपघाती निधनानंतर वारंवार चर्चा झाल्या. त्याची चौकशी करण्या-साठी तीन आयोग नेमले गेले. नेताजींच्या पुतण्याचाही एका आयोगात समावेश करण्यात आला होता. अपघातस्थळाला भेट न देताच अहवाल तयार करण्यात आल्याचा आरोप झाला होता. शास्त्रीजींच्या मृत्यूची अशी चौकशी झाली नाही. 

रहस्यमय मृत्यू
आता अनिल शास्त्री सांगत असलेली माहिती आणि ताश्कंदमधील आचार्‍याला त्यावेळी केलेली अटक आणि सुटका या बाबी पाहता नेताजींच्या मृत्यूच्या गुढापेक्षा शास्त्रीजींच्या मृत्यूचं गूढ अधिक रहस्यमय असावं, असं मानायला जागा आहे. 1965 च्या युद्धानंतर ताश्कंदमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये करार झाला आणि करारावर सह्या झाल्यानंतर लगेचच शास्त्रीजींचा मृत्यू झाला. त्यांचा गळा काळा-निळा झाला होता. त्यांच्या शरीरावर कापल्याची खूण होती, असं आता सांगितलं जातं. अनेक लोकांप्रमाणे शास्त्रीजींच्या पत्नीलाही तसा संशय होता. देशाच्या पंतप्रधानांचं अचानक निधन होतं आणि त्यांचं शवविच्छेदन होत नाही, येथेच संशय बळावतो. भारतानं पाकिस्तानबरोबरच्या युद्धाप्रसंगी थेट लाहोरपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे काश्मीरसह पाकिस्तानचा काही भागही ताब्यात घेऊन तसा करार करण्याची संधी होती; परंतु शास्त्रीजींनी ताश्कंद करारात भारतानं जिंकलेला भागही परत केला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या कराराबाबत नाराजी व्यक्त केली होती. 

तत्कालीन सरंक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या रोजनिशीतील नोंदीनुसार ताश्कंद करार करणं हे शहाणपणाचं लक्षण होतं. अर्थात चव्हाण यांच्याविषयीही नेहरू घराण्याला नंतरच्या काळात कधी फार प्रेम राहिलं नव्हतं. चीननं हल्ला करण्याची तयारी केली असताना तातडीनं करार करणं जास्त हिताचं होतं, असं चव्हाण यांनी ताश्कंद कराराबाबत म्हटलं आहे. तेव्हाचे गृह सचिव राम प्रधान यांच्या पुस्तकात तसं नमूद करण्यात आलं आहे. भारतानं जिंकलेला हाजीपीर भाग परत दिल्याबद्दलही त्या वेळी टीका झाली होती. प्रधान यांच्या पुस्तकात मात्र भारताचा उद्देश पाकिस्तानला जम्मू-काश्मीर बळकावण्यापासून रोखणं हाच होता, असं नमूद करून 640 किलो मीटरचा भाग भारतानं परत मिळवायला प्राधान्य दिलं. पंतप्रधान मोदी यांनी आता संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना या युद्धाचा इतिहास नव्यानं लिहिण्यासाठी आवश्यक ती तयारी करायला सांगितलं आहे. याचा अर्थ काय घ्यायचा?

दैनंदिनी गायब
लाल बहाद्दूर शास्त्री रोज दैनंदिनी लिहीत. ताश्कंद येथेही त्यांनी हा नियम पाळलाच असणार; परंतु तेथील त्यांची दैनंदिनी सापडत नाही. त्यांना त्यापूर्वी कधीही हृदयविकाराचा झटका आला नव्हता. पंतप्रधानांना कडक सुरक्षा असते. पंतप्रधान दुसर्‍या देशात असल्यास त्याची जबाबदारी भारतीय दूतावासावर असते. अनिल शास्त्री यांनी नेमकं याच मुद्द्यावर आता बोट ठेवलं आहे. ताश्कंदमधील ज्या खोलीत शास्त्रीजी होते, त्या खोलीत साधी बेल आणि टेलिफोन असू नये, याला काय म्हणायचं? 

ताश्कंद करार झाला तेव्हा शास्त्रीजींचं वय 61 होतं. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसून निधन झाल्याचं सांगितलं जातं; परंतु श्रीमती शास्त्री ताश्कंदला गेल्या आणि त्यांनी तेथील खानसाम्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांना  भेटू देण्यात आलं नाही. 11 जानेवारी 1966 च्या पहाटे चार वाजता काय झालं, याबाबत तेथील खानसामा अहमद सात्रोव्ह याची मुलाखत गेल्या वर्षी प्रसिद्ध झाली आहे. तो सांगतो, केजीबी ही रशियाची गुप्तहेर संस्था. तिच्या संचालकानं आपल्याला उठवलं. शास्त्रीजींवर विषप्रयोग झाल्याचा संशय त्याने व्यक्त केला. त्यानेच आपल्यासह चौघांना ताश्कंदपासून तीस किलोमीटर अंतरावरील एका शहरात नेलं. आपल्यावर गुप्तचर यंत्रणेचा संशय होता. त्याच वेळी भारताच्या एका शेफला तिथं आणण्यात आलं. आम्हाला वाटलं, त्यानंच शास्त्रीजींना विषप्रयोग केला असावा. विशेष म्हणजे या सात्रोवला नंतर क्लीन चीट मिळाली. जनरल आयूब खान यांच्यासोबतची रात्री आठ वाजताची बैठक आटोपून शास्त्रीजी खोलीवर आले. तिथं त्यांनी हलकंसं जेवण घेतलं. एक ग्लास दूध घेतलं. हे जेवण भारताचे तेथील राजदूत टी. एन. कौल यांच्या खासगी खानसाम्यानं बनवलं होतं. त्यानंतर त्यांचे सर्व स्वीय सहायक व कर्मचारी इतरत्र गेले. रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला. मध्यरात्री सव्वा वाजता शास्त्रीजींना खोकल्याची उबळ आली. त्यांनी हाका मारल्या. त्यांच्यासमवेत असलेले डॉ. चुग तेथे तातडीनं धावले. त्यांनी तपासणी केली; परंतु तोपर्यंत शास्त्रीजींचं निधन झालं होतं, असा घटनाक्रम दिला जातो.

या पार्श्‍वभूमीवर नेत्यांच्या मृत्यूशी संबंधित कागदपत्रं उघड करावीत की नाहीत, करायची असल्यास आपल्या समाजाची आघात सहन करायची तयारी आहे का, या प्रश्‍नांची उत्तरं शोधावी लागतील. 

- अजय तिवारी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com