प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
ठाणे
वर्षभरात नैसर्गिक संकटांना तोंड देत राज्यातील जनतेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी, अपेक्षांपूर्तीसाठी राज्यशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. ठाणे जिल्हयाचा सर्वांगिण विकास करताना सर्वसामान्य नागरिकानाच केंद्रबिंदू मानून योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत बळीराजाला सावरतानाच कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे असे प्रतिपादन ठाणे जिल्हाचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल,साकेत मैदानावर त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. त्यावेळी नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक , महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी वैदही रानडे, विविध विभागाचे अधिकारी, यांसह स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तात्काळ दिलासा, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कोरोना संकटाशी लढा अशा अनेक बाबींमुळे सरकारवरील जनतेचा विश्वास दृढ झाला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी ‘माझे कुटुंब माझ जबाबदारी’ हे व्यापक अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात आलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सर्व नागरिकांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तिबाधित नागरिकांना मदतीचं वाटप करण्यात आलं. हे सर्व करत असताना या संकटकाळात विकासकामांना खीळ बसणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर राहावं यासाठी ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषिपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नविन कृषीपंप वीज जोडणी धोरण-२०२० जाहीर केलं आहे. या धोरणानुसार कृषिपंप ग्राहकास आवश्यक नियमांचं पालन केल्यास तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. बळीराजाचा सर्वांगीण विकास या दृष्टीने सदर योजनेचा लाभ शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावा आणि शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घ्यावा,त्याचबरोबर पिकेल ते विकेल या धोरणांतर्गत शेतकरी बांधवांकडूनच फळे, भाजीपाला व अन्य आवश्यक वस्तु आठवडी बाजारात खरेदी करण्याचा संकल्प करून आपल्या बळीराजाला सक्षम करू या असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
'हर घर नल से जल'
ठाणे जिल्ह्यात 'हर घर नल से जल' या उपक्रमांतर्गत २०२४ पर्यंत नळाद्वारे दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प केला आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला त्यांच्या घराजवळ नळजोडणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाणीपुरवठा शाश्वत व्हावा, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजनांची पूर्तता या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, ही समाधानाची बाब आहे.असेही शिंदे म्हणाले.
गरिबांच्या घराचे स्वप्न होणार साकार
आपल्या जिल्ह्यात घरांच्या निर्मितीसाठी महाआवास अभियानचा (ग्रामीण) शुभारंभ करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ६६२६ घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी, पाच हजार ६९५ एवढी घरकुलं पूर्ण करण्यात आली आहेत. १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पर्यावरणाचं जतन व संवर्धन हा केवळ सरकारी उपक्रम न राहाता ती प्रत्येकाची जीवनशैली बनली पाहिजे. ‘माझी वसुंधरा’ या अभियानात प्रत्येकाने सहभाग द्यावा. हे अभियान लोकचळवळ करण्यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन शिंदे यांनी केले. आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे. तोवर सर्व सूचनांचं कोटेकोर पालन करा. अजूनही संकट टळलेलं नाही.. लस आलेली असली तरी सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, महिने लागणार आहेत.. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं.. मास्क, सुरक्षित अंतर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा कायम आंगिकार करा. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतली आहे. असा विश्वासही त्यांनी जनेतला दिला.
यावेळी पालकमंत्री महोदयांनी भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध पुरस्कार मिळालेल्या सन्मानार्थींचे, जिल्ह्यातील कोव्हीड योद्धयांचे पालकमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, वीर माता, वीर पत्नी, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ अधिकारी, पत्रकार, कर्मचारी, विद्यार्थ्यांना भेट देऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या