ठाणे :
कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असताना राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई व ठाणे शहरांतील शाळा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळांचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करावे लागणार आहे. ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, स्टार वन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस या कंपनीने या कामासह पेस्ट कंट्रोल देखील विनामूल्य करण्याचे मान्य केले आहे. यासाठी शिक्षण मंडळ समिती सभापती योगेश जानकर यांनी विनंती केली होती.
ठाणे महापालिकेच्या १२४ शाळा असून एकूण ७८ इमारतींमध्ये त्या भरतात. मार्च, २०२० मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या सर्व शाळा बंद करण्यात आल्या. गेल्या सात महिन्यात ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. राज्याच्या अन्य भागांतील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या असल्या तरी मुंबई महानगर क्षेत्रातील शाळांवरील निर्बंध कायम आहेत. गेल्या महिन्याभरात कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याने या भागातील शाळा पारंपारिक पद्धतीने सुरू करण्याबाबत विचार सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत राज्य सरकारकडून त्याबाबतचे निर्देश येतील, अशी अपेक्षा आहे.
परंतु, तत्पूर्वी शाळा सुरक्षित असल्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण करणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तरच ते आपल्या पाल्यांना शाळेत धाडतील. त्यामुळे या शाळांच्या इमारती पूर्णतः सॅनिटाईज्ड करणे, शाळांमध्ये दैनंदिन वापरासाठी सॅनिटायजर्स पुरविणे, विद्यार्थ्यांना मास्कचा पुरवठा करणे आदी सुरक्षेच्या उपाययोजना अत्यावश्यक आहे. शिक्षण समितीचे सभापती योगेश जानकर यांनी नुकताच एका बैठकीत याबाबतचा आढावा घेतला.
शाळांच्या इमारतींचे सॅनिटायझेशन करण्यासाठी जानकर यांनी स्टार वन पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसचे संचालक परशुराम सुतार आणि स्वप्नील आमरे यांच्याशी संपर्क साधला होता. सर्व शाळांच्या इमारतींचे सॅनिटायजेशन करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित होता. परंतु, जानकर यांनी केलेल्या विनंतीनुसार या कामासह पेस्ट कंट्रोल विनामूल्य करण्याची तयारी स्टार वन पेस्ट कंट्रोलने दाखवली असून तसे पत्रही या कंपनीने शिक्षण मंडळाला दिले आहे.
सामाजिक जाणिवेतून मदत
कोरोना संक्रमणाच्या काळात प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती बिघडली असली तरी अनेक जण आजही सामाजिक जाणिवेतून यथाशक्ती मदतीचा हात पुढे करत आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टार वन कंपनीने पुढे केलेला मदतीचा हात आमच्यासाठी अमूल्य आहे.
- योगेश जानकर, सभापती, शिक्षण समिती
0 टिप्पण्या