कुंबळे मंडणगड येथील प्रबोधन विचार मंचाकडून जिजाऊ-सवित्रीना अभिवादन

खेड
 प्रबोधन विचार मंच यांच्या वतीने कुंबळे मंडणगड  येथील हॉलमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब , आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि समाजसेविका समीक्षा लोखंडे यांनी भूषविले. यावेळी समाजसेविका मुनिरा पठाण,माजी सरपंच समीक्षा लोखडे, कविता खैरे, ज्योती लोखंडे, सौ.शिंदे तसेच बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ्‍ उपस्थित होते.

लाटणे ते लॅपटॉप हा आजच्या महिलांचा प्रवास आश्वासक आहे असे विधान  कवी किशोर  कासारे यांनी यावेळी केले.जिजाऊ-सावित्रीचा जीवनसंघर्ष आणि आजची स्त्री या विषयावर मार्गदर्शन करताना कवी  कासारे म्हणाले की,राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन व्यवस्थेत केलेली बंडखोरी आणि मानवतावादी कार्यामुळे आजच्या स्त्रीला मुक्त अवकाश प्राप्त झाले आहे. फुले, शाहू , आंबेडकरांच्या मानवी कार्यामुळे आजची स्त्री लाटणे ते लॅपटॉप असा आश्वासक प्रवास करते आहे .आजच्या स्त्रियांनी मानवमुक्तीच्या लढाईतील या महान विभूतींच्या कार्याचे अनुकरण करणे कालसुसंगत ठरणारे आहे.प्रबोधन विचार मंच त्या दिशेने निर्णायक पाऊल टाकत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना समाजसेविका मुनिरा पठाण यांनी संविधान आणि महिलांचे अधिकार याची मांडणी केली.वर्तमान स्थितीत भारतीय महिलांच्या प्रगतीत भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान बहुमोल आहे, शोषित ,पीडित व विशेषतः महिलांच्या संदर्भाने भारतीय राज्यघटना व त्यातील तरतुदी मुख्य संरक्षक आहेत.            यावेळी कुंबळे येथे २३ महिला बचत गट निर्माण करून ६० लाखापेक्षा अधिक रकमेची उचल करीत महिलांच्या आर्थिक उन्नतीत महत्वपूर्ण वाटा उचलणाऱ्या समाजसेविका समीक्षा लोखंडे, कविता खैरे, ज्योती लोखंडे, सौ.शिंदे आणि मुनिरा पठाण यांचा प्रबोधन विचार मंचाकडून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.विशाल जाधव यांनी केले. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव तर आभार प्रदर्शन स्वानंद जाधव यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या