मुंबई
३ जानेवारी हा सवित्रीबाई फुले यांचा जयंती दिन.लोकांचे दोस्तच्या दोस्त कला मंचने मुंबईतील दादर पश्चिम येथील गुरुकुल स्टुडिओत जयंती दिनाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे २ जानेवरीलाच अगदी थाटामाटात हा सावित्री उत्सव साजरा केला.पुष्कराज उर्फ राजू शिरधनकर,प्रवीण मसुरकर,गजेंद्र मांजरेकर आदींनी तब्बल पंधरा दिवस रिहर्सल आणि आयोजनाची मेहनत करून सावित्री उत्सव खऱ्या अर्थाने सजवला.त्यांच्याबरोबर कल्पना घोक्षे,आदिती पोपट सातपुते,अनिल सावंत तसेच अपूर्वा जाधव व तिची नाटकाची टीम भिडली आणि एक जबरदस्त अनुभव लोकांना देऊन गेली.
आदिती सातपुते या छोट्या गायिकेला आजच मुंबई स्तरावरील हार्मोनियम वादन स्पर्धेत पहिला क्रमांक मिळून ती राज्य स्तरीय स्पर्धेत निवडली गेली.ती स्पर्धा संपवून ती थेट सावित्री उत्सवात सामील झाली आणि आपल्या गाण्याने तिने उपस्थित कार्यकर्त्यांची मनं पण जिंकून घेतली.सुप्रसिद्ध नाट्य आणि कथा लेखिका ऍड.शिल्पा सावंत या केवळ एक कविता सादर करण्यासाठी म्हणून पुण्याहून मुंबईत आल्या आणि आपल्या स्फोटक कवितेने सर्वांना हादरा देऊन पुन्हा पुण्याला रवाना ही झाल्या.व्यावसायिक तबला वादक संकेत पाटील आणि पेटी वादक गोपाळबुवा उंडगे यांनी संगीत साथ देत चोख कामगिरी बजावली पण देऊ करण्यात आलेलं मानधन नाकारलं आणि सावित्रीबाईंच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबईतील माटुंगा रेल्वे स्टेशनच्या एकमेव महिला स्टेशन मास्टर मीना शंटी आणि विविध संघटनांच्या स्त्री पुरुष कार्यकर्त्यांची उत्साहवर्धक उपस्थिती कार्यक्रमात जोश भरत गेली.जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा संजय शिंदे यांच्यासोबत सुनंदा नेवसे,संजीवनी नांगरे,संजीवनी राजगुरू,शैलजा कुडतरकर आदी उपस्थित महिलांनी सावित्रीमाईना पुष्पहार अर्पण करून उत्सवाची सुरवात केली.तर डॉक्टर प्राजक्ता लादे यांनी अचूक सूत्रसंचालन करत कार्यक्रमाचा उत्सवी तोल कायम राखला.
लोकांचे दोस्तचे अध्यक्ष रवि भिलाणे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले की जनसंघटनेच्या लोकांनी आता संसदीय राजकारणात सक्रिय झालं पाहिजे तसंच आपल्या सोबतच्या समूहांचं राजकीय प्रशिक्षण करत भाजप विरुद्ध भारतीय या लढ्यासाठी त्यांना सज्ज केलं पाहिजे.सुप्रसिद्ध लोकशाहीर संदेश गायकवाड यांच्या विद्रोही कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला.सुप्रसिद्ध चित्रकार आणि कला दिग्दर्शक मंगेश साळवी यांनी उत्कृष्ट बॅनर तयार करून दिला तर सावित्रीच्या अनेक लेकरांनी आर्थिक योगदान देत हा उत्सव अर्थपूर्ण केला.तर भानुदास धुरी आणि सचिन मसुरकर यांनी स्वतः पडद्यामागे राहून उत्सव संपन्न केला.
-------------------------------------------------------

0 टिप्पण्या