फडणवीस यांच्यांवरील आरोपांची चौकशी ईडी का करत नाही - एड. सतीश उके


 मुंबईः 
  देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पोलीस दलाचे पगार खाते एक्सिस बँकेत उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. हा निर्णय तेव्हा खूपच वादग्रस्त ठरला होता कारण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्याच बँकेत काम करत होत्या. त्यानंतर नागपूरमधील वकील एड. सतीश उके यांनी यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत ईडीकडे चौकशीची मागणी केली होती. पण त्या मागणीकडे दुर्लक्ष करुन फक्त भाजप विरोधकांनी चौकशी का केली जाते आहे असा सवाल एड. सतीश उके यांनी केला आहे.  एड. सतीश उके यांनी याआधी केलेल्या तक्रारीमुळेच निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपप्रकरणी देवेद्र फडणवीस अडचणीत आले आहेत. सध्या या प्रकरणात ते जामिनावर बाहेर आहेत.  भाजप ईडीचा वापर करुन घेत आहे, पण फडणवीस यांच्यांवरील आरोपांची चौकशी मात्र ईडी का करत नाही असा सवाल त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस पाठवली आहे. याआधी प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांनाही ईडीने नोटीस पाठवली होती. ५५ लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला वर्षा राऊत यांची चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार झाले असल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

या सर्व प्रकरणामुळे  शिवसेना आक्रमक झाली असून ५ जानेवारीला शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा चर्चा होत असतानाच संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले असून ट्विट करत याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना नेत्यांवर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेनेने ईडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यायचे ठरविल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे समजते. येत्या ५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याचं बोललं जात असतानाच संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. ‘या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरु. पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. तूर्त प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिक व शिवसेना प्रेमींची अस्वस्थता मी समजू शकतो,’ अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या