केंद्र राज्यातील संघर्षातून बुलेट ट्रेनचं काम लांबण्याची चिन्हे

ठाणे महापालिकेनं बुलेट ट्रेनच्या थांब्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव गुंडाळून लावल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र जागा मिळाली नाही तर  फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे संकेत रेल्वे मंडळाने दिल्याने केंद्र राज्यातील संघर्षातून बुलेट ट्रेनचं काम मात्र लांबण्याची चिन्हे आहेत. 

बुलेट ट्रेन प्रकल्पात ठाणे-दिव्यालगतच्या म्हातार्डी भागात स्थानक उभारण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मागील आठवड्यात गुंडाळला. यावर बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यांनी “बुलेट ट्रेन प्रकल्प एकत्र करण्याची भारतीय रेल्वेची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने आम्ही योजना तयार करत आहोत. महाराष्ट्र सरकारने पुढील चार महिन्यात जमीन उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे, जर प्रकल्पाला जागा मिळाली, तर बुलेट ट्रेन महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये धावेल. त्याचबरोबर जर जागा उपलब्ध करून देण्यास उशिर झाला, तर पहिल्या टप्प्यात फक्त गुजरातमध्ये बुलेट ट्रेन चालवू शकतो का, याचीही तयारी आम्ही करत आहोत,” असं विनोद कुमार यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून या प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या प्रकल्पात संपादित होणाऱ्या खासगी जमिनींसाठी प्रति हेक्टर ९ कोटी रुपये मोबादला दर निश्चित करण्यात आला. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी हस्तांतरीत केल्याही आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या