'मराठी नाही तर अॅमेझॉन नाही' अशी भूमिका घेत मनसेने अॅमेझॉन विरुद्ध खळखट्याक आंदोलन सुरू केले आहे. पुण्यानंतर मुंबईतील अॅमेझॉनची कार्यालयं फोडली आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवली येथील अॅमेझॉनच्या दोन कार्यालयात घुसून तोडफोड केली आहे. याआधी अॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडण्यात आलं. पुण्यातील कोंढवा भागातील अॅमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.
अॅमेझॉनची वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर इतर भाषांप्रमाणे मराठीतही सेवा उपलब्ध व्हायला हवी, अशी मनसेची मागणी आहे. याबाबत मुंबई अनेक ठिकाणी मनसेने फलक लावले असून मराठीचा आग्रह धरत अॅमेझॉनला निर्वाणीचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अॅमेझॉनने कोर्टात धाव धेतली आहे. अॅमेझॉनने दिंडोशी कोर्टात अर्ज केला असून त्याआधारे कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अॅमेझॉन कंपनी तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामात कोणताही अडथळा आणू नये, असे निर्देश कोर्टने गुरुवारी मनसेला दिले आहेत. अॅमेझॉनकडून मनसेवर जे आरोप करण्यात आले आहेत त्यावर १३ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करावे, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. राज ठाकरे यांनी ५ जानेवारी रोजी कोर्टात प्रत्यक्ष हजर राहावे, असे कोर्टाने बजावले आहे.
अॅमेझॉन कंपनी व या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामात कोणतीही आडकाठी आणू नये, असे निर्देश मुंबईतील दिंडोशी दिवाणी न्यायालयाने मनसेला दिले असताना मनसेने मात्र आपला अॅमेझॉन विरोध कायम ठेवला आहे. मुंबईतील चांदिवली येथे आज मनसैनिकांनी अॅमेझॉनच्या वेअरहाऊसची तोडफोड केली. या घटनेनंतर अॅमेझॉन विरुद्ध मनसे हा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतल्यानंतरही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. 'महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल', असे मनसेने गुरुवारीच ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. त्यानंतर आज मुंबईत चांदिवली येथील साकीविहार मार्गावर अॅमेझॉनचे वेअर हाऊस फोडण्यात आल्याने संघर्षाला अधिकच धार चढली आहे. याआधी मनसैनिकांनी पुण्यातील कोंढवा आणि औरंगाबादमध्येही अॅमेझॉनच्या कार्यालयांची तोडफोड केली आहे. न्यायालयाचे निर्देश असतानाही मनसेने अॅमेझॉनवरील हल्ले सुरूच ठेवून एकप्रकारे खुले आव्हानच दिले आहे.
अॅमेझॉन कंपनीने मनसेविरुद्ध कोर्टात धाव घेतल्यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने कालच ट्वीटर हँडलवरून आपली परखड भूमिका मांडली. 'व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर काहींनी चालढकल केली. त्यात सणासुदीमध्ये कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला. पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा करणार असाल आणि त्यासाठी लढणाऱ्या मनसेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसे प्रत्युत्तर दिले आहे ह्याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर तेही पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही, इथे फक्त मराठी माणसाचीच 'राज'वट असेल!', अशा शब्दांत मनसेने अॅमेझॉनला लक्ष्य केलं आहे.
0 टिप्पण्या