Top Post Ad

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसर लवकरच समस्यामुक्त होणार

मुंबई : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात येत असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामांसह एमआयडीसी परिसरातील समस्या सोडवण्याबाबत एमआयडीसी सहकार्य करेल, अशी ग्वाही बुधवारी देण्यात आली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यात बुधवारी वागळे इस्टेट परिसरातील नागरी समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

 मंत्रालयातील  देसाई यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत क्लस्टर योजनेतील एमआयडीसीच्या जागेवरील रहिवाशांची आकडेवारी सादर करण्यास देसाई यांनी सांगितले. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील ७६ हेक्टर जागेवर अनधिकृत इमारतींमध्ये सुमारे ५० हजार रहिवासी राहतात. यातील अनेक इमारती धोकादायक बनल्यामुळे येथील रहिवाशांचे लवकरात लवकर पुनर्वसन करण्याची गरज आहे. प्रत्येक पावसाळ्यात यातील काही इमारती कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांना नाहक जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे येथे जाहीर करण्यात आलेल्या क्लस्टर योजनेला गती देण्यासाठी एमआयडीसीने सहकार्य करत आवश्यक मंजुऱ्या वेगाने द्याव्यात, अशी विनंती शिंदे यांनी देसाई यांना केली. त्यावर देसाई यांनी रहिवाशांची आकडेवारी सादर करण्यास सांगितले.

वागळे इस्टेट परिसरात नवीन आयटी पार्क आणि वाणिज्यिक आस्थापना आल्याने येथील रहदारी वाढली असून सध्या असलेले अंतर्गत रस्ते अपुरे पडू लागले आहेत. या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची योजना ठाणे महापालिकेने हाती घेतली असली तरी त्यासाठी एमआयडीसीची परवानगी गरजेची आहे. या रस्त्यांच्या प्रस्तावांबाबतही बैठकीत चर्चा झाली असता याबाबतही एमआयडीसी सकारात्मक असल्याचेही देसाई यांनी सांगितले. याशिवाय, या परिसरातील वाढती लोकसंख्या व वाहनसंख्या पाहाता तिथे पार्किंग प्लाझा व नवीन रुग्णालय उभे करण्यासाठी भूखंड देण्याची मागणी यावेळी ठाणे महानगरपालिकेने केली असता याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देसाई यांनी दिले.  वागळे इस्टेट परिसरातील ड्रेनेज सिस्टीमची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी ठाणे महानगरपालिकेला द्यावी, अशी मागणी देखील यावेळी देसाई यांच्याकडे करण्यात आली. यासंदर्भात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र चर्चा करून प्रस्ताव दिल्यास त्याचा निश्चितच विचार करू, असे आश्वासन देसाई यांनी दिले.

या बैठकीला डॉ. आम्बलगम आणि ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, यांच्यासह दोन्ही विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वागळे परिसरातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन माननीय उद्योगमंत्र्यांनी दिले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com