कोरोना रुग्णालयाकरिता घेतलेल्या नवीन साहित्याची दुरावस्था

ठाणे

कोरोना महामारीचा उपयोगही राज्यकर्त्याँनी आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांना स्वत:च्या फायद्याकरिता केला असल्याचे  उघडकीस येत आहे. काही महिन्यापूर्वी सेन्ट्रल किचनचा घोटाळा उघडकीस आला मात्र अद्यापही त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण महापालिकेने दिलेले नाही. त्यानंतर कोरोना किटच्या व्यवहारातही घोटाळा झाल्याची चर्चेत होती. आणि आता तर कोरोना रुग्णालयाकरिता घेतलेले साहित्य शेकडो नवे कोरे बेड आणि इतर विविध वस्तू शाळांच्या बाहेर पडून असल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे कोट्यावधी रुपयांचा महसूल सर्वसामान्य नागरिकांकडून वसूल करून त्याचा अशा तऱ्हेने वापर होत असल्याने ठाणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  

ठाणे महापालिकेने कोरोना सेंटरसाठी विविध साहित्य खरेदी केले. महासभेपुढे सादर करण्यात आलेल्या गोषवाऱ्यानुसार महापालिकेने आतापर्यंत २७ हजार उशी कव्हर, २१ हजार बेडशीट, २१ हजार टॉवेल, १८ हजार नॅपकीन, १४ हजार बादल्या, ३ हजार कचऱ्याची सुपडी आदी साहित्यांबरोबर बेड व मॅट्रेस खरेदी केल्या आहेत. मात्र, या साहित्याचा उपयोग न करता ते पडून असल्याच्या तक्रारी होत्या. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता कोरोना हॉस्पिटल व क्वारंटाईन सेंटरसाठी खरेदी करण्यात आलेले शेकडो नवे कोरे बेड शिवसमर्थ विद्यालयाच्या मैदानात पडून असल्याचे  उघडकीस आले. तर वीर सावरकरनगरमधील शाळेतही रुग्णांसाठी खरेदी केलेल्या विविध वस्तू वापराविना आढळल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी हा प्रकार उघड करून कोरोना आपत्तीत केलेली विविध साहित्याची जम्बो खरेदी कोणाचे पोट भरण्यासाठी केली होती, असा सवाल केला. त्याचबरोबर या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे

गडकरी रंगायतनसमोरील शिवसमर्थ विद्यालयात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार होते. मात्र, तेथे क्वारंटाईन सेंटर उभारले गेले नाही. परंतु, त्याठिकाणी पाठविण्यात आलेले नवे कोरे बेड मैदानात पडून आहेत. ऊन-पावसामुळे काही बेडला गंजही लागला आहे. महापालिकेच्या वीर सावरकर नगर येथील शाळा क्र. १२० मध्येही कोविड रुग्णांसाठीचे साहित्य वापराविना पडून आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी आज हा प्रकार उघड केला.
कोरोनाची आपत्ती लक्षात घेऊन महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी अनिर्बंध खरेदी केली. आवश्यकतेनुसार वस्तू खरेदी करण्याची गरज होती. मात्र, केवळ लूट करण्यासाठी साहित्याचे आकडे फुगविण्यात आले, असा आरोप नगरसेवक नारायण पवार यांनी केला. संबंधित कंत्राटदारांना बेडच्या आवश्यकतेनुसार कार्यादेश देण्याची गरज होती. विविध साहित्य साठविण्यासाठी महापालिकेकडे गोदामही नव्हते. मात्र, एकाच वेळी साहित्य खरेदीचा अट्टाहास का करण्यात आला, असा सवाल नारायण पवार यांनी केला. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी पवार यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या