मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांचे बाबासाहेबांना अभिवादन,

ठाण्यातही  पालकमंत्री आणि महापौरांनी केले अभिवादन

 मुंबई 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करून बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

निळा भीमसागर चैत्यभूमीवर उसळत असे. महासागराला शिस्त लावता येत नाही. पण भीमसागराला बाबासाहेबांनी शिस्त दिली आहे. त्याला चौकट आखून दिली आहे, हे दिसून आले. त्यामुळेच आज आपण या संकटाकाळात गर्दी न करता अत्यंत संयमाने अभिवादन करतो आहोत. अनेकांनी चैत्यभूमीवर न येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. जिथे आहेत, तिथून त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यासाठी भीमसैनिक, बाबासाहेबांचे अनुयायी आणि बांधवांना धन्यवाद देतो', अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले..

 डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला व समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन पवार यांनी डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचे संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असे  अजित पवार म्हणाले.

इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच 14 एप्रिल 2023 ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत ना. मुंडे बोलत होते.


ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “भारतरत्न डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस मा.महापौर नरेश गपणत म्हस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर सौ.पल्लवी  कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता फाटक, उप आयुक्त संदीप माळवी तसेच महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA