मुंबई
राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात ईडी (सक्तवसुली संचालनालय)ने समन्स बजावले आहे. त्यांना येत्या ३० डिसेंबर राेजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ईडी, सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा ईशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे. “खडसे यांना ईडीची नोटिस पाहता या सर्व गोष्टी फक्त राजकारणासाठीच होतात. मी २०१६ पासून लढत आहेत. आता ईडीला जाग आली का,” असा सवाल त्यांनी केला. अंजली दमानिया आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद हा सर्वांना माहित आहे. दमानिया यांनी खडसे यांच्यावर एकापाठोपाठ अनके गंभीर आरोप केले होते. त्यांच्या आरोपांमुळे खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली होती.
अंजली दमानिया म्हणाल्या, “ईडी, सीबीआय आणि पोलीस यांचा सर्रास वापर राजकारणात होतो. एनडीए किंवा भाजप सगळ्यांनीच या यंत्रणांचा वापर केला. खडसेंनी आपल्याला नोटीस मिळाली नाही असे म्हटलंय. पण याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. आमच्या दोन याचिका कोर्टात आहेत. ईडीने याची सर्रास चौकशी करावी. ईडीने स्टेटमेंटसाठी बोलावलं की मी नक्कीच जाणार”.“आता केंद्रामध्ये भाजप सत्तेत आहे. त्यांनी ईडीचा वापर केला यात काहीही शंका नाही. त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल करणार आहे’, असे दमानिया म्हणाल्या आहे. तसेच “तिन्ही मोठे पक्ष, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात, आणि बदनाम आमच्यासारख्यांना करतात, जे भ्रष्टाचाराचा लढा देत आहेत”, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान खडसे यांनी आपण या चाैकशीत सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून सहकार्य करणार असल्याचे जळगावात पत्रकारांशी बाेलताना सांगितले. भाेसरी येथील भूखंड खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हाेता. या प्रकरणात गेल्या पाच वर्षांत पुणे आणि नाशिक येथील अॅन्टिकरप्शन ब्युराेतर्फे वेगवेगळी चाैकशी झाली. त्याशिवाय झाेटिंग समिती आणि आयकर विभागानेदेखील स्वतंत्र चाैकशी केली आहे. यापूर्वी चार एजन्सीमार्फत चाैकशी केलेली असून ईडी या प्रकरणाची चाैकशी करणारी पाचवी एजन्सी आहे. शासकीय मूल्यांकनानुसार ५ काेटी रुपयांमध्ये हा भूखंड खरेदी केलेला हाेता. माझ्या कुटुंबातील व्यक्तीने ताे खरेदी केला; परंतु त्याच्याशी माझा संबंध नव्हता, असे एकनाथ खडसे पत्रकारांशी बाेलताना म्हणाले. या प्रकरणातील सर्व कागदपत्रांसह आपण या चाैकशीला उपस्थित राहून पूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसे यावेळी म्हणाले. राष्ट्रवादीत प्रवेश केला त्याच दिवशी आपण ईडी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली हाेती.
0 टिप्पण्या