Top Post Ad

राज्यात ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू

मुंबई

 राज्यात ५ जानेवारीपर्यंत  महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला  आहे. तसेच संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी घेतलेल्या बैठकीत सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.

ब्रिटन मध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


दरम्यान ब्रिटनमध्ये कोरोनाव्हायरचा नवीन स्ट्रेन आढळल्यानंतर उद्भवलेली परिस्थिती पाहता केंद्र सरकारने यूकेतून भारतात होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 22 डिसेंबर रात्री 11.59 वाजेपासून 31 डिसेंबर रात्री 11.59 पर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे. उद्या जे लोक भारतात येतील त्यांची विमानतळावरच RT-PCR चाचणी केली जाणार आहे. ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरसमध्ये म्यूटेशन (कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट) असल्याचे समोर आले आहे. हा स्ट्रेन पहिल्यापेक्षा 70% अधिक संसर्ग पसरवणारा असल्याची शक्यता आहे. कोरोनाच्या या नवीन स्ट्रेनमुळे भारतातही दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका सर्व्हेक्षणात 50% लोकांनी व्हायरसच्या नवीन स्वरूपामुळे पीडित देशांमधून विमानांची आवकजावक बंद करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे ब्रिटनमध्ये मिळालेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेनमुळे घाबरण्याचे काही कारण नाही. सरकार याबाबत सतर्क असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.

व्हायरसमध्ये सतत म्यूटेशन होत असते, म्हणजे याचे गुण बदलत असतात. म्यूटेशन होणारे बहुतेक व्हायरस स्वतःच संपतात, परंतु कधीकधी हे पूर्वीपेक्षा अधिक पटीने मजबूत आणि धोकादायक बनतात. ही प्रक्रिया इतक्या वेगाने होते की वैज्ञानिकांना एक रूप समजेपर्यंत नवीन रूप समोर येत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाव्हायरसचे नवीन रूप पूर्वीपेक्षा 70% जास्त धोकादायक असू शकते, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.  ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन VUI-202012/01 आढळला आहे. हा अत्यंत सुपरस्प्रेडर असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या फ्लाइट्स बंद केल्या आहेत. या दहशतीत सोशल मीडिया कम्युनिटी LocalCircles ने सोमवारी दिल्लीत 7091 लोकांमध्ये सर्व्हेक्षण केले. यापैकी 50% लोकांनी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि कोरोना व्हायरसच्या नवीन स्वरूपामुळे प्रभावित सर्व देशांमधून भारतात ये-जा करणाऱ्या फ्लाइट्स तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com