Top Post Ad

हाथरस प्रकरण: सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल


 लखनऊ :
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षांच्या  मुलीवर १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार केला होता.  सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी  सीबीआयने चार आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल  केले आहे. आधार म्हणून सीबीआयने आपल्या आरोपपत्रात पीडितेचे शेवटचा जबाब ग्राह्य धरला आहे. आरोपींच्या वकिलांनी कोर्टाबाहेर पत्रकारांना सांगितले की, केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने संदीप, लवकुश, रवी आणि रामू यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि हत्येचे आरोप केले आहेत आणि हाथरस येथील स्थानिक न्यायालयाने दखल घेतली आहे. आरोपींचे विविध फॉरेन्सिक तपास गुजरातमधील गांधीनगर येथील प्रयोगशाळेत केले गेले आहेत. सीबीआयच्या तपास करणाऱ्यांनी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या डॉक्टरांचीही भेट घेतली. सामूहिक बलात्काराच्या कथित घटनेनंतर पीडितेला त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.   

 उपचारादरम्यान पीडितेचा २९ सप्टेंबर २०२० रोजी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. यानंतर ३० सप्टेंबरच्या रात्री तिच्या घराजवळील रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्थानिक पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव आणला असल्याचा आरोप या पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'अंत्यसंस्कार कुटूंबाच्या इच्छेनुसार करण्यात आले.' उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारला या प्रकरणावर व्यापक टीकेला सामोरे जावे लागले. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने घटनेच्या चौकशीसाठी एक पथक स्थापन केले आणि तपासणीचे काम त्याच्या गाझियाबाद (यूपी) युनिटकडे सोपवले. या पथकाने पीडितेच्या कुटूंबाच्या सदस्यांची विधाने नोंदविली आहेत.

-----------------------------------------------------------------------------

हाथरस : जातीव्यवस्थेचे प्रतिक
१४ सप्टेंबरला मुलीवर बलात्कार होतो. या घटनेची कुठे वाच्यता होऊ नये म्हणून त्या मुलीची जीभ कापली जाते. पाठीचा कणा मोडून टाकला जातो. आणि हा गुन्हा करणारे हैवान पसार होतात. पीडित मुलीचे मायबाप पोलिस ठाण्यात जातात. सरकारी दवाखान्यात जातात. पण त्यांना सहकार्य केले जात नाही. सरतेशेवटी कसेतरी करून सफदरजंग येथील हॉस्पिटलमध्ये त्या मुलीवर उपचार केले जातात. उपचार सुरू असतानाच त्या मुलीचा जीव जातो. पण, पुलिस ठाण्यात बलात्काराचा साधा गुन्हा दाखल केला जात नाही!  भाजपवाले 'असा' गुन्हा घडलाच नाही, अशी मखलाशी करतात. त्या मुलीच्या मृतदेहाचे परस्पर शवविच्छेदन केले जाते. तो रिपोर्ट तिच्या कुटुंबीयांना दाखवला जात नाही. त्या मृतदेहाला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जात नाही. कुटुंबातील सर्व नातेवाईकांना घरात कोंडून त्या पीडित मुलीचा मृतदेह पोलिस परस्पर पेट्रोल टाकून जाळून टाकतात. मृतदेहाची राख गोळा करू दिली जात नाही. तेथील जिल्हाधिकारी कुटुंबातील सदस्यांना दम देतो. मदतीच्या नावाखाली पैसे देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातो! युपीतील योगीचे शासन यावर काहीच ॲक्शन घेत नाही. थातुरमातुर दिखाव्याच्या काही घोषणा केल्या जातात. कारण हे सर्व व्यवहार शासनाच्या इशाऱ्यावरच तेथे केले जात असतात.

का केले हे असे? :- बलात्काराची तक्रार ठाण्यात कुणी घेऊन आले तर काय काय करायचे, हे सर्व निर्देश ठाऊक असतानाही या प्रकरणात प्रशासन तसे करत नाही. प्रकरणातील दोषींवर सहा दिवसांपर्यंत कोणतीही कारवाई होत नाही. भीम आर्मीचे चंद्रशेखर या घटनेच्या विरोधात आवाज उठवतात. पण तो आवाज दडपला जातो. बलात्कार होऊन, जीभ कापून, पाठीचा कणा मोडून गंभीर गुन्हा घडलेला असतानाही प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही. पीडित मुलगी मरून जाते. तिच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावली जाते. शासन-प्रशासन कोणतीही संवेदनशीलता प्रकट करत नाही. उलट, त्यांची असंवेदनशील वृत्तीच सगळीकडे व्यक्त होत गेलेली दिसते. असे का? तर.. गुन्हेगार हे उच्च वर्णीय 'ठाकुर' समाजातील मुले आहेत. बिहारमध्ये निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. येथील (युपीमधील) ठाकुर समाजातील गुन्हेगार मुलांवर कारवाई केली तर तेथील (बिहारमधील) ठाकुर समाज नाराज होईल, आपल्या विरोधात जाईल. त्याचा परिणाम आपल्या मतदानावर होईल. म्हणून युपीमधील हे प्रकरण मोदी आणि योगी सरकार अत्यंत क्रूरपणे प्रशासनाच्या मदतीने दडपून टाकते. यावरून जेवढे क्रौर्य हा बलात्कार करणाऱ्या त्या हैवानात आहे, तेवढेच क्रौर्य या शासन-प्रशासनाच्या लोकांतही आहे, हे याठिकाणी स्पष्टपणे दिसून येते. हे वास्तव जेव्हा बाहेर येते तेव्हा तेथील शासन-प्रशासनाकडून अधिकच निष्ठूरपणाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतो. या पार्श्वभूमीवर मीडिया विशेषतः 'एबीपी-माझा', सोशल मीडिया आणि विरोधी पक्ष आक्रमक होतात. 

शासन-प्रशासनाचा बनाव : - दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित भयग्रस्त कुटुंबाच्या भेटीसाठी व त्यांच्या सांत्वनासाठी पायी प्रवास करून त्या गावाकडे जायला निघतात, तेव्हा पोलिसबळाचा वापर करून त्यांना रोखले जाते. अटक केली जाते. धक्काबुक्की करून खाली पाडले जाते. पीडित कुटुंबातील सदस्यांना भेटायला जाणाऱ्या लोकप्रतिनिधींशी पोलिसांकडून हा असा दुर्व्यवहार केला जातो. (इकडे महाराष्ट्रात मात्र एका फटीचर न(क)टीला Y+ सुरक्षा पुरवली जाते.) पत्रकारांना रोखले जाते. त्यामुळे 'एबीपी माझा' या दूरचित्रवाहिनीचे पत्रकार दि. २ ऑक्टोबर रोजी 'सत्याग्रह' करतात. २७ तास हा सत्याग्रह चालतो. पीडित कुटुंबातील सदस्यांना कुणालाही भेटू दिले जात नाही. कारण काय सांगितले जाते? तर, तेथे SIT ची टीम गेलेली आहे म्हणून! प्रत्यक्षात त्या टीमने पीडित कुटुंबातील एकाही सदस्याची भेट घेतलेली नसते. त्यांच्याकडून कोणतीही विचारणा केलेली नसते. त्या कुटुंबातील सदस्यांच्या मुलाखतीतून हे वास्तव समोर येते. 

खरी पत्रकारिता :- खऱ्या पत्रकारितेची भूमिका काय असते? हे लक्षात घेऊन 'एबीपी-माझा' बरोबरच इतर मीडियाने घेतलेली भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरते. 'आज-तक'च्या पत्रकार तनुश्रीने पीडितेचा मृतदेह जाळण्याची पोलिसांनी केलेली अपराधजनक कृती लपून चित्रीत केली. तिचे हे धाडस खूपच मौलिक व कौतुकाचे आहे.  मीडियाने प्रकरण लावून धरल्यामुळेच एका खेडेगावात घडलेले हे प्रकरण देशभर पसरले. तरीही, योगी सरकारचा कोणताही मंत्री, कोणताही खासदार, कोणताही आमदार, पक्षाचा कोणताही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता त्या पीडित कुटुंबाच्या भेटीला जात नाही. यावरून दलित समाजाविषयीची त्यांची भावना काय आहे ते स्पष्ट होते! 

प्रियंका-राहुल यांचा निर्धार :- पीडित कुटुंबातील सदस्यांना भेटायला निघालेल्या प्रियंका-राहुल यांना रोखले, अटक केली आणि दिल्लीला परत पाठवले, तरीही 'पीडित कुटुंबातील सदस्यांना भेटण्यापासून आम्हाला कोण रोखतंय, ते आम्ही पाहूच!' असे ट्विट करत राहुल-प्रियंका पुन्हा दुसऱ्या दिवशी हाथरसकडे रवाना होतात. त्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती असावी अशासारखे पोलिस उत्तरप्रदेशच्या सीमेवर तैनात केले जातात. यमुना एक्सप्रेस वेवर राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना पुन्हा अडवले जाते. कार्यकर्त्यांना लाठीकाठीने मारले जाते. प्रियंका मध्ये पडतात. वार झेलतात. नंतर प्रकरण काहीसे शांत करत पाच लोकांना पीडित कुटुंबातील सदस्यांना भेटायला जाण्याची परवानगी दिली जाते. प्रियंका स्वत: गाडी चालवत त्या पीडित कुटुंबाला भेटायला रवाना होतात. त्यांना कोणतीही सुरक्षा दिली जात नाही. एवढे कठोरपणे युपीचे शासन-प्रशासन या प्रकरणात वागले आहे!

अख्खा देश थुंकतो आहे! :- या प्रकरणातील पीडित कुटुंबाची काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी शनिवारी भेट घेण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी प्रियंका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या गैरवर्तनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत एक पोलीस कर्मचारी प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना पकडून खेचताना दिसून येत आहे. प्रियंका गांधींचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका होत आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या गैरवर्तनावर आता अख्खा देश थुंकतो आहे! 

दलितांचे कैवारी कुठे? : - अशावेळी महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगना प्रकरणात तत्परता दाखवणाऱ्या भाजप-धार्जिण्या रामदास आठवलेंची कुठेही तत्परता दिसून येत नाही. उलट, 'इस प्रकरण में योगी सरकार अच्छा काम कर रहीं है'! असे निर्लज्ज समर्थन आठवले करताना दिसून येतात. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना घरात डांबून त्या मुलीचा मृतदेह परस्पर जाळून टाकणाऱ्या कृत्याला रामदास आठवले हे "अच्छा काम" म्हणून संबोधत असतील तर त्यांनी निर्लज्जपणाचा अगदी कळस गाठलेला आहे, तेथून त्यांचा कडेलोट होण्याची आता गरज आहे, असे आंबेडकरी चळवळीतील लोकांना वाटू लागले तर नवल नाही!

असंवेदनशील शासन-प्रशासन :- देशात किंवा जगात कुठेही बलात्काराच्या घटना घडतात, त्यानंतर शासन-प्रशासनाने त्या पीडितेच्या व तिच्या कुटुंबीयांच्या सोबत संवेदनशील वृत्ती दाखवण्याची गरज असते. दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणात तेव्हाचे तेथील सरकार त्या पीडितेच्या व तिच्या कुटुंबीयांच्या सोबत होते. युपीतील हाथरस प्रकरणात पीडित मुलगी बलात्कार झाल्यानंतर जिवंत असताना तिच्यासोबत व तिच्या कुटुंबीयांसोबत झालेला शासन-प्रशासनाचा असंवेदनशील व्यवहार, त्यानंतर त्या मुलीच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून परस्पर जाळून टाकण्याची पोलिसांची अमानवीय कृती, कुटुंबातील सदस्यांवर सुरू केलेला अत्याचार, शासन-प्रशासनाकडून त्यांना धमकावले जाण्याची वृत्ती; आणि गुन्हेगारांना सत्तेकडून दिले जाणारे अभय या सगळ्या गोष्टीं लक्षात घेतल्यास योगी सरकारची अमानवी वृत्ती व असंवेदनशीलता चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाही! तरीही, अशा वृत्तीची व वर्तनाची कुणाला चीड येत नसेल आणि भाडखाऊ मनाने जर कुणी त्या वृत्तीचे समर्थनच करत असतील तर ते मानवीकुळातले लोक नाहीत! हैवान आहेत, हैवान! बलात्कार करणारे जेवढे हैवान, तेवढेच योगी शासन-प्रशासनाची पाठराखण करणारे हेही हैवानच! घटना घडतात, पण सरकारची संवेदनशीलता महत्त्वाची असते. ती जेव्हा दिसत नाही, तेव्हा चीड आल्यावाचून राहत नाही.

बोथट मने : - सारा देश या प्रकरणाने अस्वस्थ असताना समाजकारणाच्या बाता मारणारे, राजकारणाच्या गोष्टी हेपलणारे आणि स्वत:ची प्रतिष्ठा मिरवण्यासाठी विद्रोहाचे निव्वळ साहित्य लिहिणारे नुसत्या आपापल्या जाहिराती करण्यातच धन्यता मानत असतील तर या सर्वांना त्यांचा 'फालतू' चेहरा आपण दाखवला पाहिजे! अटीतटीच्या प्रसंगी व्यापकपणाने दडपशाही करणाऱ्या सत्तेच्या व व्यवस्थेच्या विरोधात तुम्हाला भूमिका घेता आली पाहिजे! कारण, तूर्तास हा अटीतटीच्या लढतीत लढण्याचा काळ आहे, स्वप्नरंजनाचा नाही! एवढे ध्यानी  ठेवावे.

प्रो. डॉ. अशोक नामदेव पळवेकर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com