Trending

6/recent/ticker-posts

शेतकरी योजनांच्या लाभाकरिता महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु

ठाणे
कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. ज्या शेतकरी बांधवांनी महा डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक  31 डिसेंबर 2020 पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत .या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील.असे आवाहन पुणे कृषी आयुक्त  धीरजकुमार यांनी केले आहे.

          योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पुर्व संमती देणे,मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.  महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे .यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास  पुन्हा  भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये  शेतकरी बदल करू शकतात .तरी आवाहन करण्यात येते की, सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी  महा डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी .

------------------------


जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेचे कर्मचाऱ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन करणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन*
*दिनदर्शिकेचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते प्रकाशन*

कार्यालयीन प्रशासकीय कामकाजा संदर्भात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन करणारी  २०२१ सालाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सभागृहात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषि-पशु व दुग्धशाला समिती सभापती संजय निमसे, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमाळे, समाज कल्याण समिती सभापती नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते , मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुभाष भोर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार, तसेच सर्व स्थायी समिती सदस्य व सर्व खातेप्रमुख  अधिकारी , कर्मचारी  उपस्थित होते. 

या दिनदर्शिकेतून महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, गटविमा योजना वर्गणी, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती दर स्थानिक पूरक भत्ता, वाहतूक दर, व्यवसायकर, सन अप्रीम, आयकर दर २०१९ - २०  प्रशासकीय लेखन. टिपणीलेखन, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ सभा कामकाज , सेवा पुस्तक आद्यायावत ठेवणे ( महाराष्ट्र नागरी ( सेवेच्या शर्ती )१९८१) , सेवा नियम महत्वाच्या तरतूदी ( महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम १९८१),  मत्ता दायित्व, सेवा जेष्ठता यादी, गोपनीय अहवाल , पदोन्नतीसाठी आवश्यक बाबी, अभिलेख वर्गीकरण, बिंदू नामावली करावयाची कार्यवाही , ( महाराष्ट्र नागरी सेवा ( सेवा निवृत्ती ) नियम १९८२ सेवानिवृत्ती, कुटुंबनिवृत्ती अंशराशीकरण, पेशन केस पेपरसेट, विभागीय चौकशी कार्यपध्दती, वैद्यकीय देयक मंजूरीसाठी टिपणी व आदेशाचा नमुना आदी प्रशासकीय बाबींची माहिती कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश महाळुंगे यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच सक्रिय असते. ठाणे जिल्ह्यात अध्यक्ष प्रकाश म्हाळुंगे सचिव संदेश म्हस्के उपाध्यक्ष अजय भोंडीवली,कार्याध्यक्ष मनोहर शेजवळ, कोषाध्यक्ष संजय कवडे प्रमुख सल्लागार दिलीप भराडे,तसेच विविध पदावर विवेक पवार, राजेंद्र गायकवाड, समीर राऊत, शुभांगी राऊत, कल्पना तोरवणे, विद्या विचारे, पद्माकर राठोड,नितीन घोडके, सतीश खरे पद्माकर व्यापारी, महेश बागराव, रुपेश पाटील, संतोष सुरोशी आदी कर्मचारी संघटनेत कार्यरत आहेत.


Post a Comment

0 Comments