Top Post Ad

संघातील क्रांतिकारी, विद्रोही विचारवंत

 भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर
 अखिल भारतीय भिक्खूसंघातील क्रांतिकारी विनयशील, विद्रोही विचारवंत.) 

                               -- " भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र' M.A Pali , NET  ( 8080882905 ) 

“चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय-बहुजन सुखाय” पू. भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थवीर यांचा जन्म 19 डिसेंबर 1933 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बुद्धकुटी भीमनगर येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव वैद्यराज उत्तम तुकाराम होसल्ये (आबासाहेब U.T HAUSALYE) असे होते. त्यांनी तात्कालिन शिक्षण व्यवस्थेमध्ये सातवी बोर्डात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविला. पुढे 1972 साली त्यांनी भदंत उपाली पंडित यांच्याकडून कळंबला प्रवज्या घेतली. (श्रामनेर दीक्षा घेतली.) तर 29/10/1976 साली अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक पूज्य भदंत आनंद महास्थविर यांनी त्यांना उपसंपदा दिली. तेंव्हापासून भंतेजी अखिल भारतीय भिक्खू संघाचे प्रशिक्षण सचिव आहेत. अश्या या त्रिरत्नाप्रती श्रद्धाबुद्धीने समर्पित असलेल्या आमच्या आचार्योपाध्यायास प्रथमता त्रिवार अभिवादन करतो. 

भारत देशात जाती, रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा पसरल्यामुळे प्रत्येक समाज विखुरलेला होता. या परिस्थितीतही हौसल्य परिवार धनसंपन्न होता. भन्तेजींचे पंजोबा 'संतूनरसू' हे व्यक्तिमत्वाने शुरविर होते.  भन्तेजींचे बालपण हे एका विद्रोही क्रांतिकारकाप्रमाणे होते. वाढत्या वयाप्रमाणे त्यांच्या क्रांतिकारक विचाराला बाबासाहेबांची प्रेरणा मिळत गेली. 

1952 साली घरातील अडीच किलो चांदी आणि 2 किलो रुपे तांबे-पितळाचा देव्हारा मांजरा नदी काठी चेचून सोनारास विकला. देव दप्तरामध्ये चोरून नेला म्हणून आईने खूप झिडकारले , खूप शिव्याही दिल्या पण शेवटी ते आईला समजावण्यात यशस्वी झाले. 1954 साली चैत्रपौर्णिमेच्या दिवशी येरमाळाच्या यात्रेत विनायक भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाईट परंपरा स्विकारलेल्या माणसांना माणसासोबत माणुसकीने वागायला शिकविले. या सर्व गृहस्थी संसारातील जीवनात त्यांच्या मणी वैराग्याचा उदय झाला. आणि 1974 साली परिव्रज्या तर 1976 साली उपसंपदा बुद्धगया येथे थाई विहारात कठीण चिवरदानाच्या दिवशी जवळपास 125 भिक्षु संघाच्या उपस्थितीत प्राप्त केली. 

वयाच्या अवघ्या 40-41 व्या वर्षी भंतेजी अखिल भारतीय भिक्खू संघाचे सदस्य ते प्रशिक्षण सचिव या पदापर्यंत पोहोचले. 1985 साली भंतेजी थेरो (स्थवीर) बनले तर 1995 साली भंतेजी महाथेरो (महास्थवीर) बनले. आजपर्यंत भन्तेजींचे एकूण 45 वर्षावास संप्पन्न झालेले आहेत. भन्तेजींचे आम्ही दोघे शिष्य आहोत .भदंत धम्मधर शाक्यपुत्र थेरो आणि भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र 

माझे संपूर्ण नाव भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र असे आहे, जे भंतेजींनी ठेवलेले आहे. माझे आजोबा धार्मिक होते, म्हणूनच त्यांनी मला महाराष्ट्रातील एका विनयशील न देण्याचे ठरवले. मी 2003 साली वयाच्या सातव्या वर्षी भंतेजींचा शिष्य झालो. मी स्वत: अजाण आणि अनभिज्ञ जरी असलो तरी धम्मदायाद आजोबांबद्दल (से.नि.पोलिस. हेडकॉन्स्टेबल हरिभाऊ नरवडे) कृतज्ञ आहे, की ज्यांनी मला त्रिरत्ना चरणी दान दिले. तेंव्हापसून भंतेजिनीच माझा सांभाळ केला, लहानाचे मोठे केले, माझे पालन-पोषण केले. खरे तर तेच माझे माता-पिता आणि गुरु बनले. माझा पोशिंदा बनले. माझ्यासाठी निर्वाण पथप्रदर्शक आचार्योपाध्याय बनले. मी भंतेजींचा आजन्म ऋणी असून त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही. त्यांनीच माझे 10 वी, 12 वी, BA. आणि MA. पालि, NET पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आज मी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे M PHIL पाली चे शिक्षण घेत आहे. लहाणपणी भंतेजीनी माझ्याकडून अभ्यास , वंदना-सूत्रपाठ, ... इ....पाठ करवून घेतला. तेंव्हापासून माझे आयुष्य आणि भविष्य बदलत गेले. भंतेजी माझ्या आयुष्यात लाभले नसते तर मी घडलो नसतो. आजही मी त्यांच्या चरणी शिक्षण घेत असून घडत आहे आणि विश्वासपूर्वक घडत राहील. 

आज सध्या भंतेजी 88 वर्षाचे आहेत. या वार्धक्य अवस्थेतही त्यांची दिनचर्या पुढील प्रमाणे आहे.  , . सकाळी 4:30 - वाजेला रोज उठणे, वंदनेसाठी तयार होणे. 5:00 ते 06:30 am - दिडतास वंदनेसह सुत्रपाठ घेणे. 7:00 ते 08:00am - महाबोधि पूजा, चक्रमण (विहारत -8 round मारणे) 8:00 ते 11::30am - वाचन,लिखाण, उपासकांची भेट त्यांना हितोपदेश. 11:30 ते 12:00 - भोजनदान 12:00 ते 5:00pm - वाचन,लिखाण, उपासकांची भेट त्यांना हितोपदेश. 05:00 ते 06:30pm - सिंहशय्या, वामकुक्षी, वाचन, लिखाण, प्रवचन  - वंदना-सूत्रपाठ,परित्राण (chanting) 07:00 ते 08:00pm 8:10ते 09:00pm - फलाहार, वैयक्तिक धम्मचर्चा, ध्यान-अनापान,आचार्या सेवा 9:30 ते 10:00pm - विश्राम, 

आजही भंतेजी सकाळी दीड तास, रात्री एक तास म्हणजेच दिवसातून अडीच तास वंदना सुत्रपाठ घेतात. उपासकांची निमंत्रणे स्वीकारून कार्यक्रमाला देखील जातात. वेळेच भान कुशल कर्मात नेहमी व्यस्त असतात. या भिक्खू जीवनाच्या प्रवासात आणि वर्षावासात अनेकांच्या ओळखी झाल्या. अनेक श्रद्धावंत उपासक-उपासिकांनी विहाराच्या विकासासाठी भंतेना दान दिले. काही चांगल्या वाईट अनुभवाने भंतेजींचे आयुष्य खडतर होत गेले. पण “इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल "या म्हणी प्रमाणे त्यांची वाटचाल शून्याकडून शिखराकडे सुरू झाली. शून्यातून विश्व निर्माण करण्याचे प्रबळ ध्येय त्यांच्या मनात होते. लहान पणापासूनच त्यांच्यात प्रखर मानवतावाद, बुद्धिमत्ता आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व विकसित होत गेले. आजही त्यांच्या जीवनाच्या शब्दकोशात आळस नावाची वस्तु शोधुनही सापडणार नाही. अशा भंतेजींच्या व्यक्तिमत्वामधून पुढे ते विद्रोही लेखक म्हणून सुप्रसिद्ध झाले. आज पर्यन्त भंतेजींनी वर्षावासाच्या काळात अनेक ग्रंथांचे लेखन केले. 

भंतेजींची स्वलिखित्त ग्रंथ संपदा

१.खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली 1979 100/

2. त्रिरत्न वंदना आणि संस्कारविधी 1980-81 100/

3.जंबुद्वीपातील आदर्श स्त्रीरत्ने भाग 1 1997 100/ 

४.जंबुद्वीपातील आदर्श स्त्रीरत्ने भाग 2 1999 100/

५.जंबुद्वीपातील आदर्श स्त्रीरत्ने भाग 3 2000 100/

६. भगवान बुद्धाची धम्मदेशना 1986 50/

७. धम्मचक्कपवत्तन सूत्र तथा अनत्तलक्खन सुत्त 1999 40/

८. तुमची प्रश्न आमची उत्तरे 2009 9मे 2009 (1) 250/

९. भ.उपालि पंडित थेरो यांचे चरित्र 1988-2014 100/

१०| भगवान बुद्धाचा अद्भूत विश्वसंदेश जून-2014 75/

११. 1 दहा भवबंधन (दहा संयोजन) जून-2014 60/

१२. श्रामणेर विनय (डॉ.भ.धम्मरक्षित महाथेरो) 1968 70/

१३. बुद्ध विश्व विजय (भं.निर्गुणानंद महाथेरो) 2008 250/14 25/

१४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाचा पोवाडा - भीमराव धोंडीबा | 1986 कर्डक 

या सर्वच ग्रंथामध्ये भंतेजींचे विचारधन- ज्ञानधन पाहावयास मिळते. 'खऱ्या रामायणाची गुरुकिल्ली' या पुस्तकात भंतेजी असा प्रश्न उपस्थित करतात की, 'या भारतात रामाचे माय-बाप जन्मले नाहीत तर राम कोठून?' इथे रामाचे अस्तित्व नाही तर रामायण घडले कसे? राम आणि रामायण कपोलकल्पित असून ते अर्थहीन वाळवंटासमान असल्याचे विद्रोही विचार भंतेजींनी या ग्रंथात मांडलेले आहेत. वादळाप्रमाणे पसरलेल्या या पुस्तकावर कोर्टाने बंदी घातली परंतु ती उठवून आपले म्हणणे कसे खरे आहे हे कोर्टात आणि सुप्रीम कोर्टात सिद्ध करून दाखविले. 'त्रिरत्न वंदना आणि संस्कार विधी' या पुस्तकात भंतेजींनी रोजची वंदना, सुत्रपाठ, बौद्धाचे सणवार-संस्कार विधीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्यानंतर जंबुद्वीपातील आदर्श स्त्रीरत्ने या ग्रंथाच्या तिन्ही भागात बुद्धकालीन भिक्षुणीचे जिवंचरित्र रेखाटले आहे. बुद्धकालीन महिला क्षणभंगुर जीवनाला सोडून कशा आदर्श भिक्षुणीचे जीवन जगल्या याचे सुंदर वर्णन या ग्रंथात आहे. म्हणूनच या ग्रंथाचे नाव जंबुद्वीपातील आदर्श स्त्रीरत्ने असे आहे. 'भगवान बुद्धाची धम्म देशना' या ग्रंथात बुद्धोपदेश संदर्भासह स्पष्टीकरण केलेला आहे. यामध्ये भगवंताने विशाखाला स्त्री-पुरुषाचे 7 प्रकार समजावले आहे. 'धम्मचक्कपवत्तन सुत्त तथा अनत्तलक्खन सुत्त' हे तथागताचे पंचवर्गीय भिक्खूना पहिले प्रवचन होय. षांतर करणारे भंतेजी हे महाराष्ट्रातील पहिले भिक्ख आहेत. 'तुमचे प्रश्न आमची उत्तरे' या ग्रंथात लोकांनी परिषदेत, कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केलेले आहे. 'भ. उपाली पंडित थेरो चरित्र' हे भन्तेजींचे आचार्य आहेत. त्यांच्या बद्दल कृतज्ञता म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. 'भगवान बुद्धाचा अद्भुत विश्वसंदेश' या पुस्तकात भगवंताचा " निब्बान परमं सुखं "या निर्वाण मार्गाचे वर्णन आहे. 'दहा भवबंधन' या ग्रंथात निर्वाण मार्गातील 10 संयोजन कोणते , त्यांना नष्ट करण्याचा उपाय आणि विश्लेषण पाहायला मिळते. प्रकाशनाधिकार या ग्रंथात बद्ध विश्व विजय' 'श्रामणेर विनय' आणि 'बाबासाहेबांचा पोवाडा' येतो. 'बुद्ध विश्व विजय' या ग्रंथाचे लेखक "भं. निर्गुणानंद महाथेरो " हे आहेत.या ग्रंथात बुद्ध जीवन, बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार... इ ...... चे वर्णन आहे. 'श्रामणेर विनय' या ग्रंथाचे लेखक "डॉ.भ.धम्मरक्षित महाथेरो" हे आहेत. यामध्ये श्रमणेराचे विनय-नियम आहेत. परिव्रजेचा विधी, वंदना, सूत्रपाठही अर्थासह दिलेला आहे. बाबासाहेबांचा पोवाडा "भीमराव धोंडीबा करडक" यांनी लिहिला. त्यामध्ये बाबासाहेबांच्या पोवड्यातून जिवंचरित्र रेखाटले आहे. एकूणच या सर्व ग्रंथात विद्रोही आणि स्पष्टमताचे भंतेजी पाहावयास मिळतात. त्यामुळे भन्तेजींचे प्रेरणादायी विचारधन वाचने अत्यावश्यक आहे. आणि हीच खरी त्यांची वंदना होय. महामंगल सुत्ता मध्ये बुद्ध म्हणतात "“समनानंच दस्सनं कालेन धम्म साकच्छा एतं मंगलमूत्तमं'" आज भंतेजी 88 वर्षाचे असून तरुणाईला लाजवेल असे त्यांचे तेज आहे, बुद्ध-बोधिसत्व, आणि भारतीय ऐतिहासिक महापुरुष हीच भंतेजींची खरी प्रेरणा आहे. 

वर्षावसाच्या कार्यकाळातही सातत्याने ज्ञानार्जन आणि ज्ञानदान करतात. त्यांच्या वर्षावसाची लिस्ट पुढे दिली आहे.

भंतेजीचे वर्षावास - माजलगाव बीड केसपुरी डॅम 1976 ते 1978, सोलापूर 1979,  चोंडी आंबा वसमत हिंगली 1980,  श्रीलंका (पोलवत्त अग्गाराम विहार ) 1981 ते  1985,   औरंगाबाद, बौद्धनगर 1986,  लातूर माकणी डॅम, उमरगा 1987 , वैजापुर, पैठण (औरंगाबाद) 1988 ते 1990.  ठाणे, मुंबई 1991 ते  1994, लहान लोन नांदेड, अर्धापूर 1995,  नालंदा बुद्ध विहार 1996, 1997, वैजापूर (औरंगाबाद)1998-1999, नालंदा बुद्ध विहार (संघ भूमी नागेवाडी जालना) 2000 - 2020

भंतेजी जेंव्हा जालना स्थित नागेवाडीला स्थलांतरित झाले तेंव्हा 1986 ला ओबडधोबड माळरान जागा भंतेजींनी सरकारकडून 25000/- रु मध्ये विकत घेतली. दगड,माती, खडक आणि चढउतार असलेल्या जागेचे भांतेजींनि वृक्ष लागवड करून नंदनवन केले. या कामात भंतेजींना अल्पाधिक लोकांची मदत मिळाली. त्यातील काहींनी कुशल कामासाठी दान पारमिता पूर्ण केली. 2015 साली बुद्ध मूर्तिची प्रतिष्ठापना व विहार उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. 2010 ला नालंदा बुद्ध विहारास पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या विहारचे नाव नालंदा ठेवण्याचे कारण भंतेजी असे सांगतात, “त्या काळातील नालंदा विश्व विद्यापीठ धम्मप्रचार-प्रसाराचे केंद्र होते. तोच उद्देश घेऊन मी नालंदा बुद्ध विहार हे सुद्धा सधम्म प्रचार-प्रसाराचे केंद्र व्हावे असे मनोमन ठरविले होते.” अशा या प्रशंसनीय कार्याची दखल भंतेजीच्या जन्मभूमितील लोकांनी घेतली व त्यांचा सत्कार नगर पालिकेतर्फे करण्याचे ठरविले. जि. उस्मानाबाद, ता. कळंब नगरीत सत्कारमूर्ती भंतेजी म्हणाले “माझा सत्कार होणे म्हणजे मी महापुरुषांच्या कार्यास जीवन समर्पित केल्याचे फळ मानतो. माझा जन्म जरी इथे झाला असला तरी माझा पुनर्जन्म बुद्धगयेला झाला, तोच माझा भिक्खू जन्मातील खरा जन्म होय.” दरम्यान भंतेजींना नगर पालिकेतर्फे सन्मानपत्र मिळाले जे भिक्खू संघातील एकमेवाद्वितीय आहे.(2019) भंतेजी त्रिपिटकाचे अध्ययन करण्यासाठी श्रीलंकेला 5 वर्षे राहिले. तिथे बद्ध धम्माचे सखोल अध्ययन करून "त्रिपिटकाचार्य" ही पदवी मिळवली. आजही भंतेजी बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित असतात. या बुद्ध बाबासाहेबांच्या धम्मवैचारिकक्रांती मध्ये अतुलनीय योगदान देणारे भंतेजी म्हणतात...“बुद्ध शासन लिखता हु खून से, उसे शाही न समझना मरता हूं बुद्ध शासन के लीये मुझे जिंदा न समझना.” अश्या या ""अखिल भारतीय भिक्खू संघातील '" क्रांतिकारी, विनयशीलवान, गुणवान-विद्वान, विद्रोही-विचारवंत आचार्योपाध्यायास शिष्याचे त्रिवार अभिवादन. 

• यो हवे ,दहरो भिक्खू युज्जन्ति बुद्ध सासने I सोमं लोकं पभासेती अब्भा मुत्तो व चन्दिमा II 25 II (382 धम्मपद) 

अर्थ : “जो तरुणावस्थेमध्ये बुद्धशासनात सम्मिलित होऊन सम्यक प्रयत्न करतो, तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे ह्या लोकास प्रकाशित करतो.”


                               

-- " भंते सिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र' M.A Pali , NET  ( 8080882905 ) 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com