पणती पेंटींग कार्यशाळेद्वारे मुले होणार आत्मनिर्भर

पणती पेंटींग कार्यशाळेद्वारे मुले होणार आत्मनिर्भरटिटवाळा : 
 बिकट परिस्थिती आणि अनाथ मुलांना टिटवाळा येथील अंकुर सामाजिक संस्था शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे, श्रीमती के. सी. गांधी शाळेचे चित्रकला शिक्षक अमोल पाटील हे अशा संस्थांना मदत करीत आहेत. अंकुर बालविकास केंद्रातील अशा मुलांचे शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षण थांबू नये म्हणून  पाटील यांनी या विद्यार्थ्यांना पेन्सिल, खोडरबर, पेन, कंपास बॉक्स, रंगपेट्या आणि चित्रांची पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याची मदत केली आहे.


या मुलांशी संवाद साधून शिक्षणाद्वारे आपली समाजाची, राष्ट्राची प्रगती साधू शकतो. या विद्यार्थ्यांचे कलाकौशल्य विकसित व्हावे त्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळावी, प्रत्येक मुलाला या माध्यमातून सहजतेने कला सादर करता यावी या उद्देशाने  मुलांना पणत्या आणि रंग साहित्य देऊन पणत्या रंगविणे शिकविले. तसेच, या मुलांच्या कलाकृतींची माफक दरात विक्री करून त्याद्वारे या मुलांना आत्मनिर्भर करता येईल. यामुळे, या मुलांना मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते.
सर्वांनी अशा मुलांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे, असे पाटील यांनी सांगितले. या उपक्रमासाठी शेखर पाटील, अपूर्वा आपटे यांचीही मदत झाली.  मुले पणत्या रंगविण्यात दंग झाली होती. यामुळे, एक समाधान त्यांच्या डोळ्यात दिसत होते. अमोल पाटील सरांनी मार्गदर्शन करून सुंदर कलाकृती निर्माण करून घेतल्या. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. शिक्षक-चित्रकार म्हणून अमोल पाटील यांचे कार्य अतुलनीय आहे.-  -अक्षदा भोसले, अध्यक्षा अंकुर सामाजिक संस्था


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad