‘वन नेशन, वन इलेक्शन’ साठी प्रधानमंत्री आग्रही


 
अहमदाबाद (वृत्तसंस्था) : 
देशाच्या प्रगतीसाठी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केला आहे. आज मोदींनी अखिल भारतीय पीठासीन अधिका-यांच्या संमेलनाला संबोधित करताना मोदींनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल गांभीर्यानं विचारमंथन आवश्यक असल्याचं म्हटलं. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी पीठासीन अधिका-यांशी संवाद साधला.  प्रधानमंत्र्यांनी गुरूवारी केवडिया येथे संविधान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित केलं.  यावेळी पंतप्रधानांनी देशातल्या जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ‘संविधानाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून संविधान तयार करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मी नमन करतो. त्यांच्यामुळेच देशाला संविधान मिळालं. पूज्य बापूंकडून मिळणारी प्रेरणा आणि सरदार पटेल यांची वचनबद्धता यांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस आहे,’ असं मोदी म्हणाले.

 आमच्या कायद्याची भाषा इतकी सोपी असावी की सामान्य लोकांनासुद्धा ती समजू शकेल. आम्ही, भारतीय जनतेने ही घटना स्वत:ला दिली आहे. कालांतराने ज्या कायद्यांचे महत्त्व कमी झाले आहे त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया देखील सुलभ व्हायला हवी. वर्षानुवर्षाचे असे शेकडो कायदे काढून टाकण्यात आले आहेत, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.  ‘प्रत्येक नागरिकाला संविधान समजून घेण्याची गरज आहे. संविधानाच्याच मार्गानं सर्वांनी चाललं पाहिजे. लोकांना ‘केवायसी’ म्हणजेच ‘नो युअर कॉन्स्टिट्युशन’वर भर देणं आवश्यक आहे. विधानसभेच्या चर्चांदरम्यान जनतेचा सहभाग कसा वाढेल यावर विचार केला गेला पाहिजे. जेव्हा कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही बोलावण्यात आलं पाहिजे, असंही पंतप्रधान म्हणाले.

 यादरम्यान, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचा उल्लेख करत ती काळाची गरज असल्याचं म्हटलं. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ केवळ विचारमंथनाचा विषय नाही. ही देशाची गरज आहे. आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. याबद्दल आपण गांभीर्यानं विचार करायला हवा, असं मत मोदींनी मांडलं. लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदारयादीचा वापर व्हायला हवा. आपण या मतदारयाद्यांवर पैसा आणि वेळ का खर्च करतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘आपण पूर्णत: डिजिटल होण्याकडे वाटचाल करणं आवश्यक आहे. कागदांचा वापरही पूर्णपणे बंद केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधलं पाहिजे,’ असंही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA