संविधान गौरव दिन हा राष्ट्रीय कार्यक्रम असून देखील ठाणे महानगर पालिकेने यादिनाबाबत उदासिन भूमिका घेत कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला नाही. तसेच शहरामध्ये असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचीही स्वच्छता केली नाही. ठाणे महानगर पालिका केवळ पुतळे उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्यातील कमिशन खायचे काम करते का असा सवाल सुरेशदादा पाटील खेडे यांनी केला तसेच याप्रकरणी ठाणे महानगर पालिका आयुक्त आणि महापौर यांचा त्यांनी जाहीर निषेध केला. तर रविंद्र चांगो शिंदे यांनी ठाणे महानगर पालिकेसहीत सर्व देशाचा कारभार संविधानावर चालत असताना ठाणे महानगर पालिकेला बाबासाहेब आणि संविधानाबाबत येवढा अनादर का असा सवाल केला.
26 नोव्हेंबर हा संविधान गौरव दिन म्हणून जाहीर झाला असला तरी आजही ज्यांच्या प्रगल्भ बुध्दीमत्तेतून या देशाची घटना साकार झाली, जे भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले, ज्यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून भारताला जगात सन्मानाचे स्थान मिळवून दिले आणि भारताला राज्यकारभाराचे स्वयंभू सुत्र बहाल केले ते या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला प्रत्येकजण का विसरतो एक कोडे अद्यापही उलगडले गेले नाही. अशी प्रतिक्रिया संविधान गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. ठाण्यातील स्टेशन परिसरात असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ शहरातील अनेक संस्था संघटना, पक्ष कार्यकर्त्यांनी आज संविधान गौरव दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन केले. आणि संविधान पत्रिकेचे वाचन केले.
यावेळी भदन्त शिलकिर्ती, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष सुरेशभाऊ पाटीलखेडे, बहुजन असंघटित कामगार युनियनचे चंद्रभान आझाद, महाराष्ट्र म्यु.कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र चांगो शिंदे, सेक्रेटरी प्रमोद इंगळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे प्रभाकर जाधव, सामाजिक कार्यकर्ते नितिन घोलप, अफजलभाई खान, प्रमोद जाधव, चंद्रकांत वाघमारे, कुणाल बागुल, सुनिल चव्हाण, अॅड.रवि जोशी, सुनिल चव्हाण, समिर मर्चंट, भुपेंद्र सिंग उर्फ पप्पुभाई, देविदास गायकवाड आणि प्रजासत्ताक जनताचे संपादक सुबोध शाक्यरत्न आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 टिप्पण्या