वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी गोस्वामी यांना अटक : भाजप आक्रमक
मुंबई
५ मे २०१८ रोजी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेनंतर भाजपा आक्रमक झाली असून राज्य सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राज्यातील नेत्यांकडून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला जात आहे.
आमदार संजय केळकर व भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली कोर्टनाका येथे ठाणे भाजपा चे आघाडी सरकार विरोधात आंदोलन. पत्रकारांची मुस्कटदाबी सहन करणार नाही असा इशारा आ. केळकर व आ. निरंजन डावखरे यांनी दिला. यावेळी जेष्ठ नगरसेवक व गटनेते संजय वाघुले, जेष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, जेष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, नगरसेवक मुकेश मोकाशी, ठाणे भाजपा महिला अध्यक्ष नगरसेवक मृणाल पेंडसे, नगरसेवक व सचिव संदीप लेले, नगरसेवक कृष्णा पाटील, ठाणे जिल्हा हौसिंग सोसायटी अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, बाळा केंद्रे, मनोहर सुकदरे, कैलास म्हात्रे, डॉ. राजेश मढवी, युवा मोर्चा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सारंग मेढेकर, प्रशांत गावंड, राजकुमार पवार, परीक्षित धुमे, सागर भदे, राजेश गाडे, मितेश शहा, विक्रम भोईर, स्वप्नाली साळवी, स्नेहा शिंदे, व पदाधिकारी तसेच महिला ओदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचबरोबर केंद्रातील नेतेही अटकेच्या कारवाईचा निषेध करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे”.
नाईक कुटुंबाला धमकावून प्रकरण दडपणाऱ्या चौकशी अधिकाऱ्यावर कारवाई करा - सचिन सावंत
मुंबई,
अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे. दोन वर्ष या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. या कुटुंबावर प्रचंड दबाव आणला गेला. त्यांना धमकवण्यात आले. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असेल तर ही कारवाई योग्यच आहे, ही अन्वय नाईक यांना श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठीच आहे. नाईक कुटुंबाला कोणाच्या दबावाखाली धमकावून प्रकरण दाबले गेले त्या पोलीस अधिकाऱ्यावर आता कारवाई केली पाहिजे अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात सावंत पुढे म्हणाले की, अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोट मध्ये अर्णब गोस्वामी व इतर दोघांची नावे होती, असे असतानाही दोन वर्षात या प्रकरणावर फडणवीस सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. नाईक कुटुंब हे दोन वर्षापासून न्यायासाठी संघर्ष करत आहे परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. या प्रकरणात गोस्वामी यांचे स्टेटमेंट अलिबागला नाही तर मुंबईत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात नोंदवण्यात आले. एवढी स्पेशल ट्रिटमेंट कशासाठी दिली गेली. पीडित कुटुंबाला चौकशी अधिकाऱ्याने संरक्षण देण्याची अपेक्षा असताना त्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पॉवरफुल लोक अर्णबच्या मागे आहेत असे सांगण्यात आले, ते लोक कोण आहेत ते आज केंद्रीय गृहमंत्र्यांपासून इतर नेत्यांची विधाने पाहता स्पष्ट झाले आहे. याची उत्तरे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजेत.
अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन भारतीय जनता पक्ष जो आकांडतांडव करत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. गोस्वामी यांची अटक ही लोकशाहीसाठी लज्जास्पद बाब आहे असे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. खरे तर देशाचे गृहमंत्री म्हणून प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु ते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना हे प्रकरण दाबले आणि आज दोन वर्ष न्यायासाठी ज्यांनी संघर्ष केला त्यांना न्याय मिळतो आहे असे असताना गोस्वामीची बाजू घेणे हे दुर्दैवी आहे. दोन वर्ष एका मृत व्यक्तीच्या परिवाराला न्याय न मिळणे हे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. चौकशी अधिकाऱ्यानेच धमकावणे हे लोकशाहीसाठी लज्जास्पद आहे. राजकीय अजेंडा चालवणाऱ्या गुन्हेगारी आरोप असलेल्या व्यक्तीला पाठीशी घालणे हे लज्जास्पद आहे. एक मराठी परिवार उद्धवस्त होत असताना महाराष्ट्रातील भाजपाचे नेते अर्णब गोस्वामींच्या मागे जात असतील तर ते महाराष्ट्राच्या जनतेला सहन होणारे नाही.
भाजपा या प्रकरणाचा पत्रकारितेवर हल्ला, आणीबाणी असा संबंध लावत आहेत त्यात काहीही तथ्य नाही. या प्रकरणाचा आणि पत्रकारितेचा काहीही संबंध नाही. मोदी सरकारच्या काळात देशभरात २३३ लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अनेक पत्रकारांवरही कारवाई करण्यात आली आहे मग याच प्रकरणात एवढा गळा काढण्याची काय आवश्यकता आहे. भाजपा समर्थकांसाठी वेगळा व इतरांसाठी वेगळा असे दोन कायदे या देशात आहेत का. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात तर कोणतीच सुसाईड नोट नाही, तरिही बिहारमध्ये गुन्हा नोंदवून तात्काळ सीबीआय चौकशी केली. त्यावेळी सुशांतसिंहच्या परिवाराच्या विनंतीला महत्व देण्यात आले. अन्वय नाईक प्रकरणात तर सुसाईड नोट असताना कारवाईवर आक्षेप का घेतला जात आहे. अन्वय नाईक यांच्या परिवाराच्या विनंतीला भाजपाच्या लेखी काही महत्व नाही का. काँग्रेस पक्षाने पाठपुरावा केला परंतु नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. दोन वर्षांपासून आम्ही नाईक कुटुंबाचा न्यायासाठी चाललेला संघर्ष जवळून पाहिला आहे. आज राज्य सरकारने केलेली कारावई ही पुरोगामी महाराष्ट्राची न्याय भूमिका आहे, असे सावंत म्हणाले.
0 टिप्पण्या