दिवाळी सणानिमित्त रुपये 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान
महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्तांनी केली घोषणा
ठाणे
ठाणे महापालिकेच्या कर्मचा-यांना सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त रुपये 15 हजार 500 इतके सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात राज्याचे नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आज महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेत्या श्रीमती प्रमिला केणी, उपमहापौर सौ. पल्लवी कदम, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, म्युनिसिपल युनियनचे नेते रवि राव, अतिरिक्त आयुक्त (1) गणेश देशमुख आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महापालिकेच्या कर्मचा-यांना यावर्षी 15,500 इतके सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिका आस्थापनेवरील कायम अधिकारी कर्मचारी 7091, एकत्रित मानधनावरील कर्मचारी 262, शिक्षण विभागाकडील एकूण कर्मचारी 1047 आणि परिवहन सेवे मधील 1850 कर्मचा-यांना लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी एकूण 16 कोटी इतका खर्च होणार आहे. सदर सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना देण्यात येणार असल्याचे महापालिका आुयक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.
0 टिप्पण्या