नो मास्क- नो एन्ट्री मोहिम प्रभावीपणे राबवा  -- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

नो मास्क- नो एन्ट्री मोहिम प्रभावीपणे राबवा  
दिवाळी सण साधेपणाने  साजरा करा
-- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ठाणे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर ही अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे ‘नो-मास्क, नो एन्ट्री’ ही मोहिम जिल्ह्यात सर्वदूर प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गणेशोत्सव,ईद नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही साधेपणाने  साजरा करावा.नागरिकांनी यावर्षी फटाके टाळावे व दिव्यांची आरास करण्यावर भर द्यावा.    राज्य सरकारने दिवाळी सणासाठी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्यासाठी सांगितले आहे.. या सर्व सुचनांचे पालन करावे व कोरोनाच्या या लढाईमध्ये जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.तसेच जिल्हावासियांना  प्रकाशपर्व दिपावलीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत


केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्याकरीता मास्क वापरण्यासाठीच्या सूचना वेळोवेळी जारी केल्या आहेत.  लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिक उद्योगधंदे, व्यापार -व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. नागरी भागांतही अनेक नागरिक बाहेर पडताना मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच अधिक दक्षता बाळगण्यासाठी जिल्ह्यात ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ (No Mask-No Entry) ही मोहिम प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.


            दिवाळी सणाच्या निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते व कोरोनाचा संक्रमणाचा धोका अधिक वाढू शकतो. यावर उपाय करण्यासाठी तसेच नागरीकांनी मास्क वापराशिवाय बाहेर पडू नये यासाठी महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायतींनी विशेष मोहिम राबवून नागरिकांमध्ये मास्क वापराबाबत व्यापक स्वरुपात जागृकता निर्माण करावी. मास्क नाही प्रवेश नाही ही मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त यांच्यासह सर्व नगरपालीका, नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक मोहिम राबवावी. या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब करावा. तरीसुध्दा जे नागरिक मास्क किंवा प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याकडे दुर्लक्ष करीत असेल, अशांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच मास्क नाही, प्रवेश नाही (No Mask-No Entry) या संदर्भात विशेष मोहिम राबवून कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.


दिवाळी या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या स्थितीत करोना बाधित रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा अधिकच त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यंदा फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.नागरिकांनी अन्य सण-उत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊन दिपावलीचा सण साधेपणाने साजरा करावा. उत्सव काळात विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे. करोना संक्रमण वाढणार नाही याची काळजी घ्यावी.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या