कोरोनाच्या महामारीमुळे धारावीकरांची दिवाळी अंधारात

मुंबई
कोरोनाच्या महामारीने बेरोजगारीचे मोठ्ठे संकट उभे केले आहे.  कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये अनेक दुकाने अद्यापही बंद आहेत. ज्यांनी भाड्यांनी घेतली होती त्यांनी ती मुळ मालकाला परत केली आहेत. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद  झाले आहेत. जे काही थोडेफार सुरु आहेत. त्यांची अवस्थाही मरणासन्न झाली आहे..बाजारात मागणी नसल्याने उत्पादन करायचे तरी कसे अशा विवंचने इथला व्यापारी दिवस काढत आहे. त्यातच उद्योगधंदे बंद असल्यामुळे खाजगी कंपन्यांनी अनेक कामगारांना घऱचा रस्ता दाखवल्याने यंदा दिवाळी निमित्त मिळणारा बोनस दूरापास्त झाला आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी काहीशी अंधारमयच झाली असल्याने धारावीकर मोठ्या चिंतेत आहेत. चामड्याचे उद्योग, चामड्याचे साहित्य विक्री करणारे दुकानदार, कुंभारवाडा तसेच  दिवाळीत पणत्या आणि अन्य साहित्य विक्री करणारे, कंदील, रांगोळ्या आदी दिवाळीला लागणारे साहित्य विक्री करणाऱ्यांवर हातावर हात ठेऊन बसण्याची वेळ आली आहे. विक्रेते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची वाट पाहत दररोज दुकान उघडून बसत आहे. तर जरीकाम, गारमेंट यांना म्हणावी तशी मागणी नसल्याने कारागिरांना कुठून काम द्यायचे असा प्रश्न सध्या मालकांना पडलेला आहे.


दसरा संपून दिवाळीच्या लगबगीला सुरुवात झाली की, दिवाळीत हमखास लागणारी महत्वाची वस्तू म्हणजे पणत्या त्याच्या विक्रीकरिता कुंभारवाडा दरवर्षीप्रमाणे मातीचे साहित्य विक्रीसाठी सजला आहे. पण यंदा दिवाळी तोंडावर आली तरी दरवर्षीप्रमाणे होणारी ग्राहकांची गर्दी यंदा दिसून येत नाही. दिवाळी हा दिव्यांचा सण संपूर्ण घर पणत्यांच्या आणि दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. धारावीतील कुंभारवाडा हा पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी अतिशय सुबक आणि कमी किंमतीमध्ये दिवे आणि पणत्या मिळतात. मुंबईच्या विविध भागातून खरेदी करण्यास सर्वसामान्य लोकांसह चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळी,राजकीय नेते येथे येतात. दीपोत्सवाला सजवणाऱ्या विविध पणत्या मोठ्याप्रमाणावर इथूनच खरेदी केल्या जातात. नवरात्री, दिवाळी हे सण म्हणजे कुंभारांना चांगले दिवस देऊन जातात. दिवाळी सणात येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते.


कोरोनाच्या भीतीमुळे या व्यवसायाला फारच घरघर लागली आहे. .दिवाळीत विक्रीसाठी लागणारे साहित्य फारच कमी प्रमाणात दिसत आहे, मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने इतर ठिकाणाहून येणारा  ग्राहक येऊ शकणार नाही. यामुळे धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने मोठ मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या गीफ्ट आयटमची मोठ्या प्रमाणात मागणी करीत असतात. त्यामुळे या मोठाल्या कंपन्यांच्या मागणीला पुरवठा करण्याकरिता चामड्याच्या वस्तूं मोठ्या प्रमाणात उत्पादीत होत असत. या कालावधीत रात्रंदिवस काम सुरु असायचे. यावर्षी मात्र, सकाळी दुकान उघडल्यावर रात्रीपर्यंत तुरळक प्रमाणात ग्राहक खरेदीसाठी येतात. त्यातही विचारणा करणारे ग्राहक जास्त असतात. दरवर्षीपेक्षा यंदा दहा टक्के सुद्धा विक्री झाली नाही. दुकानातील कामगाराचे वेतन, दुकानाचे भाडे, वीज बिल कसे भरायचे याची चिंता येथील व्यवसायिकांना लागली आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad