वाढते वाहन अपघात रोखण्यासाठी वासिंद पोलीसांकडून जनजागृती  

वाढते वाहन अपघात रोखण्यासाठी वासिंद पोलीसांकडून जनजागृती  


   

शहापूर
शहापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यांना आळा बसावा या उद्देशाने वासिंद पोलीसांनी वाहतूक नियमांचे पालन करा, वाहन सावकाश चालवा, वाहन चालवताना मागे वळून पाहू नका, असे आवाहन केले आहे. वाहन चालविताना नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वासिंद शहरातील बाजारपेठ  येथे वाहन चालकांना जनजागृतीपर पत्रके वाटून आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. 


वासिंद पोलीस ठाण्याच्या हद्यीत  लॉकडाऊननंतर अपघातांचे प्रमाण वाढले असून बेपर्वाईने वाहन चालविल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर काहीजण जखमी देखील झाले आहेत. या अपघातांना आळा बसावा हा उद्देश समोर ठेऊन पोलीसांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणारी तसेच वाहने चालविताना घ्यावयाची जबाबदारी याबाबतची माहिती पत्रके वाटून वाहनचालकांमध्ये जनजागृती केली. या पत्रकात वाहन सावकाश चालवा, हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, वाहन चालवताना दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर असावे, सिग्नल तोडू नये, वाहन चालवताना मागे वळून पाहू नका, हायवेवर निष्काळजीपणे रस्ता ओलांडू नका आदी नियमांचा समावेश होता.

 

सध्या रस्ते सुरक्षितता सप्ताह नसला तरी वाढत्या अपघातांच्या चिंतेने पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे  यांनी स्वतः वाहन चालकांना थांबवून जनजागृतीपर पत्रके हातात देऊन वाहन चालवताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वासिंद पोलीस ठाण्यातील पोलीस सब इन्स्पेक्टर सोनावणे, पोलीस हवालदार महेश वाघ, तडवी, कंबळे, पोलीस नाईक सचिन घुगे, नागरे  यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील रस्त्यावर उतरून जनजागृती केली. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दिली.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad