Top Post Ad

आंबेडकरी साहित्य संप्रदायाचे कुलपती - अॅड. शंकरराव खरात

आंबेडकरी साहित्य संप्रदायाचे कुलपती - अॅड. शंकरराव खरात

अॅड. शंकरराव खरात हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन ज्ञानाच्या, साहित्याच्या राजकारणाच्या क्षेत्रात उतरले. बाबासाहेबांनंतर त्यांच्या अनुयायांमध्ये ज्यांच्या नावाचा प्राधान्याने उल्लेख करावा लागेल, असे शंकरराव खरात हे नाव आहे. तीच निस्पृहता, तीच सार्वजनिक जीवनातील निष्कलंकता, तीच ज्ञानपीपासा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञासूर्यापासून खरातांनी अंतशक्ती घेतली आणि त्यांचे जीवन उजळले. खऱया अर्थाने शंकरराव बाबासाहेबांचे वारसदार ठरले. 
माणदेशातील आटपाडी या सांगली जिह्यातील दुष्काळी गावी शंकररावांचा जन्म झाला. घरात अठराविश्व दारिद्र्य. वडिलांचे नाव रामा महार, आईचे नाव साऊबाई. वडिलांना बलुतेदारांची, गावकीची, तराळकीची कामे करताना स्वत शंकररावांनी पाहिले होते. त्यांनी अनेकदा ही कामे दस्तुरखुद्द केली होती. `विसाव्या शतकातील गुलामगिरी' म्हणून ज्या महार वतनदारीच्या कामांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केला आहे, ती माणसाला लाजविणारी, माणुसकीला कलंक असलेली वेठबिगारीची कामे शंकररावांना लहानपणी करावी लागली. दुःख पाहून आल्यामुळेच या दुःखावर दवा शोधण्याचा मानव मुक्तीचा लढा शंकरराव लढले. बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला होता. 

 बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर शंकरराव साहित्यक्षेत्रात उतरले. 1957 साली `सतूची पडिक जमीन' ही त्यांची कथा आचार्य अत्रे यांच्या `नवयुग'मध्यम पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. त्या पाठोपाठ `माणुसकीची हाक' ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि पुस्तकरुपाने `बारा बलुतेदार' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याचे जोरदार स्वागतही झाले. त्या अगोदर दलित जीवनाचे चित्रण दलितेतरांनी सहानुभूतीने केले होते. पण शंकररावांच्या लेखनाला अनुभूतीची धार होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन विपुल आणि सर्वांगीण लेखन करणाऱया लेखकांमध्ये `पहिला मान' शंकरराव खरातांचाच आहे. 
येथून पुढे शंकररावांच्या लेखनाची गाडी भरधाव सुटली. ते त्यांनी आपले जीवनव्रत मानले. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा मात्र शेवटपर्यंत सोडला नाही. काही काळ डॉ. बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्टस् फेडरशेन या राजकीय पक्षाचे ते महाराष्ट्राचे चिटणीस होते. `प्रबुद्ध भारत' या मुखपत्राचे 1954-55 ते 56-57 पर्यंत संपादक होते. या काळात त्यांनी केलेले राजकीय कार्यही महत्त्वाचे आहे. पण त्यांनी क्षेत्र निवडले ते साहित्याचे, प्रबोधनाचे! या क्षेत्रात त्यांनी भीम-पराक्रमही केला. सुमारे बारा कथासंग्रह, दहा कादंबऱया, आठ-नऊ वैचारिक ग्रंथ ही त्यांची साहित्य संपदा. त्यात उठून दिसणारे ग्रंथ म्हणजे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा', `डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर', `अठराव्या शतकातील सामाजिक परिस्थिती', `सांगावा' हा कथासंग्रह. `फूटपाथ नं. 1' ही कादंबरी, डॉ. बाबासाहेबांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रांचेसटीप संपादन हे होत. या त्यांच्या लेखनाचा कलशाध्याय म्हणजे त्यांची आत्मकथा 'एtदब् द tप ळहूदल्म्प्aंत'  असा त्यांनी जिचा उल्लेख केला आहे ती `तराळ-अंतराळ' होय.  

भारतीय समाजातील सर्वात कलंकित अशा अस्पृश्यतेचे चित्रण खरातांनी या आत्मकथेत विलक्षण सामर्थ्याने केले आहे. हा अदृष्य माणूस `इनव्हिजिबल मॅन' खरातांनी आपल्या लेखनात `व्हिजिबल' दृश्य केला. मृत्यूनंतरही त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत. चोखोबाचा विद्रोह, संतांची सामाजिकदृष्टी, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांचे ग्रंथ नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत.  
जन्मभर दारिद्र्याच्या वेदना आणि खस्ता खाऊन-सोसूनही खरातांची माणसासंबंधीची कणव नाहिशी झाली नाही. ही करुणा त्यांच्या लेखनाचा मुख्य स्त्रोत आहे. पूर्णपणे बौद्ध, आंबेडकरवादी असलेल्या खरातांचे व्यक्तिमत्व समृद्ध, प्रज्ञावंत, व्यासंगी आणि संयत होते. ते निर्लोभी आणि निस्वार्थी होते. त्यांची रहाणी अतिशय साधी होती. त्यामुळे ते उठून दिसत.  
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद त्यांना लाभले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते पहिले बौद्ध अध्यक्ष. परंतु ही पदे त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी मिळविली. `मदायत्तं तू पौरुषम्' चा प्रत्यक्ष आदर्श म्हणजे शंकररावांचे व्यक्तिमत्त्व. पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट (डी. लिट्.) देऊन त्यांचा गौरव केला. रेल्वे सर्व्हिस कमिशनचे ते चेअरमन होते. बँक ऑफ इंडियाचे संचालक होते. अलीकडे नाम. पंतगाराव कदमांच्या `भारती  विद्यापीठा'शी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध प्रस्थापित झाला होता. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, प्रा. मधु दंडवते या नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध होते. यशवंतरावांनी त्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱयांच्या नियुक्तीसाठी नेमलेल्या समितीचे सदस्य केले. या काळातत्यांनी शिक्षकांच्या भरत्या मोठ्या प्रमाणात केल्या. हेच कार्य नंतर रेल्वे आयोगाचे अध्यक्ष व `बँक ऑफ इंडिया'च्या ऑफिसर्स सिलेक्शन कमिटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी कले. त्यांचे हे कार्य मी स्वत जवळून पाहिले, अनुभवले आहे. 81 वर्षांचे कृतार्थ जीवन त्यांच्या वाट्याला आले. त्याचा त्यांनी योग्य विनियोग केला. 

खरातांनी उपेक्षितांचे विश्व विलक्षण सामर्थ्याने चित्रित केले आहे. अस्पृश्य, आदिवासी, भटके-विमुक्त, वेश्या, कैदी अशा सर्व दलित-पतितांचे अलुते-बलुतेदारांचे जीवन तर त्यांनी चित्रित केलेच,पण ग्रामीण जीवनातील सर्व बारकाव्यांचे चित्रण त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टी ठेवून केले. ही दृष्टी इतर ग्रामीण लेखकांच्या लेखनात अभावानेच दिसते. हे समाजशास्त्रीय परिणाम खरातांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. 
शंकररावांच्या लेखनाला अनेक सन्मान प्राप्त झाले. त्यांचे लेखन हिंदी-इंग्रजीत भाषांतरितही झाले. पण `ज्ञानपीठ़' हा सन्माननीय भारतीय ख्यातीचा पुरस्कार त्यांना कसा मिळाला नाही? हे आश्चर्यच आहे. एवढेच नव्हे तर `साहित्य अकादमी' चा भारतीय पुरस्कारही त्यांच्या वाट्याला आला नाही. साहित्य क्षेत्रातील `कंपूशाही'चे, गटबाजीचे आणि अजूनही शाबूत असलेल्या उच्च वर्णियांच्या वर्चस्वाचे हे उदाहरण आहे. शंकररावांना ते ठाऊक होते, त्यामुळे त्यांना त्याचे काही वाटले नाही, ते पूर्ण समाधानी होते. आपल्या सुविद्य डॉक्टर पत्नीवर, सर्व डॉक्टर, (वैद्यकीय) असलेल्या कुटुंबावर त्यांचे अतिशय प्रेम होते. 

अगदी अखेरच्या आजारातही ते बोलत ते साहित्याबद्दल. आणखी हजारो पृष्ठांचे माझे साहित्य अप्रकाशित आहे, ते प्रकाशित झाले पाहिजे. ही खरातांची शेवटची इच्छा होती. ती त्यांनी  माझ्याजवळ व्यक्त केली होती. माणदेशातील माणदेश हा प्रदेश भिवघाटाच्या खाली पंढपूरपर्यंत येतो. त्यात आटपाडी, सांगोला, माण, पंढरपूर या सांगली, सोलापूर व सातारा जिह्यातील प्रदेशाचा समावेश होता. पूर्वीच्या औंध संस्थानातील आटपाडी तालुक्याच्या व सगळ्या दुष्काळी प्रदेशातल्या गांजलेल्या गरीब जनतेच्या दुःखाने ते सतत व्याकुळ व्हायचे.   व्यंकटेश, ग. दि. माडगूळकर, `नाजुका'कार श्रीमती शांताबाई कांबळे यांच्यासारख्या सामर्थ्यवान साहित्यिकांचा हा प्रदेश. ज्याचा उल्लेख संत नामदेवांनी  `धन्य धन्य माणदेश । विठ्ठले पेला रहिवास' असा केला आहे. त्या माणदेशात आजही माणसांना, जनावरांना प्यायला पाणी नाही याचे दुःख शंकररावांच्या उरात होते. या गांजलेल्या-पिडलेल्या जगातील सगळ्या दुःखितांचे अश्रू शंकररावांच्या डोळ्यात होते. 
वेळेचा उपयोग ते अतिशय काटकसरीने करीत त्यामुळे अनेक जण दुखावले जात. पण त्याला त्यांचा इलाज नव्हता. जी मूल्ये त्यांनी आदर्श म्हणून  बाबासाहेबांपासून स्वीकारली. त्याचा जीवनभर त्यांनी कसोशीने सांभाळ केला. ते विलक्षण बुद्धिवादी होते, त्यामुळे अनेकांना ते तुसडे वाटत. भ्रष्टाचार त्यांच्यापासून कोसो दूर होता. ते मूलत मितभाषी, संयत आणि प्रसिद्धी पराङ्मुख अशा वृत्तीचे होते. 

शंकरराव माझे नात्याने मामा. त्यांच्या आटपाडीच्या घरात लहानपणी मी खेळलो, वावरलो. त्यांच्या आईने साऊ आजीने बालपणी माझा सांभाळ केला. टाळू भरली. ज्ञानू मामा, मारुती मामा या त्यांच्या बांधवांनी माझ्यावर पितृछत्र धरले. माझे वडील कृष्णाजी कांबळे `मी कृष्णा' या आत्मवृत्ताचे लेखक हे शंकररावांचे शिक्षक होते. शंकररावांच्या निधनाने माझ्या, माझ्या कुटुंबाच्या व्यक्तिगत जीवनातील आधारवड नाहिसा झालाच, पण समाज जीवनातील एक `भीम पुरुष' नाहिसा झाला ही हानी फारच मोठे आहे. त्यांचा अंत्यविधी महाराष्ट्र शासनाने शासकीय इतमामात केला

-- प्रा. अरुण कांबळे 

---------------------------------


प्रजासत्ताक जनता विशेष अंक
संपर्क साधा : 8108658970
Email-  pr.janata@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com