Top Post Ad

२०२१ च्या जनगणनेत फक्त बौद्ध म्हणून नोंद करा

 बौद्ध बंधू आणि भगिनींनो,

               क्रांतिकारी जयभीम l
       आपणास माहीत आहे की सन- 2021 मध्ये जनगणना होणार आहे. परंतु येणाऱ्या जनगणनेत काय लिहावं, याबाबत बौद्धांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यामुळे बौद्ध समाजामध्ये गोंधळाची स्थिती आहे.ते वेगवेगळे मतप्रवाह नेमके काय आहेत व त्या मागची कारणे काय आहेत हे बाबासाहेबांचे मिशन डोळ्यासमोर ठेऊन समजून घेतल्यास घेतल्यास निर्णय घेण्यास सोपे जाईल. त्याअनुषंगाने हा लेख प्रपंच.
     बांधवांनो,जनगणनेसंदर्भातील मतप्रवाह व त्यामागची कारणे जाणून घ्यायच्या अगोदर आताच्या बौद्धांचा पूर्व इतिहास पाहणे गरजेचे वाटते. आताचे बौद्ध म्हणजे काही अपवाद वगळता पूर्वीचे महार,ज्यांना अस्पृश्य म्हणून तुच्च लेखले जात होते. ज्यांच्या स्पर्शाने व सावलीनेही विटाळ होत होता.सर्व बाजुंनी लाचार कमजोर व हतबल असलेला समाज म्हणजे महार. उच्च वर्णीयांच्या शेतात गुलाम म्हणून राबणारा, जगण्यासाठी म्हारकी, तराळकी करणारा,भाकरीचे तुकडे मागून व मेलेली जनावरे ओढून,त्याचे मांस खाऊन जगणारा समाज म्हणजे महार.एकंदरीत मानसिकदृष्टया खचलेला व गुलाम झालेला समाज म्हणजे महार .

या समाजात बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखे विश्वरत्न जन्माला आले.त्यांनी या समाजाची अवस्था पहिली आणि सर्व प्रथम त्यांनी त्यांच्यातील हरवलेला स्वाभिमान व विश्वास परत आणण्यासाठी प्रयत्न केला. आणि ते त्यात यशस्वी झाले. सर्व प्रथम त्यांनी महार समाज जगण्यासाठी जे हीन व्यवसाय करीत होते ते त्यांनी बंद करायला सांगितले. ज्या व्यवसायावर जीवन जगत होते ते व्यवसाय जर बंद केले तर जगायचे कसे याचा विचारही न करता बाबासाहेबांच्या एका इशाऱ्यावर हे हीन व्यवसाय बंद करून स्वाभिमानाने जगण्याचा निर्णय घेतला.बाबासाहेबांनी हा जो निर्णय घेतला त्यातून बाबासाहेबांचा संघर्ष हा भाकरीसाठी नव्हता तर स्वाभिमानासाठी होता, हे सिद्ध होते.पुढे जाऊन 14 ऑक्टोबर 1956 रोजी याच स्वाभिमानी समाजाने बाबासाहेबांच्या बरोबर बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आणि पूर्वीचा हिंदू धर्म व त्यातील जाती यापासून मुक्त झाले. आणि स्वाभिमानाने बौद्ध म्हणून जगू लागले.

परंतु बाबासाहेबांच्या नंतर या समाजाला आपली धार्मिक व राजकीय शक्ती निर्माण करता आली नाही,त्यामुळे त्याची आज नवबौद्ध म्हणून ओळख झाली आहे.बौद्ध धम्मात कोणतीही जात नसताना जातीचे प्रमाणपत्र त्याला काढावे लागते. त्यात त्याला मजबुरीत सन- 1956 अगोदर पूर्वाश्रमीचा महार म्हणून मान्य करावे लागते.आणि जातीचा दाखला मात्र नवबौद्ध असल्याचा मिळतो. या देशाचा अजब कारभार आहे जे लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतात जे नव ख्रिश्चन होत नाहीत, जे लोक मुस्लिम धर्म स्वीकारतात ते नव मुस्लिम होत नाहीत, जे लोक शीख धर्म स्वीकारतात ते नव शीख होत नाहीत, फक्त जे लोक बौद्ध धम्म स्वीकारतात तेच नव बौद्ध हातात. हा बौद्धांवर एकप्रकारे अन्यायच आहे.

  आता आपण सन- 2021 च्या जनगणनेत काय लिहावं, याबाबत बौद्धांमध्ये असलेले मतप्रवाह पाहू. यासंदर्भात बौद्धांमध्ये साधारण तीन मतप्रवाह दिसतात
1)- धर्माच्या रखाण्यात बौद्ध व जातीच्या रखाण्यात पूर्वाश्रमीची जात लिहावी.
2)- धर्माच्या रखाण्यात बौद्ध व जातीच्या रखाण्यात धर्मांतरित बौद्ध लिहा.
3)- फक्त धर्माच्या रखाण्यात बौद्ध लिहा.

      साधारण अशाप्रकारचे मतप्रवाह आपणास पाहायला मिळतात. आता आपण या प्रत्येक मतप्रवाह मागची कारणे व फायदे तोटे समजून घेऊ.
 1)-  धर्माच्या रखाण्यात बौद्ध व जातीच्या रखाण्यात आपली पूर्वाश्रमीची जात लिहा.
    वरील प्रमाणे मत जे लोक मांडतात त्यांचे म्हणणे असे आहे की आम्हाला अजूनही अनुसूचित जातीच्या सवलती व अनुसूचित जातीच्या संरक्षणासाठी केलेले कायदे याची गरज आहे. त्यामुळे आम्ही बौद्ध असलो तरी अनुसूचित जातीचे आहोत अशी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल.
      अशी भूमिका घेतल्यास होणारे फायदे व तोटे.

         या मतप्रवाहाचे फायदे
1)- बौद्धांची अनुसूचित जातीत नोंद होऊन अनुसूचित जातीची संख्या वाढेल,व सरकारच्या बजेट मध्ये वाढ होईल.
2)- नोकरी व शिक्षणातील आरक्षणाचा फायदा मिळेल.
3)- अट्रोसिटी ऍक्ट चा फायदा मिळेल.

         या मतप्रवाहाचे तोटे
1)- या मतप्रवाहामुळे अनुसूचित जातींची संख्या वाढेल पण बौद्धांची संख्या कधीच वाढणार नाही.
2)- बौद्धांची संख्या कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय स्थरावर प्रभाव पाडता येणार नाही.
3)- बौद्ध धम्म हा हिंदू धर्मासारखा जातींचा धर्म होईल.
4)- हिंदू धर्मातील जाती जशाच्या तश्या बौद्ध धम्मात आल्यामुळे बौद्ध धम्म हिंदू धर्माचीच एक शाखा आहे असे संगणारांचे म्हणणे खरे होईल.
5)- जगाच्या पाठीवर जातींचा समुदाय असणारा नवा बौद्ध धम्म उदयास येईल.

      आता आपण दुसरा मतप्रवाह पाहू.
2)- धर्माच्या रखाण्यात बौद्ध व जातीच्या रखाण्यात धर्मांतरीत बौद्ध लिहा.
       असे सांगणाऱ्या लोकांचे मत आहे की आम्ही बौद्ध धम्म स्वीकारला असल्यामुळे हिंदू धर्मातील जातीचा आमचा कसलाही संबंध राहिला नाही. परंतु वर्तमान परिस्थिती पाहता आजही आम्हाला अनुसूचित जातीचे फायदे घेण्याची गरज आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला जे अनुसूचित जातीतून बौद्ध धम्म स्वीकारत आहेत त्यांना धर्मांतरीत बौद्ध म्हणून महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातीच्या सूची मध्ये नंबर 60 वर घ्यावे व आम्हाला अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात. असे सरकारने केल्यास अनुसूचित जातीतुन बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा पूर्वीच्या हिंदू धर्म व त्याच्या जातीचा काहीच संबंध राहणार नाही. धर्मांतरित बौद्ध म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण होईल. 

    या मतप्रवाहाचे फायदे
1)- धर्माच्या रखाण्यात बौद्ध व जातीच्या रखाण्यात धर्मांतरित बौद्ध लिहणाऱ्यांचा स्वतंत्र समूह तयार होईल.
2)- हिंदू धर्म व त्यांच्यातील जातीचा आमचा कोणताही संबंध नाही असा स्वाभिमान बाळगता येईल.
3)- अनुसूचित जातीचे सर्व फायदे घेता येतील.
4)- अनुसूचित जातीसाठी असणारे सरकारी राखीव बजेट वाढेल.

 या मतप्रवाहामुळे होणारे तोटे
1)- या मतप्रवाहाची स्वतंत्र नोंद झाल्यामुळे बौद्धांमध्ये विभाजन होईल.
2)- या मतप्रवाहाची स्वतंत्र नोंद झाल्यामुळे बौद्धांच्या लोकसंख्येत काहीच फरक पडणार नाही.
3)- धर्मांतरित बौद्धांना अनुसूचित जातीत समाविष्ट केल्यामुळे ओबीसी व खुल्या प्रवर्गातून बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलू शकेल.
4)- बाबासाहेबांच्या संकल्पनेतील"प्रबुद्ध भारत" या मिशनला अडचण निर्माण होऊ शकेल.

आता आपण तिसरा मतप्रवाह पाहू.
3)- फक्त धर्माच्या रखाण्यात  बौद्ध म्हणून लिहा.
     वरीलप्रमाणे ज्यांचे मत आहे त्यांचे म्हणणे असे आहे की 14 ऑक्टोबर 1956 ला आम्ही बौद्ध झालो. तेव्हापासून आमचा नवा जन्म झाला आहे त्यामुळे आमचा आमच्या जुन्या धर्माशी व त्यातील जातीशी कसलाही संबंध नाही.बाबासाहेबांच्या संकल्पनेतील "प्रबुद्ध भारत" निर्माण करायचा असेल तर आम्ही स्वाभिमानाने बौद्ध म्हणून जगले पाहिजे व बौद्ध म्हणून वागले पाहिजे. 

    या मतप्रवाहाचे फायदे
1)- जनगणनेत बौद्धांची लोकसंख्या वाढेल.
2)- बौद्धांची लोकसंख्या वाढल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्ध राष्ट्रांचे लक्ष वेधता येईल.
3)- भारतात बौद्धांची स्वतंत्र ओळख निर्माण होईल
4)- बौद्ध धम्माचे शुद्ध स्वरूप राखता येईल.
5)- अखिल भारतीय पातळीवर बौद्ध एकसंघ राहतील.
6)- ओबीसी,खुला प्रवर्ग यातून धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारणाऱ्या लोकांना कोणतेही मानसिक दडपण राहणार नाही.
7)- अनुसूचित जाती,जमाती,ओबीसी, खुला, आदिवासी या सर्व प्रवर्गातून धर्मांतर करून बौद्ध धम्मात प्रवेश घेणाऱ्या लोकांमध्ये जातीची भावना नष्ट होऊन एकसंघपणाची भावना निर्माण होईल.
8)- प्रबुद्ध भारताच्या दिशेने वाटचाल करण्यास कोणतीच अडचण राहणार नाही.
9) जातवीहरीत,मानवतावादी आदर्श समाज व्यवस्था निर्माण करता येईल.
10)- धार्मिक अल्पसंख्याक म्हणून सवलत मिळेल.

          या मतप्रवाहाचे तोटे
1)- बौद्धांची स्वतंत्र नोंदणी झाल्यामुळे अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी होईल. त्याचा परिणाम बजेट व राखीव जागा यावर दिसून येईल.
2)- अनुसूचित जातीच्या सवलती मिळणार नाहीत.
     वरील तिन्ही मतप्रवाह आपण पाहिले आहेत. प्रत्येक मतप्रवाहामागची कारणे व त्याचे फायदे तोटे आपण पाहिले. वास्तविक पाहता जे लोक अनुसूचित जातीच्या सवलती जाऊ नयेत यासाठी येणाऱ्या जनगणनेत धर्माच्या रखाण्यात बौद्ध व जातीच्या रखाण्यात पूर्वाश्रमीची जात लिहायला सांगतात यात काही तत्य नाही कारण जनगणनेचा उद्देश हा जात व धर्मनिहाय डोकी मोजण्याचा पोग्राम आहे. त्यामुळे आपण स्वाभिमानाने फक्त बौद्ध लिहले तरी आपल्या सध्याच्या अर्थात 1990 च्या कायद्यानुसार बौद्धांना अनुसूचित जातीच्या सर्व सवलती मिळणार आहेत.फक्त अनुसूचित जातीची संख्या कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम सरकारी बजेट व राजकीय आरक्षित जागा यावर दिसतो. त्यामुळे बजेट थोडा कमी झाल्यामुळे व राजकीय आरक्षित जागा एक दोन कमी झाल्यामुळे एवढा काय फरक पडणार आहे. पण आपल्या या स्वार्थापायी जातींचा बौद्ध धम्म बनला तर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. एका वाक्यात सांगायचे झाले तर बाबासाहेबांचे प्रबुद्ध भारताचे मिशन समाप्त होऊ शकते.

      दुसरा पर्याय म्हणजे अनुसूचित जातीतून धर्मांतर करून बौद्ध बनलेल्या समूहाला धर्मांतरित बौद्ध म्हणून अनुसूचित जातीच्या सुचिमध्ये 60 व्या क्रमांकावर समाविष्ट करण्याचा जर स्वीकारला तर इथे फक्त अनुसूचित जातीतुन धर्मांतर करणाऱ्यांचाच विचार होईल. ओबीसी, आदिवासी,व खुल्या प्रवर्गातून धर्मांतर करणाऱ्यांचा विचार होत नाही. मग ज्या प्रमाणे अनुसूचित जातीतून धर्मांतर करणाऱ्या बौद्धांसाठी त्याच प्रवर्गाच्या सवलती मिळण्यासाठी मागणी करावी लागत आहे, अगदी त्याच प्रमाणे वेगवेगळ्या प्रवर्गातून धर्मांतरित झालेल्या बौद्धांसाठी त्याच प्रवर्गाच्या सवलती मिळण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि हे बुद्ध धम्माच्या समता या तत्वावरच घाव आघात करणारे आहे.
   सन-2021 च्या जनगणनेत स्वाभिमानाने फक्त बौद्ध लिहा असा सांगणारा जो मतप्रवाह जो आहे तो मतप्रवाह बौद्धांची लोकसंख्या वाढवेल, बौद्धांची जातवीरहीत स्वतंत्र ओळख निर्माण होईल, सध्याच्या कायद्यानुसार अनुसूचित जातीच्या सर्व सवलती सुद्धा मिळतील. बुद्ध धम्माचे शुद्ध स्वरूप राखता येईल. 

     बौद्ध बांधवांनो,आता तुम्हीच निर्णय घ्या, येणाऱ्या जनगणनेत जातींचा उल्लेख करून जातींचा समुचय असणारा नवा बौद्ध धर्म निर्माण करायचा ? धर्मांतरित बौद्ध म्हणून अनुसूचित जातीची मान्यता मिळवून फक्त अनुसूचित जातीच्या लोकांचाच विचार करायचा ? की फक्त बौद्ध लिहून बौद्ध धम्माचे शुद्ध स्वरूप राखून, बौद्धांची संख्या वाढवून,आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्ध राष्ट्रांचे लक्ष वेधून समस्त भारतीयांचा विचार करून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने विचार करायचा.
या सर्व बाबींचा विचार करता येणाऱ्या सन- 2021 च्या जनगणनेत स्वाभिमानाने फक्त "बौद्ध " लिहा.
वाचा - विचार करा - आणि योग्य तो निर्णय घ्या.

राजाभाऊ कदम... मो.9768833811
 राष्ट्रीय अध्यक्ष -  समता सैनिक दल
 दि.1/11/20

 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com