स्थायी समितीची सभा सभागृहात घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिकेला आदेश     

ठाणे महापालिका स्थायी समितीची सभा होणार सभागृहात  

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या याचिकेवर
मुंबई उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिकेला आदेश     

 


 

ठाणे
ठाणे महापालिकेची स्थायी समितीची सभा वेबिनारद्वारे न घेता प्रत्यक्ष सभागृहात घेतली जावी या मागणीबाबत ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने आज जगदाळे यांची मागणी रास्त ठरवत ठाणे महापालिकेला स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश दिले आहेत.           

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व अनुषंगिक मार्गदर्शन सूचना वेळोवेळी निर्गमित केल्या आहेत.  स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या विहित सभा/बैठका घेण्याचे बंधनकारक केले होते. ठाणे महापालिका कोरोना काळात स्थायी समिती व सर्वसाधारण सभा वेबिनारद्वारे घेत आहे.  

 

वेबिनार सभांमुळे गोंधळाचे वातावरण होत होते.  प्रत्यक्ष निर्णय काय होतो, चर्चा काय सुरू आहे याची माहितीच लोकप्रतिनिधींना मिळत नसते. तसेच सत्ताधारी वेबिनारद्वारे आपले निर्णय लादत होती. ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी प्रत्यक्ष सभागृहात आठवड्यातून एक सभा घ्यावी अशी मागणी वेळोवेळी आयुक्त, स्थायी समिती सभापती, महापौर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. मागील स्थायी समितीच्या बैठकीतही पुढील सभा प्रत्यक्ष सभागृहात घेतली जाईल असे आश्वासन स्थायी समिती सभापतींनी दिले होते. मात्र ही सभा पुन्हा वेबिनारद्वारे घेतली गेली आहे. या बाबत हणमंत जगदाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  

 

न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करून ठाणे महापालिकेला स्थायी समितीची सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्याचे आदेश दिलेत.  तसेच एखाद्या सदस्याला सभेस उपस्थित राहण्यास अडचण असेल तर वेबिनारद्वारे उपस्थित राहण्याचा पर्याय दिला आहे. सर्वसाधारण सभेबाबत 1 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.  न्यायाधिश एस. एस. शिंदे आणि जामदार यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. हणमंत जगदाळे यांच्या बाजूने वकील सौरभ बुटाला यांनी बाजू मांडली तर ठाणे महापालिकेच्या वतीने राम आपटे यांनी बाजू मांडली.  

यापुढे तरी आशा करू की, स्थायी समिती बैठक आठवड्यातून एकदा कोणत्याही परिस्थितीत सभागृहात पार पडेल जेणेकरून शहराच्या दृष्टीकोनातून प्रत्यक्ष चर्चा करता येईल. सध्या कोविड-19 तसेच इतर नागरी समस्यांबाबत आम्हास चर्चा करण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याबाबत मा. न्यायालयाचे आभार तसेच याकामी आमच्या वतीने सौरभ बुटाला यांनी काम पाहिले त्यांचे सुद्धा अभिनंदन हणमंत जगदाळे यांनी केले आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA