Trending

6/recent/ticker-posts

पद्मनाथस्वामी मंदिरातील काही पुजारी कोरोनाग्रस्त, भाविकांसाठी दर्शन १५ ऑक्टोबरपर्यंत बंद

पद्मनाथस्वामी मंदिरातील काही पुजारी कोरोनाग्रस्त, भाविकांसाठी दर्शन १५ ऑक्टोबरपर्यंत बंदतिरुवनंतपुरम
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत देशातील इतर सर्व व्यवहारासह धार्मिक स्थळं देखील बंद करण्यात आली  होती. महाराष्ट्रात मंदीरं उघडण्यास परवानगी नसली तरी केंद्र सरकारने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात काही अटी आणि नियमांसहीत मंदिरं उघडण्यास परवानगी दिली आहे. ज्यामध्ये सर्वात श्रीमंत समजले जाणारे कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणारे  केरळचे तिरुवनंतरपुरमच्या प्रसिद्ध पद्मनाथस्वामी मंदिरही २६ ऑगस्टपासून भाविकांसाठी खुलं करण्यात आले. सर्व अटी व शर्ती नियमांचे पालन करूनही  पद्मनाथस्वामी मंदिरातील काही पुजारी शुक्रवारी कोरोनाग्रस्त झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर भाविकांसाठी मंदिरात १५ ऑक्टोबरपर्यंत दर्शन रोखण्यात आलंय. मंदिराच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे दोन मुख्य पुजारी, आठ सहकारी पुजारी आणि दोन गार्ड कोविड १९ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंदिरात भाविकांसाठी दर्शनाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भाविकांना मंदिरात दाखल होण्यास परवानगी नसली तरी मंदिरातील दररोजची पूजा मात्र नित्यनेमाने सुरूच राहील.असे मंदीर व्यवस्थापनाने कळवले आहे. 


दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोविड १९ चे कडक नियम लागू करण्यात आले होते. दर्शनासाठी भाविकांना एक दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. तसंच दर्शनासाठी येताना आधार कार्ड आणि ऑनलाईन बुकिंगची एक प्रत सोबत बाळगण्यास सांगण्यात आलं होतं. तसंच मंदिराकडून एक निवेदन जाहीर करून सकाळी ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत ते सायंकाळी ५.०० ते ६.४५ पर्यंत दर्शन सुरु राहील, अशीही माहिती देण्यात आली होती.  एका वेळी केवळ ३५ भाविकांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. तसंच एका दिवसात केवळ ६६५ भाविकांना दर्शन करता येत होतं. भाविकांना मास्क परिधान करणे, साबणानं हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे असूनही कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मंदीरात कसा झाला याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात देशभरात आणखीही काही मंदिरं भाविकांसाठी उघडण्याची तयारी सुरू आहे. दिल्लीचं भव्य स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरही १३ ऑक्टोबरपासून उघडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. इथेही सीमित संख्येलाच दर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. याशिवाय वृंदावनचं प्रसिद्ध बांकेबिहारी मंदिरही १७ ऑक्टोबरपासून नियमित दर्शनासाठी उघडलं जाणार आहे.


Post a Comment

0 Comments