समता विचार प्रसारक संस्थेतर्फे लोकवस्तीतील मुलांच्या कला दर्शनाचा, वैचारिक अभिचर्चेचा कार्यक्रम

 समता विचार प्रसारक संस्थेतर्फे लोकवस्तीतील मुलांच्या कला दर्शनाचा, वैचारिक अभिचर्चेचा कार्यक्रमठाणे
 साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांना मानवंदना म्हणून प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला लोकवस्तीतील मुलांच्या कला दर्शनाचा, वैचारिक अभिचर्चेचा कार्यक्रम समता विचार प्रसारक संस्थेतर्फे घेतला जातो.  लोकवस्तीची अभिव्यक्ती या थीमवर सादर झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्रि निरजा उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी समता विचार प्रसारक संस्थेचे विश्वस्त, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते.  मुलांनी आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून, त्यावर विचार करून आपली मतं मांडणे, सभोवतालात आणि स्वतः मध्येही होणार्‍या बदलांवर भाष्य करणे हे कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे, असे कवयित्रि निरजा यांनी यावेळी व्यक्त केले. 


 लोकवस्तीतील मुलांनी त्यांच्या कुटुंबात, समाजात घडणार्‍या गोष्टीवर, आपल्या  अनुभवांबद्दल मनमोकळे पणाने आपले विचार आपल्या शब्दात मांडायचे होते. प्रथितयश पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर आणि सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता श्रीवास्तव यांनी निरीक्षक म्हणून काम केले आणि नोंदणी केलेल्या ३१ मुली मुलांमधून त्यांनी १४ जणांची अंतिम कार्यक्रमात सादरीकरणासाठी निवड केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका आणि नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर यांनी केले. तर स्वागत आणि प्रस्तावना संस्थेच्या कार्यकर्त्या सीमा श्रीवास्तव यांनी केली.  


सुरुवातीस या कार्यक्रमात, अनुजा लोहार, वैष्णवी करांडे, पंकज गुरव, सुनील दिवेकर, दीपक वाडेकर, प्रगती वीर, प्रवीण खैरालिया, लता देशमुख, मानसी खोंड, सई मोहिते, हेमाली शिंदे, कल्पना भोजने या निवड झालेल्या लोकवस्तीतील कलाकार - कार्यकर्त्यांनी कोरोना झाल्यावरचे अनुभव, लॉकडाउन मधले अनुभव, आयुष्यात बदल करणार्‍या घटना आणि त्यावरचे विचार, मी एक समलैंगिक, सामाजिक संस्थांचं महत्व, सार्वजनिक उत्सवांचे चांगले वाईट अनुभव, तंत्रज्ञानाची अपरिहार्यता, महिलांवरील अत्याचार, स्त्रीयांबद्दलचा अन्यायकारक दृष्टिकोन, अंधश्रद्धा अशा सारख्या विविध विषयांवर आपली मते स्पष्टपणे आपल्याच शब्दात मांडली.


या वेळी सन्माननीय पाहुणे असलेले सुप्रसिद्ध कलाकार पंकज विष्णु यांनी रत्नाकर मतकरी यांच्या ‘श्रद्धेला डोळे असतात का?’ या ललित लेखाचे रंगतदार वाचन केले. ते म्हणाले, मतकरी सरांना ऐकताना त्यांच्या जाणिवा आपल्यामध्ये झिरपतात हा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे, तोच प्रत्यय मला या मुलांच्या अभिव्यक्ती ऐकताना आला. प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या सकारात्मक दृष्टीकोनाने आपला समाज आबाद होईल याची खात्री वाटते. मिलिंद अधिकारी म्हणाले वंचितांच्या रंगमंचामुळे मुले वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात, आपली मतं बनवतात, त्यांची विचार शक्ती वाढते, ते स्वतःचा शोध घ्यायचा प्रयत्न करतात हे या उपक्रमाचे फलित आहे.


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी, उपाध्यक्ष लतिका सु. मो., सचिव हर्षलता कदम, सह संयोजक मीनल उत्तूरकर, खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले आदींनी विशेष मेहनत घेतली, असे संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सांगितले. झूम आणि फेसबुक माध्यमातून सादर झालेला हा कार्यक्रम जगभरातील रसिकांनी पाहिला, अशी माहिती या कार्यक्रमाचे तंत्रज्ञ सुजय ठाकूर यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA