मोनो-मेट्रो सुरू, लोकल सेवा कधी- मुंबईकरांचा एकच प्रश्न

मोनो-मेट्रो सुरू लोकल सेवा कधी- मुंबईकरांचा एकच प्रश्नमुंबई
महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यापासून बंद असलेली देशातील पहिली मुंबई मोनो रेल्वे सेवा 6 महीन्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी सुरू झाली.  सध्या याची फक्त चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल ट्रॅकवर फेरी चालेल. या मोनो रेल्वेला परत सुरू करण्यापूर्वी सरकारने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर एक एसओपी जारी केली आहे. ज्यामध्ये  विना मास्क प्रवाशांना एंट्री मिळणार नाही. ट्रेनमध्येही प्रवाशांना सोशळ डिस्टेंसिंगचे पालन करावे लागेल. तिकीट घेणाऱ्या प्रवाशांना आपल्या मोबाईलमध्ये इंस्टॉल आरोग्य सेतू अॅपवर ग्रीन सिग्नल दाखवावे लागेल.  ट्रेनमध्ये एक सीट सोडून बसावे लागेल. प्लास्टिक टोकन, पेपर तिकीट दिले जाणार नाही. फक्त मोबाइल फोनवर डिजिटल तिकीट जारी केले जाईल. प्रवेश द्वारावर प्रत्येक प्रवाशाची स्क्रिनींग होईल. असे निर्बंध घालून देण्यात आले आहेत. तसेच, प्रवाशांसाठी 'नो मास्क-नो एंट्री'चे स्लोगन दिले आहे.


मोनो नंतर १९ ऑक्टोबरपासून मेट्रो रेल्वे सेवाही सुरु होत असली तरी सर्व सामान्य प्रवाशांना लोकल सेवेचीच अपेक्षा आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून समजली जाणारी सर्वसामान्यांची लोकल सेवा कधी सुरू होणार हाच प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर मात्र राज्य सरकारही देत नाही आणि केंद्र सरकारही त्यामुळे मुंबईकरांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यातच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बीगेन अंतर्गत आता विविध विभागांना लोकलने मुंबईत प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासह अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या जवळपास सर्वच विभागांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हीच बाब समोर ठेवत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या खाजगी सुरक्षारक्षकांनी देखील आम्हाला लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, आम्ही मागील 7 महिन्यांपासून अनेक ठिकाणी दिवसरात्र सुरक्षा देण्याचं काम करत आहोत. यामध्ये मोठमोठ्या कंपन्या, रुग्णालये, महत्त्वाची ऑफिसेस, गाड्यांचे शोरूम यांचा समावेश आहे. टाळेबंदीच्या काळात ज्यावेळी मोठमोठया कंपन्या आणि ऑफिसेस बंद होती त्यावेळी आमच्या सुरक्षा रक्षकांनी याठिकाणी अहोरात्र सेवा केली आहे. त्याकाळात वाहतूक सेवा उपलब्ध नसताना देखील या कर्मचाऱ्यांनी आर्थिक जादा भुर्दंड सहन करत आपली सेवा निष्ठेने बजावली आहे. त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे की, ज्या पद्दतीने राज्यसरकारने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बोर्डाला लोकलने प्रवास करण्याची मुंबईत परवानगी दिली आहे. त्याच पद्दतीने आम्हाला देखील मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या