जोगिला तलाव पुनर्विकास कामामध्ये बाधित झालेले नागरिक अद्यापही घरापासून वंचित
तात्काळ सदनिका देण्याचे महापौरांचे आदेश
ठाणे
ठाणे शहराचा विकास करीत असताना अनेक नागरिकांच्या निवासी व व्यावसायिक गाळे बाधित झाले आहेत. प्रभाग क्र. 22 अंतर्गत येत असलेल्या जोगिला तलावाचे पुर्नविकासाचे काम महापालिकेने हाती घेतले, यामध्ये 350 नागरिकांची घरे बाधित झाली, या नागरिकांवर अन्याय होवू नये व त्यांना हक्काची कायमस्वरुपी घरे मिळावीत यासाठी निर्णय घेण्यात आला होता. महापालिकेच्यावतीने बी.एस.यू.पी योजना राबविण्यात आली असून सदर योजनेतील काही सदनिका राखीव ठेवून या नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले. या सदनिकांचे वाटप देखील झालेले आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नव्हता. यासाठी संबंधितांकडून स्थानिक नगरसेवकांकडे सातत्याने मागणी होत होती. याबाबत स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने व नागरिकांची गैरसोय होवू नये या दृष्टीने निर्णय घेवून नागरिकांना सदर सदनिकांचा ताबा तातडीने देण्यात यावा असे देखील आदेश असे महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना दिले आहेत. .
ठाणे महानगरपालिका हद्दीतील जोगिला तलाव पुनर्जीवित कामामध्ये या ठिकाणच्या नागरिकांनी महापालिकेच्या विकासामध्ये योगदान दिले आहे. त्यांना महापालिकेच्या वतीने हक्काची घरे उपलब्ध व्हावीत असा निर्णय घेण्यात आला होता, यानुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सदनिका वाटपाचा करण्यात आला होता. सदरच्या सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा तातडीने लाभार्थींना देण्याची आवश्यकता आहे. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे यांचा वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून या नागरिकांना हक्काच्या घरात जाता यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे या नागरिकांना लवकरच हक्काची घरे मिळणार आहेत. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सदरबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांनादिले असल्याने काही दिवसांतच जोगिला तलाव पुर्नर्विकास कामामध्ये बाधित नागरिकांचे पुनर्वसन होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
0 टिप्पण्या