गावदेवी भुमिगत पार्कीगच्या कामाची होणार चौकशी - आयुक्तांनी दिल्या सुचना
ठाणे :
गावदेवी मैदानाखाली सुरु असलेल्या पार्कीगच्या कामाबाबत आता खुद्द स्मार्टसिटी लि. च्या सल्लागार समितीमधील सदस्या सुलक्षणा महाजन यांनीच आक्षेप घेतला आहे. त्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीनकुमार शर्मा यांची भेट घेतली. या भेटीनंतर आयुक्तांनी या कामाची चौकशी करण्याच्या सुचना संबधींतांना दिल्या आहेत. त्यामुळे गावदेवी मैदानाखाली सुरु असलेले पार्कीगचे कामाच्या अडचणी वाढणार असल्याचेच दिसत आहे.
स्मार्टसिटीच्या सल्लागार सुलक्षणा महाजन या नगर रचना तज्ञ आहेत. त्त्यामुळे त्यांनी जे काही आक्षेप घेतले आहेत. ते आता योग्य आहेत, असेच दिसत आहे. मुळात हे काम करतांना सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजूबाजूच्यांना देखील विश्वासात घेतले गेले नाही, त्यातही हा प्रकल्प उभारत असतांना त्याचा पालिकेला काय फायदा होणार याची माहिती घेतलेली नाही,
१०० ते १५० गाडय़ांकरीता एवढा कोटय़ावधींचा निधी खर्च केला जाणार आहे. त्या या प्रकल्पाचा नेमका उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. किमान या बाबींचा तरी विचार केल्यास पालिकेचे आर्थिक नुकसान तर होणार आहेच, शिवाय भविष्यात येथील आजूबाजूच्या इमारतींना देखील धोका संभावू शकणार आहे. तसेच बाजूला ठाणो महापालिकेचा जलकुंभ देखील आहे, त्याला देखील धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत जाधव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. तसेच कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास 3 किमी. परिसरात मोकळे मैदान असावे असेही नमुद आहे. परंतु या कामामुळे मैदानाची तेवढी क्षमता राहिल का? अशी शंकाही निर्माण होत आहे. शिवाय या भागात भुयारी गटार योजना, किंवा सिव्हरेजची वाहीनी देखील जात आहे. तसेच इमारतींच्या देखील सिव्हरेज लाईन लिकेज झाल्या तर त्याचाही त्रस या भुमीगत पार्कीगला होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबविण्यात यावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांच्या भेटीत केली आहे. त्यानंतर आयुक्तांना या पत्रची गंभीर दखल घेत, या प्रकरणाची चौकशी लावली असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
0 टिप्पण्या