शहरातील साफसफाई कामांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
ठाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सायंकाळी शहरातील विविध परिसरातील साफसफाई कामांची पाहणी केली. दरम्यान स्वच्छतेबाबत कोणतेही सबब ऐकूण घेतली जाणार नसल्याचा इशारा देखील महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी महापालिका भवन येथून चालतच साफसफाई कामाची पाहणी करण्यास सुरुवात केली.यामध्ये जनरल डॉ.अरुण कुमार वैद्य मार्ग, भक्ती मंदिर रोड, एलबीएस रोड, हरी निवास सर्कल, घंटाळी देवी मंदिर रोड, तसेच राम मारुती रोड आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची पाहणी केली.
कोरोना काळात शहरातील स्वच्छता अतिशय महत्वाचा विषय असून महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभागसमितीनिहाय साफसफाई जोर आला असून यासंदर्भात ठाणे महापालिका क्षेत्रात 2 ऑक्टोबर 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असल्याचे घोषित करण्यात आले आहे. या निमित्ताने महापालिका आयुक्त डॉ .शर्मा रोज विविध ठिकाणांची स्वच्छता कामाची पाहणी करणार आहेत. सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त यांचेकडून आपला प्रभाग स्वच्छ राहिल याची दक्षता घेण्यात येत आहे. यामध्ये रस्त्यावर साचलेला कचरा, रस्ते, गटर साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची साफसफाई करण्यात येत आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे,उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या