Top Post Ad

हात धुण्याची सवय’ ही जीवनपद्धती अंगिकारावी  - ॲड. यशोमती ठाकूर

‘हात धुण्याची सवय’ ही जीवनपद्धती अंगिकारावी-  -ॲड. यशोमती ठाकूर


            मुंबई
हात धुणे ही साधी पण अत्यंत महत्वाची सवय आहे, मात्र कोरोनामुळे आपल्याला याचे अधिक गांभीर्य जाणवले. आपल्याला वारंवार हात धुण्याची सवय ही एक जीवनपद्धती म्हणून अंगिकारावी लागेल, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. दि. 15 ऑक्टोबर रोजी जागतिक पातळीवर साजरा होणाऱ्या ‘जागतिक हात धुणे दिवस’ अर्थात 'ग्लोबल हॅण्डवॉशिंग डे' च्या अनुषंगाने महिला व बाल विकास विभाग आणि युनिसेफच्यावतीने काल आयोजित राज्यस्तरीय वेबीनारमध्ये त्या बोलत होत्या. या वेबीनारसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बाल विकास अधिकारी, युनिसेफचे वॉश स्पेशालिस्ट युसूफ कबीर, युनिसेफच्या न्युट्रीशन ऑफिसर डॉ. अपर्णा देशपांडे तसेच राज्यभरातील अंगणवाडी कार्यकर्त्या, पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.


            मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केलेल्या 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' कार्यक्रमाचा भाग म्हणून हा ‘ग्लोबल हॅण्डवॉशिंग डे’ संपूर्ण राज्यात राबवू असे आवाहन करत ॲड. ठाकूर म्हणाल्या की, स्वच्छतेबाबत मोठमोठ्या लोकांनी मार्गदर्शन केलेले आहे. कोरोनाच्या काळात हात धुण्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. आता जागतिक हात धुणे दिनाच्या निमित्ताने आपण वारंवार हात धुण्याचं महत्व लोकांपर्यंत प्रचार-प्रसाराच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात पोहोचूया. ॲड. ठाकूर पुढे म्हणाल्या की, अनेकांसाठी 'जागतिक हात धुणे दिवस' असतो हे सुद्धा कदाचित आश्चर्याचे असेल पण हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. ग्रामीण भागात हात धुण्याचे महत्व लोकांना माहिती आहे; परंतु, अजूनही अनेकजण मातीने हात धुतात. खरेतर साबणानेच हात धुतले पाहिजेत. अनेक लोक हात धुण्यासारख्या महत्वाच्या सवयीबाबत निष्काळजीपणा दाखवतात. या सर्वच गोष्टी आपल्याला सोडून स्वच्छ जीवन जगण्यास सुरुवात केली पाहिजे. या काळात सार्वजनिक आरोग्य, वैयक्तिक आरोग्य व मानसिक आरोग्य या गोष्टींकडेही आपल्याला लक्ष द्यायला लागेल.


            आयुक्त श्रीमती मालो म्हणाल्या, कुपोषणासारख्या संकटावरही आपण हात धुण्याच्या सवयीमुळे काही प्रमाणात आळा आणू शकतो एवढे या विषयाचे महत्व आहे. ते लोकांना पटविण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत होतो. मात्र, कोविडच्या काळात हे शक्य झाले आहे. जागतिक हात धुणे दिनानिमित्ताने विभागाने विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्वच अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांसाठी हात धुण्यासाठी सोप्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी नियोजन करावे.


            युनिसेफच्या राज्य प्रमुख श्रीमती राजेश्वरी चंद्रशेखर म्हणाल्या, केवळ हात धुवायची सवय दुर्लक्षित केल्याने देशाला लाखो- करोडो रुपयांचे नुकसान होते. यावर्षीच्या जागतिक हात धुवा दिवसाची थीम ही ‘ हॅण्ड हायजीन फॉर ऑल’ अशी आहे, असे सांगितले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगूरू तसेच राज्य सरकार आणि युनिसेफच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर त्वरीत हात धुणे आवश्यक आहे. हात धुण्याची सवय नसल्यास वारंवार आजारी पडल्याने प्रतिकारशक्ती कमी होत जाते. कोरोनाच्या काळात तर हात धुणे ही अत्यंत महत्वाची गरज बनलेली आहे.


            यावेळी युनिसेफचे संस्थात्मक पाणी, स्वच्छता व आरोग्य राज्य सल्लागार संदीप तेंडोलकर व सॅक्रेड संस्थेचे रवींद्र केळगावकर यांनीही अंगणवाड्यांमधील मुलांशी करावयाचा संवाद व हात धुण्याच्या सुविधांच्या पर्यायाबद्दल मार्गदर्शन केले. युनिसेफचे पाणी, स्वच्छता व आरोग्य अधिकारी आनंद घोडके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातर्फे विजय क्षीरसागर यांनी प्रयत्न केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com