मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सहा वर्षात 60 अब्जांनी वाढ

भले भारताची अर्थव्यवस्था नीचांकाकडे जात असली तरी मुकेश अंबनी यांच्या संपत्तीत सहा वर्षात 60 अब्जांनी वाढ

जगातील अब्जाधीशांची रोजच्या रोज यादी प्रसिद्ध करणाऱ्या ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार भारतातील उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत आता सहाव्या क्रमांकावर पोचले आहेत.  जगातील पहिल्या पंधरा अब्जाधीशांच्या नावांमध्ये ब्रीक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका) गटातून आणि संपूर्ण विकसनशील देशांमधून फक्त भारतातील मुकेश अंबानी यांचेच नाव आहे.  कोरोना पूर्वीपासूनच देशाची अर्थव्यवस्था नीचांकाकडे जात असली तरी मुकेश अंबानीच्या उद्योगधंद्याची फक्त भरभराटच होत आहे. इतकी की चालू वर्षात आतापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक म्हणजे २२ अब्ज इतकी माया त्यांच्या खात्यात जमली आहे. म्हणजे मागील सहा वर्षात त्यांची संपत्ती पाचपट वाढलेली आहे.  भाजपचे मोदी सरकार  सत्तेत येण्यापूर्वी (२०१४) ला १८ अब्ज इतकी संपत्ती आणि ४०व्या क्रमांकावर असणारे आपले मुकेश अंबानी या सहा वर्षात फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधिशांच्या यादीत ८८ अब्ज इतक्या संपत्तीसह ६व्या क्रमांकावर आले आहेत.

त्यामुळे प्रत्येक भारतीयाची मान उंचावेल  माझी तर मान झेंडा फडफडणाऱ्या खांबासारखी एकदम ताठ झालेली आहे. मात्र काही लोकांना मुकेशजींची ही प्रगती, संपत्ती बघवत नाही. काय तर म्हणे मुकेशजींचा हात मोदीजींच्या पाठीवर असल्यामुळेच हे होतंय. बरोबर वाचलंत तुम्ही. नीताजींचा हात मोदीजींच्या हातात आणि मुकेशजींचा हात मोदीजींच्या पाठीवर हा मोनालिसाप्रमाणे जगप्रसिद्ध असलेला फोटो तुम्ही पाहिला असेलच!

तर जीओ पेमेंट बॅंकेचा एसबीआय बॅंकेसोबत एक करार झाला. ज्यानुसार एसबीआयच्या ग्राहकांना डिजीटल बॅंकींग आणि फायनान्शियल सर्विसेस जीओ पेेमेंट बॅंकेकडून उपलब्ध झाल्या. ज्या बॅंकेला परवानाच २०१५ साली मिळाला त्या बॅकेचा केवळ तीन वर्षात देशातील सर्वात मोठ्या पब्लिक सेक्टर बॅंकेत शिरकाव झाला. आणि ज्यांच्या कार्यकाळात हा करार झाला त्या अरूंधती भट्टाचार्य या एसबीआयच्या अध्यक्ष म्हणून निवृत्त झाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नॉन एक्झिक्यूटीव डायरेक्टर झाल्या! अहाहा, काय योगायोग आहे ना!

रिलायन्स जीओने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा डेटासाठीचा असणारा संपूर्ण जगातील सर्वाधिक कमी दर त्यांनी दिला. त्यामुळे बाकीच्या कंपन्यांचे कंबरडे मोडलेच. शिवाय पूर्ण वर्षभरासाठीच्या नवनवीन ऑफर्सही दिल्या. त्यामुळे सेल्युलर ऑपरेटर्स ऑफ इंडिया असोसिएशनने शासनाकडे विनंती केली की हे चूकीचं असून तुम्ही यामध्ये भूमिका घ्या. कारण ट्रायच्या नियमानुसार कुठलीही सेल्युलर ऑपरेटर कंपनी तीन महिन्यांपेक्षा जास्तीच्या ऑफर्स ग्राहकांना देऊ शकत नाही. आणि काय आश्चर्य, ट्रायने आपला आधीचा नियमच बदलून टाकला!

मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात मोदीजींनी इ कॉमर्स धोरणात बदल केला. ज्यानुसार २५ टक्क्यांहून अधिक परदेशी कंपन्यांच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना अटकाव घालता येईल. याचा साधा सरळ अर्थ ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांच्या धंद्यावर टाच आणणे. त्या धोरणाचे समर्थन करताना मोदी सरकार म्हणाले की स्थानिक उद्योगधंद्यांना याचा फायदाच होईल. अर्थात स्थानिक म्हटल्यावर आपल्या मुकेशजींचेच नाव त्यांच्या डोळ्यासमोर असणार हे ओघाने आलेच! त्यानंतर ऑनलाईन विक्री क्षेत्रातला भारतातील सर्वाधिक किंमतीचा ५.७ अब्ज किंमतीचा करार रिलायन्स आणि फेसबुकमध्ये झाला. ज्यायोगे भारतातील ३ कोटी रिटेलर्सपर्यंत पोचणं आता रिलायन्सला अगदी सहज शक्य होणार आहे. जाणकारांच्या मते, २०२४पर्यंत भारतातील इ कॉमर्स क्षेत्रात ९९ अब्ज रूपयांची उलाढाल अपेक्षित आहे आणि त्यातला निम्मा हिस्सा एकट्या आपल्या मुकेशजींना मिळेल! याला म्हणतात खरा मास्टरस्ट्रोक!

त्यामुळे २०२४पर्यंत आपले मुकेशजी जगातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आपल्याला पहायला मिळतील! किमान पहिल्या तीनांमध्ये तरी ते निश्चितीच असतील!  तोवर आपण सारे भारतीय भक्त, भक्तीणी यांच्यासोबत खेळत बसूया. तिकडे ५ लाख कोटीच्या अर्थव्यवस्थेचे आपल्या मोदीजींचे स्वप्न मुकेशजी पूर्ण करतील आणि 'करलो दुनिया मुठ्ठी में' हे मुकेशजींच्या वडिलांचे स्वप्न आपले मोदीजी पूर्ण करतील!

आनंद भंडारे, 

ता. क.-
या पोष्टमधील आकडेवारी आणि तपशील The rise of the monopolists in Modi’s India या १२ ऑक्टोबर २०२० रोजी एशिया टाईम्स या वर्तमानपत्रातील रवि कांत यांच्या लेखातील आहे. रवि कांत यांच्या धाडसाचे कौतुक यासाठी करायला हवे की पुराव्यानिशी या गोष्टी त्यांनी मांडल्या आणि एशिया टाईम्सचेही आभार मानायला हवे की हे सगळं त्यांनी छापलं! जाणकारांनी रवि कांत यांचा तो लेख आवर्जून वाचावा https://asiatimes.com/2020/10/the-rise-of-the-monopolists-in-modis-india/. तसेच MN न्यूज चॅनेलचे संकेत एक विद्ोही यांचेही आभार ज्यांनी या लेखावर आधारीत तपशीलवार बातमी केली. https://m.facebook.com/story.php?story_fbid=2709762792569998&id=1809597039253249टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या