ठाण्यामध्ये ३० टक्केहून अधिक कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात ३१.२२ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण


गावकरी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे  -
    जिल्हा परिषद अध्यक्ष  व  मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहनठाणे
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेतर्गत आजपर्यंत ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात १ लाख २७  हजार ९२७ कुटूंबांचे प्रत्येक्ष गृहभेटीद्वारे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे ३१.२२ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागात या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी गावकरी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक युवकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे व मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) डॉ.रुपाली सातपुते यांनी केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या  मोहीमेचे दोन टप्पे असून पहिला टप्पा हा १५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० पर्यंत असणार आहे. तर दुसरा टप्पा १२ ऑक्टोबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० पर्यंत असणार आहे. 


ठाणे ग्रामीणमध्ये पहिला टप्पा दिनांक १५ सप्टेंबर २०२० पासून सुरू झाला असून जिल्ह्यातील मुरबाड,  भिवंडी, अंबरनाथ, कल्याण, शहापूर या पाच तालुक्यातील प्रत्येक गावोगावात ही मोहीम  राबवली जात आहे. यासाठी ६३२ पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकात आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आणि स्थानिक स्वयंसेवक यांचा समावेश असून त्यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी गावातील नागरिक, विविध सेवाभावी संस्था, युवकवर्गाने स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन मोहिमेत सहभाग घ्यायला हवा.    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आता पर्यंत मोहिमेतर्गत १ लाख २७ हजार ९२७ कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले असून  ५ लाख १८ हजार ३९८ नागरिकांचे आरोग्य  सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश संशयित कोव्हिडं तपासणी, व  उपचार, अति जोखमीचें व्यक्ती ओळखून त्यांना उपचार व कोव्हिडं १९ प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण, रुग्णांचे गृहभेटीद्वारे संरक्षण, कोव्हिडं तपासणी आणि उपचार, आरोग्य शिक्षण असून या उद्देशांची अंमलबजावणी पथकामार्फत केली जात आहे.


 


शहरातील ३२.०१ टक्के कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण
सर्वेक्षण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापौर,आयुक्तांचे आवाहन


ठाणे शहरातील ३२.०१ टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास १ लाख ४० हजार ९३६ कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.  दरम्यान कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केले आहे. कोरोनाची महामारी नियंत्रित करण्यासाठी आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ठाणे शहरामध्येसुद्धा महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक तसेच महापालिका कर्मचारी यांच्या सहाय्याने ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. दिनांक १८ सप्टेंबर २०२० पासून शहरात ही मोहीम सुरु असून यासाठी एकूण अंदाजे ५०० पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत शहरातील प्रत्येक कुटूंबांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आजपर्यंत ठाणे शहरातील ३२.०१ टक्के कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले असून जवळपास १ लाख ४० हजार ९३६ कुटूंबांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकांमार्फत सुमारे ४ लाख २३ हजार ५९८ नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या