समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जिद्दी व होतकरू विद्यार्थ्यांचा गौरव

स्वतःमधले गूण जोपासत सतत पुढे जाणारे एकलव्य, समाजासाठी प्रेरणादायी! - दिलीप प्रभावळकर
  


ठाणे
घरातील प्रतिकूल परिस्थतीत न डगमगता अभ्यास करत, दहावीच्या वर्षातही कामे करत, एसएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या एकलव्यांना माझा सलाम! त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीची वर्णने ऐकून त्यांच्या जिद्दीला, चिकाटीला माझा सलाम! कधीही हार न मानता स्वतःमधले गूण जोपासत सतत पुढे जाणारे एकलव्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. अशा प्रतिकूलतेमध्ये कितीही कमी गुण मिळवून पास झाले तरी ही त्यांचे गुण सधन स्थितीमधील मुलांना मिळालेल्या ९० – ९५ % गुणांबरोबर आहेत,अशा शब्दात सुप्रसिद्ध सिने - नाट्य अभिनेते आणि संवदेनशील लेखक दिलीप प्रभावळकर यांनी ठाण्यातील जिद्दी व होतकरू विद्यार्थ्यांचा गौरव केला.  झूम - फेसबुक द्वारे घेतलेल्या २८ व्या वार्षिक एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी आपले विचार मांडले.. 


 ठाणे महानगर पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले की, कमी गुण मिळाले तरी हरकत नाही पण परिस्थितीला न डगमगता शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहणे महत्वाचे आहे. या संस्थेने महानगर पालिकेच्या शाळांतील मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्या अभ्यासात मदत केल्याचा आवर्जून उल्लेख करून ते म्हणाले की, या वर्षी महापालिका शाळांचे निकाल खूप चांगले लागले असून दोन विद्यार्थ्यांना ९०%  पेक्षा जास्त गूण मिळाले आहेत. महानगर पालिका मुलांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन त्यांचा फायदा करून घेण्याचा आग्रह त्यांनी मुलांना केला.


ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेतर्फे  दर वर्षी जी मुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत चिकाटीने आणि जिद्दीने शालांत परिक्षा पास होतात त्यांना एकलव्य संबोधून त्यांचा जाहीर गौरव संस्थेतर्फे करण्यात येतो. या वर्षी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, ठाणे महानगर पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ हे ही एकलव्यांचे कौतुक करण्यासाठी पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या जेष्ठ कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर होत्या. अतिशय नेटक्या आणि सुनियोजित झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे एकलव्य कार्यकर्ते अजय भोसले आणि अनुजा लोहार यांनी केले. स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे या महात्मा जोतीराव फुले यांच्या अखंडाच्या गायनाने डॉ संजय मंगला गोपाळ यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. 


 या वर्षी १३० एकलव्य विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेमार्फत करण्यात आला त्या पैकी सुमारे ४५ मुले या झूम वरील कार्यक्रमाला उपस्थित होती. त्यांच्या यशाचे सादरीकरण खजिनदार सुनील दिवेकर, सह खजिनदार अजय भोसले, सीमा श्रीवास्तव आणि एकलव्य कार्यकर्ते प्रवीण खैरालिया, दीपक वाडेकर, अक्षता दंडवते, सुशांत जगताप, वैष्णवी कारंडे यांनी केले. पुरस्कर प्राप्त विद्यार्थ्यांपैकी राहुल माने, पूजा पाटील, सृष्टी  बावसकर,सायली दळवी, राधिका टमटा आदी विद्यार्थ्यांनी आपली संघर्ष कहाणी कथन करून संस्थेने केलेल्या बहुमोल मार्गदर्शना बद्दल ऋण व्यक्त केले. एकलव्य विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या गौरव पत्राचे वाचन प्राची डांगे या एकलव्य कार्यकर्तीने केले.


संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी आणि सचिव हर्षलता कदम यांनी एकलव्य सक्षमीकरण उपक्रमात मार्गदर्शन करणार्‍या, शैलेश मोहिले, मेघा मोहिले, उत्तम फलके, सुप्रिया कर्णिक, सीमा श्रीवास्तव, मानसी जोशी, चिखले, चैताली कदम आदी शिक्षकांच्या बहुमोल योगदानाची माहिती सांगत त्यांचा गौरव केला. या सर्व कार्यक्रमाची तांत्रिक धुरा पंकज गुरव या एकलव्य कार्यकर्त्याने सांभाळली. या कार्यक्रमात अमेरिकेतून विक्रांत कांबळे आणि प्रसाद झोपे, तर मुंबई ठाणे व राज्यभरातून सुप्रिया विनोद, हर्षदा बोरकर, प्रा. प्रवीण देशमुख, डॉ. गिरीश साळगावकर, सुरेश वैद्य, ज्योती केळकर, ऍड. निशा शिवूरकर, ऍड. नीता  कर्णिक, मतीन शेख, शिवाजी पवार, सुरेखा पवार, जयंत कुलकर्णी, अतुल गोरे, अजित पाटील, शुभांगी जोशी, सविता दळवी, राजेंद्र बहाळकर आदि मान्यवर उपस्थित होते, असे संस्थेचे विश्वस्त जेष्ठ कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सांगितले.  


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA