ठाणे महापालिकेची दीड महिन्यात १५२ कोटींची वसुली

कोविडमध्येही मालमत्ता कर वसुलीला जोर, दीड महिन्यात १५२ कोटींची वसुली
वसुली वाढविण्याचे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांचे आदेश


ठाणे
 ठाणे महानगरपालिकेची मालमत्ता कराची वसुली जोरात सुरू असून १६ जुलैपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेतंर्गत आजपर्यंत जवळपास १५२.६४ कोटी इतकी वसुली करण्यात महापालिकेला यश प्राप्त झाले आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीतंर्गत सर्वाधिक म्हणजे ४६.०७ कोटी रूपयांची वसुली करण्यात आली असून त्याखालोखाल वर्तकनगर आणि नौपाडा-कोपरी विभागाची वसुली झाली आहे.  दरम्यान महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे रोज उत्पन्न वाढीचा आढावा घेत असून मालमत्ता कराबरोबरच इतर कराची वसुली वाढविण्याचे आदेश त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

      कोविड महामारीचा सामना करण्यासाठी संपूर्ण महापालिका यंत्रणा कार्यरत असून दुसऱ्या बाजूला मालमत्ता कराच्या वसुलीचे उदिष्ट गाठण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत आहे. विशेषतः १६ जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी प्रभाग समितीस्तरावर अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या अधिपत्त्याखाली करवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.      या प्रयत्नांमुळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी १६ जुलै ते ६ सप्टेंबर या कालावधीत तब्बल १५२.६४ कोटी रूपये वसुली करण्यात आली. यामध्ये दिवा प्रभागामध्ये ५.१४ कोटी, कळवामधून ८.०३ कोटी, लोकमान्यनगर-सावरकर प्रभागामधून ८.०९ कोटी इतकी वसुली करण्यात आली तर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून सर्वाधिक ४६.०७ कोटींची वसुली करण्यात आली. नौपाडा-कोपरी प्रभागामध्ये २८.८५ कोटी इतकी वसुली झाली असून उथळसरमध्ये १४.५८ कोटी, वर्तकनगर प्रभागामध्ये २९.६५ कोटी वसुली करण्यात आली आहे. वागळे प्रभाग समितीमध्ये एकूण ५.९० कोटी रूपयांची वसुली करण्यात आली असून मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत ३.७१ कोटी रूपयांची वसुली करण्यात आली आहे.

दरम्यान सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात  १६ जुलै ते ६ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत मालमत्ता कराची एकूण वसुली ४२.०५ कोटी इतकीच झाली होती. त्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीपेक्षा जास्त प्रमाणात मालमत्ता कर वसुलीमध्ये वाढ झाली आहे. तथापि मालमत्ता कराची वसुली वाढविण्याबाबत महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे यांना सूचना दिल्या असून प्रभाग समितीनिहाय आढावा घेवून मालमत्ता कराची वसुली कशी वाढेल याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.


एका बाजुला महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना महामारीशी लढत असतानाच दुसऱ्या बाजुला महापालिकेची वसुली वाढावी याकडेही आम्ही बारकाईन लक्ष देत आहोत. सुरूवातीचे काही महिने संपूर्ण यंत्रणा कोरोना कोविड-१९ चा सामना करण्यात व्यस्त होती. तथापि मालमत्ता कर असो वा इतर कर असो जे महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत त्याची वसुली करण्याची आवश्यकता लक्षात घेवून जुलै मध्यापासून आपण मालमत्ता कर वसुलीली प्राधान्य दिले. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट असूनही नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य केले आहे ही विशेष कौतुकाची बाब आहे. यापुढेही मालमत्ता आणि इतर कर वसुली वाढविण्यावर आमचा भर असल्याचे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी सांगितले.


दरम्यान कोविडची महामारी काळात ठाणेकरांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. त्यातच अद्याप रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने हाताला काम नाही. अशातच ठामपाने मालमत्ता कर वसुलीचा सपाटा लावला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे युद्धपातळीवर भरत, अनधिकृत बांधकामांवर तकलादू कारवाई करत ठामपाची करवसुली जोरात असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA