जीर्ण झालेली इमारत तसेच भेगा पडलेल्या भिंतींमुळे ; अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका
शहापूर
आसनगाव येथील शहापूर वनविभागातील विभागीय कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने तसेच भिंतींना भेगा पडल्याने इमारतीची अवस्था दयनीय झाली आहे. या इमारतीत काम करणारे कर्मचारी, अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे या विभागीय कार्यालयाची नवीन इमारत बांधकाम करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी वसंत तुकाराम घुले उप वनसंरक्षक शहापूर वनविभाग शहापूर यांनी मुख्य वनसंरक्षक ठाणे यांचे कडे केली आहे.
शहापूर वनविभागातील विभागीय कार्यालयाची इमारत ६० वर्षांपूर्वी बांधली आहे. तेव्हापासून आजतागायत या इमारतीचे मजबुतीकरणासाठी अथवा मोठ्या प्रमाणात दुरुस्ती न झाल्याने इमारतीच्या भिंतींना मोठ मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. या भेगा पडलेल्या भिंती कधीही कोसळून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे. इमारत ६० वर्षे जुनी असल्याने ८० टक्के इमारत जीर्ण अवस्थेत आहे. अशा अवस्थेत अचानक इमारतीची पडझड झाल्यास कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या इमारतीची कन्सल्टिंग इंजिनिर यांनी पाहणी करून एप्रिल २०१९ ला स्ट्रक्चरल ऑडीट केले. त्यानुसार कन्सल्टिंग एजन्सीने ऑडीट रिपोर्टचा अभ्यास करून ही इमारत जीर्ण झाल्याचे नमूद करत सदर इमारत पूर्णपणे पाडून बांधणे अत्यावश्यक आहे. असा अहवाल दिला आहे. तसेच सोबत जोडलेला आवश्यक बांधकाम नकाशा आपले अधिनस्त अभियंता यांनी वन अभियंता महाराष्ट्र राज्य नागपूर यांचेकडून प्राप्त करून घेऊन त्यांचे अवस्था-१ चे अंदाजपत्रक त्यांचेकडून तयार करून दयावे अशी मागणी घुले यांनी मुख्य वनसंरक्षक ठाणे यांचे कडे केली आहे. त्यामुळे अनुदान मागणीसाठी प्रस्ताव मुख्य वनसंरक्षक ठाणे यांचे कडे सादर करता येईल असा उल्लेख देखील घुले यांनी अर्जात केला आहे.
0 टिप्पण्या