सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे महापौरांचे आदेश

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कडक अंमलबजावणी करण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनाला आदेश


ठाणे कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर पावले महापालिकेने उचलावीत यासाठी कंटेनमेंट झोनमध्ये कडक अंमलबजावणी करावी. कोरोना रुग्णांची संख्या ज्या विभागात जास्त आहे त्या ठिकाणी नियमित औषधफवारणी व स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक क्षमतेने काम करावे, जे दुकानदार  सोशल  डिसटन्सींगचे पालन करणार नाहीत अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना विनामास्क ये-जा करतील अशांवर देखील दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही महिन्याच्या तुलनेत सद्यस्थितीत कोरोनाबाधीतांची संख्या कमी होत आहे. परंतु कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कडक उपाययोजनांबाबत  महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्‌यासमवेत आढावा बैठक घेतली. तेव्हा त्यांनी वरील आदेश दिले. सद्यस्थितीतील कोरोना व या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती महापौरांनी यावेळी घेतली. 


 


यावेळी ज्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत, त्या ठिकाणी कडक अंमलबजावणी करावी, शहरात विनामास्क ‍फिरणाऱ्यांवर दंड आकारावा, चाचण्यांची संख्या वाढवावी तसेच कोरोनामुळे होत असलेले मृत्यू रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी असे आदेश महापौरांनी  प्रशासनाला दिले. महापौर दालनात आज ५ ऑगस्ट रोजी झालेल्या या बैठकीस स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी,  उपायुक्त अशोक बुरपल्ले, संदीप माळवी, मनिष जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू  मुरूडकर आदी उपस्थित होते.


          कोरोनासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये काही खाजगी रुग्णालये आपला सहभाग देवू इच्छित असून तशी परवानगी ते महापालिकेकडून मागत आहेत. परंतु  अशा रुग्णालयामधील सेवासुविधांची खात्री करुन तद्ननंतरच नवीन रुग्णालयांना  परवानगी देण्यात यावी.  तसेच अँटीजेन चाचण्यांची संख्या ही कंटेनमेंट झोन व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी वाढविण्यात यावी व चाचण्यामधून जे संशयित रुग्ण असतील त्यांना व त्यांच्या संपर्कातील हायरिस्क असलेल्या व्यक्तींना सुध्दा होमकोरंटाईन न करता त्यांचे विलगीकरण  कोविड सेंटरमध्ये करण्यात यावे जेणेकरुन कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.


कोरोनाबाधित रुग्णांवर वेळीच आवश्यक उपचार उपलब्ध व्हावे यादृष्टीने कार्यवाही करावी तसेच कोरोनापासून होणारे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णालयांशी संपर्क साधून वैद्यकीय उपचारासंदर्भात डॉक्टरांशी सल्लामसलत करुन आवश्यक त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नाने व महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधितांसाठी कळवा मुंब्रा येथील रुग्णालयांमध्ये लवकरच अतिरिक्त बेड उपलब्ध करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचेही महापौरांनी या बैठकीत नमूद केले.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या