प्रणव मुखर्जोंच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे - विजय वडेट्टीवार
मुंबई
मुखर्जींचे विराट व्यक्तिमत्व आणि त्यांच्या निधनाचे दु:ख शब्दांमध्ये मांडता येणार नाही. पाच दशकं राजकारणात आपलं अढळ स्थान निर्माण करणाऱ्या मुखर्जी यांचा प्रचंड जनसंपर्क, अफाट स्मरणशक्ती, इंग्रजी भाषेवरील उत्तम प्रभुत्व, राजकारणाच्या खाच खळग्यांची उत्तम जाण, काँग्रेस पक्षातील घडामोडींचा गाढा अभ्यास...याच गुणांमुळे त्यांचं भारताच्या राजकारणातलं स्थान अढळ आहे. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे वडेट्टीवार म्हणाले. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मुखर्जी यांच्या निधनाने प्रचंड जनसंपर्क असलेले एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. प्रणब मुखर्जी यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूनं सेवा केली आहे. मुखर्जी हे साधे गृहस्थ नसून, ते एक विद्वान राजकारणी होते, पश्चिम बंगालमधल्या मिदनापूर जिल्ह्यात 1969 मध्ये मुखर्जींच्या कारकिर्दीला सुरवात झाली. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ते राज्यसभेचे खासदार झाले. इंदिरा गांधींनी 1973 मध्ये त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं आणि त्यांचा चढता आलेख कायम राहिला तो आजपर्यंत. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली. पश्चिम बंगालमधील वीरभूम येथे जन्म झालेल्या प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती होण्यापूर्वी यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. काँग्रेसप्रणित केंद्र सरकारमध्ये मुखर्जी यांनी अर्थ, संरक्षण, परराष्ट्र यांसारख्या मंत्रालयांचा पदभार यशस्वीपणे सांभाळला. युपीए सरकारच्या दहा वर्षांच्या काळात ते संकटमोचक ठरले. त्यामुळेच 95 पेक्षा जास्त मंत्रिगटाचे ते अध्यक्ष राहिले. यावरून त्यांच्यातल्या नेतृत्वगुणांची कल्पना येवू शकते.
-माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने महान अजातशत्रू नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या निधनाने राष्ट्राची हानी झाली आहे.प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून निघणार नाही अशी मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी प्रणव मुखर्जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0 टिप्पण्या