Top Post Ad

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये प्रशासनाचा सावळागोंधळ

परप्रांतिय बिनधास्त... स्थानिकांना त्रास


ठाणे 


मुंबईत कामाला जात असलेला एक व्यक्ती पॉझीटीव्ह आढळल्याने संपुर्ण  चाळीतील नागरीकांना क्वारंटाईन केले गेले. नागरिकांनी विरोध करूनही त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. मात्र त्याच्या शेजारील चाळीत काही दिवसांपुर्वीच परराज्यात गेलेले नागरीक कुटुंब कबिल्यासह परत येऊन राजरोसपणे वावरत आहेत. या नागरीकांची ना पालिकेने नोंद घेतली ना पोलीस प्रशासनाने नोंद घेतली. मग स्थानिकांच्या बाबतच एवढा अरेरावीपणा प्रशासन का करीत आहे असा सवाल कोपरीतील नागरिकांनी विचारला आहे.  याबाबत सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी यात गल्लत करू नका असे सांगत पोलिसांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही महापालिकेनं कोणतेही आदेश दिले नसल्याचे सांगताच त्यांनी घुमजाव करून याबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याची सारवासारव केली.


कोपरीतील साईनाथनगर वसाहतीत ५ हजार नागरिकांची वस्ती आहे. येथील एक व्यक्ती ४ जुलैपासुन नोकरीच्या ठिकाणी मुंबईत वास्तव्यास आहे. ९ जुलै रोजी संबधित व्यक्ती कोरोनाबाधीत आढळली. त्यानंतर या रुग्णाची माहिती महापालिकेला मिळाल्यानंतर तीन दिवसांनी पालिकेचे कर्मचारी या चाळीवर कोवीड प्रतिबंधित क्षेत्राचा फलक लावून गेले. त्यानंतर पालिका प्रशासन याकडे फिरकलेच नाही किंवा औषधांचीही फवारणी झाली नाही.  चाळ निर्जतुकीकरण, परिसरात जंतुनाशके फवारणी आणि मोबाईल टॉयलेट उपलब्ध करण्याचा कोणताही सोपस्कार महापालिकेने केला नाही.


१४ जुलै रोजी अचानक पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या पत्नीला क्वारंटाईन करण्यासाठी हाजुरी केंद्रात नेले.  यावेळी चाळीतील रहिवाशांनी संबधित रुग्णाशी संपर्क आला नसल्याचे सांगुन पालिकेच्या पथकासोबत जाण्यास नकार दिला. पुन्हा १५ जुलै रोजीही अशाच प्रकारे गोंधळ झाल्याने पथकाला हात हलवत परतावे लागले. त्यानंतर १६ जुलै रोजी पोलीसांच्या धाकाने चाळीतील १६ जणांना भाईंदरपाडा येथील क्वारंटाईन केंद्रात नेण्यात आल्याने रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये ठाण्यात प्रशासनाचा सावळागोंधळ असल्याचे समोर आले आहे. मुंबईतल्या त्या रुग्णाशी चाळीतील व्यक्तींचा संपर्कही आला नव्हता. तरीही हायरिस्क संपर्काचे कारण देत एकीकडे अशाप्रकारे स्थानिकांना क्वारंटाईन करीत असताना लॉकडाऊनमध्ये परराज्यात गेलेले नागरीक आता परतत असुन त्यांचा संचार सर्वत्र सुरू आहे. मात्र पालिका आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com