Top Post Ad

...आणि म्हणून मला 'पोलीस' व्हायचंय - सिग्नल शाळेचा यशस्वी विद्यार्थी दशरथ पवारचे स्वप्न

सिग्नल शाळेच्यामागे पालिका भक्कमपणे उभी राहील
आयुक्तांनी केला बारावी पास दशरथ पवारचा सत्कार



ठाणे


अठरा विश्‍व दारिद्रय आणि विस्‍थापित आयुष्‍यांचा कलंक पुसण्‍यासाठी सरसावलेल्‍या सिग्‍नल शाळेच्‍या विद्यार्थ्‍याने आणखी एक परीक्षा उत्‍तीर्ण केली. शाळेचा दशरथ युवराज पवार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत 55 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. सिग्नल शाळेचा हा विद्यार्थी दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने आयुष्‍याची आणखी एक लढाई जिंकली.  याबद्दल दशरथ पवार यांचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपल्या दालनात सत्कार केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे,  माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर हे देखील उपस्थित होते.


ठाण्यासारख्या महानगरांमध्ये स्थलांतरीत कुटुंब आश्रयाला येतात. स्थलांतरामागचे मुळ कारणावर उत्तर मिळण्यापर्यंत शहरातील अशा कुटुंबीयांच्या मुलांच्या मुलभुत शिक्षणासाठी पालिका प्रयत्नशील राहिलच. त्याचबरोबर सिग्नल शाळेसारखा प्रयोग जो देशाच्या पातळीवर आदर्श प्रयोग म्हणून नावाजला गेलाय त्या प्रयोगाच्या मागे देखील ठाणे महानगरपालिका भक्कमपणे उभी राहिल असा विश्वास व्यक्त करत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सिग्नल शाळेतुन शिक्षण झालेल्या दशरथ पवार याचा बारावी पास झाल्याच्या निमित्ताने आयुक्त कार्यालयात सत्कार केला व त्याला भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


सिग्नल शाळेसारखा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत उभा राहिला याचा ठाणे महानगरपालिका व प्रत्येक ठाणेकरांला अभिमानाचा विषय आहे. पुलाखालील मुले ही आपल्याच राज्याची नागरिक आहेत त्यांचा सर्वांगिण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून योगदान देणे गरजेचे आहे. त्यामुळे या शाळेत शिकत असलेल्या सर्व पन्नास मुलांच्या व पर्यायाने सिग्नल शाळेच्यामागे ठाणे महानगरपालिका भक्कमपणे उभी राहील असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला.


समर्थ भारत व्यासपीठ सारख्या सामाजिक संस्थाच्या सहभागाने ठाणे महानगरपालिका शाळाबाह्य मुलांसाठी करीत असलेले काम वाखाण्यासारखे असून ठाणे महानगरपालिकेसाठी देखील सिग्नल शाळा हा उपक्रम अभिमानाचा आहे. यावेळी आयुक्तांनी  सिग्नल शाळेच्या पाच वर्षांच्या प्रवासाची माहिती समजुन घेतली व यापुढे देखील शाळेला पालिकेच्यावतीने भरीव पाठींबा देत दशरथ पवार याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत,  सिग्‍नल शाळेच्‍या शिक्षिका आरती परब, प्रियांका पाटील, सुमन शेवाळे, ज्ञानसाधना महाविद्यालयातील प्राचार्य चंद्रशेखर मराठे, प्राध्‍यापिका भारती जोशी, सुप्रिया कर्णीक, अश्विनी ओंधे, चारूलता देशमुख, सुनिता जमने, सीमा केतकर आदी सहकार्य करणारे शिक्षकगण उपस्थित होते.


ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने सिग्‍नल शाळा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. तीन हात नाक्‍यापुलाखाली राहत असलेल्‍या आणि महाराष्‍ट्रातील दुष्‍काळी भागातील स्‍थलांतरीतांच्‍या मुलांसाठी या उपक्रमाची सुरुवात पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी या शाळेतील दोन विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाले. यानंतर बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्‍यात शाळेचा दशरथ युवराज पवार हा विद्यार्थी 55 टक्‍के गुण मिळवत उत्तीर्ण झाला. तर शाळेचा आणखी एक विद्यार्थी मोहन काळे हा सध्‍या डिप्‍लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत आहे..



...आणि म्हणून मला 'पोलीस' व्हायचंय -


दहावीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्‍या दशरथला पोलीस दलात सहभागी व्‍हायचे आहे. यासाठी त्याने ज्ञानसाधना महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. अकरावी आणि बारावीत असतानापासून तो दादोजी कोंडदेव स्‍टेडियम येथील भोसले पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. शाळा सुरू असताना रोज सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत असे 6 तासांची शारीरिक कसरत आणि यानंतर पुन्हा ज्ञानसाधना महाविद्यालयात 1 ते 6 वाजेपर्यंत कॉलेज करायचा. बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्‍यानंतर आता त्‍याला पोलीस दलात भरती व्हायचे आहे. पारधी समाजाची गुन्‍हेगारी समाज म्‍हणून त्‍याची हेटाळणी केली जाते. या समाजातील मुलेही उच्‍चशिक्षण घेऊ शकतात आणि कायदा सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी आपले योगदान देऊ शकतात, हा संदेश मला पोलीस होऊन द्यायचा आहे, असे दशरथचे स्वप्न आहे.



 




 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com