आयएमए ठाणे शाखेच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा खासगी डॉक्टरांशी संवाद

संशयित रुग्णांना तातडीने दाखल करून उपचार सुरू करण्याची एकनाथ शिंदे यांची खासगी रुग्णालयांना सूचना


वेबिनारद्वारे साधला १ हजारहून अधिक डॉक्टरांशी संवादठाणे


ठाणे शहरासह जिल्ह्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या रोखतानाच मृत्यूदर कमी ठेवणे, याला सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी सर्व खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांनीही पुढाकार घेऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. करोना-संशयित रुग्णांना दाखल करून न घेता अन्य रुग्णालयात पाठवण्याऐवजी अशा रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करावेत, करोनाची टेस्ट करावी आणि टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याची प्रकृती स्थिर झाल्यावरच कोव्हिड रुग्णालयात हलवावे, अशी सूचना शिंदे यांनी केली. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) ठाणे शाखेच्या माध्यमातून शिंदे यांनी वेबिनारद्वारे आयएमएचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी आणि एक हजारहून अधिक खासगी डॉक्टरांशी रविवारी संवाद साधला.


करोनाचा प्रसार कमी व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. त्याचसाठी ठाण्यात १० दिवसांसाठी पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर मृत्यूदर कमी करणे, एक-एक जीव वाचवणे, हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. अनेकदा संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही, त्यांना वेळच्या वेळी उपचार मिळत नाहीत; त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊन वाचवणे अवघड होते, अशा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे नॉन-कोव्हिड रुग्णालयांनीही संशयित रुग्णांना प्रथम दाखल करून घेऊन उपचार सुरू करावेत आणि त्यांची प्रकृती स्थिर करून मग त्यांना कोव्हिड रुग्णालयात हलवावे, अशी सूचना शिंदे यांनी केली.


या वेबिनारमध्ये सहभागी झालेले गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी ठाणे महापालिकेने रेमडेसिव्हिर, फॅबिफ्लू यांसारख्या अत्यावश्यक औषधांची खरेदी करण्याची सूचना यावेळी केली. धारावी मॉडेलप्रमाणेच मालेगाव मॉडेलही प्रभावी ठरले असून त्याची अमलबजावणी केल्यामुळे मुंब्रा-कौसा येथे रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही रुग्णांना प्रथम दाखल करून घेऊन उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. तसेच, खासगी रुग्णालयांकडून काही प्रमाणात बिलांच्या तक्रारी येत असून असे प्रकार टाळण्यासाठी आयएमएने सर्वांना आवाहन करावे, अशी सूचना त्यांनी केली. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, स्थानिक डॉक्टर, महापालिकेचे स्थानिक अधिकारी आणि स्थानिक लोक यांचा समावेश असलेल्या करोना समित्या तयार केल्यास करोनाचा अधिक प्रभावी मुकाबला करता येईल, असेही ते म्हणाले.


या वेबिनारमध्ये वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे खजिनदार आणि आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकेर, आयएमए, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, राज्य सरकारच्या करोना टास्ट फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ठाण्यातील करोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. आनंद भावे, आयएमए, ठाणेचे मावळते अध्यक्ष डॉ. दिनकर देसाई, भावी अध्यक्ष डॉ. संतोष कदम, फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित, ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष भुमकर, डॉ. रीटा भिडे, डॉ. लता घनशामानी, ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा, एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवरांनी सहभागी होऊन आपली मते मांडली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA