Top Post Ad

आदीवासी पाड्यातील विज दुरुस्तीकडे महावितरणचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

महावितरणचे दुर्लक्ष ; प्राण धोक्यात घालून खोस्त्याचे तरुण करतात वीज दुरुस्ती 

 

माजी आमदाराच्या शिफारशीला केराची टोपली

  

 

 

शहापूर

 

अनेकवेळा संपर्क करूनदेखील महावितरणचे कर्मचारी वर्ग ग्रामीण व शहरी भाग असा दुजाभाव ठेवत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आदिवासी वाडी वस्तीवर खंडित वीजप्रवाह सुरू करण्यास दोन दोन दिवस  उपस्थित राहत नसल्याने आदिवासी तरुण ग्रामस्थ आपले प्राण धोक्यात घालून वीज दुरुस्ती करतात मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याची ओरड संतप्त आदिवासी ग्रामस्थांकडून होत आहे.  याबाबत महावितरणचे विभागीय उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांना विचारले असता  खोस्ते गावातील परिस्थिती बघतो, लाईनमनने  तक्रारीची दखल कधी घेतली नाहीतर लाईनमनवर कारवाई करतो. तसेच खाजगी माणसांना हात लावण्यास अधिकार नाहीत ते अनाधिकृत आहे. परंतु मजबुरी असेल तर ठीक आहे. मात्र जाणूनबुजून होत असेलतर कारवाई करणार आणि आमचे लोक काम करत  नसतील तर त्यांचेवर देखील कारवाई करणार असे सांगितले.

 

 शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भावशे अंतर्गत येणाऱ्या मौजे खोस्ते हे आदिवासी वस्तीचे गाव असून येथील वीज रोहित्रातील तेल गेल्या अनेक वर्षांपासून बदलले नसल्याने ते खराब झाले आहे. तसेच येथील विजेच्या तारा लोम्बकळत आहेत. जीर्ण झालेल्या व वीज रोहित्रातील तेल खराब झाल्याने येथील वीज प्रवाह नेहमीच खंडित होत आहे. त्यामुळे ग्रुप ग्रामपंचायत भावशे सरपंच रोशनी रमेश वरठा यांनी मासिक सभेत या गंभीर प्रश्नाबात सर्वानुमते ठराव घेऊन २८ मे २०१९ रोजी  शहापूर महावितरण उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांना लेखी निवेदन देत वीज रोहित्रातील तेल बदलण्याची व वीज तारा खेचून घेण्याची विनंती केली. परंतु एक वर्ष उलटून देखील महावितरणच्या अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही.

 

ग्रामस्थांनी माजी आमदार यांचेकडे याबाबत तक्रार केली असता माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी १८ जानेवारी २०२० रोजी शहापूर महावितरण उप कार्यकारी अभियंत्यास लेखी पत्र देऊन मोजे खोस्ते येथील ट्रान्सफॉर्मर वरील ऑइल बदलून कंडक्टर खेचने संदर्भात ग्रामपंचायत भावशे यांनी २८ मे रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने खोस्ते येथील कामाची पाहणी करून तातडीने कार्यवाही करावी असे पत्र दिले होते मात्र शहापूर महावितरण उप कार्यकारी अभियंता अविनाश कटकवार यांनी आमदाराच्या शिफारशीला देखील केराची टोपली दाखवत जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे. यावरून असे दिसून येते की,  शहरी भाग व ग्रामीण भाग असे दोन भागांमध्ये शहरी भागाला प्राधान्य देत कामे केली जातात तर ग्रामीण भागातील  कामाचे प्राधान्य त्याची असलेली संवेदनशीलता आणि तांत्रिक बाबी पडताळून काम पाहिले जात आहे. परंतु महावितरणचे कर्मचारी अधिकारी इकडे फिरकतच नसून त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासींना असे दुय्यम स्थान का? असा सवाल देखील येथील संतप्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. 

 

 

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com