वीज बीलाच्या प्रश्नावर महाराष्ट्र म्यु. कर्मचारी युनियनचा पुढाकार
ठाणे
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग-धंदे ठप्प झाल्यामुळे आणि लोकांना या काळात रोजगार नसल्याने महिन्याला घरी येणारी आर्थिक आवक बंद झाली आहे. गेल्या ४-५ महिन्यात सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. घरच्या प्राथमिक गरजा पूर्ण करताना लोकांची दमछाक होत आहे. सामान्य माणूस कसाबसा संसाराचा गाडा या कठीण परिस्थितीत पुढे ढकलायचा प्रयत्न करत असतांनाच, वीज कंपन्यांनी मात्र त्याला बिलाच्या माध्यमातुन जबरदस्त शॉक दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिले प्रचंड प्रमाणात आल्याने सामान्य नागरिकांमध्ये संताप व असंतोष आहे. याबाबत महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने अधिक्षक अभियंता यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभाग समिती निहाय विज बिले कमी करण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या चर्चेकरिता युनियनचे अध्यक्ष रविंद्र चांगो शिंदे, सरचिटणीस प्रमोद इंगळे आणि इतर सभासद उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना कोणतेही उत्पन्न नसताना वीज बिळांमुळे लोकांना मनस्ताप झाला आहे. अवा-च्या-सवा वीज बिले आल्याची अशी असंख्य उदाहरणं आहेत. “लॉकडाऊनच्या काळात या वीज कंपन्यांचा कुठलाही प्रतिनिधी मीटरचे रिडींग घ्यायला आला नाही, मग कुठल्या आधारावर ही अफाट बिले पाठवून वीज कंपन्यांनी लुट सुरु केलीय ?” असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. या वीज कंपन्यांच्या कार्यालयात वीज ग्राहकांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत. लॉक डाऊनच्या काळात सर्वच घटकातील वीज ग्राहकांना जादा बिले आली आहेत. वीज वितरण कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
0 टिप्पण्या